β मोर्चातही मराठा स्त्री-प्रतिष्ठेचा सन्मान

संग्राम जगताप
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

म्हणूनच आम्ही पोचू शकलो! 
संभाजी पुतळ्याला हार घातल्यानंतर विधानभवनापर्यंत जाताना वाटेत प्रचंड गर्दी होती. आम्हाला जाणे शक्‍यच नव्हते. मात्र, सुरवातीपासून शेवटपर्यंत सर्व मराठा सेवकांनी आवर्जून वाट करून दिली, म्हणूनच आम्ही इतरांपेक्षा तब्बल अर्धा तास आधी शेवटच्या ठिकाणापर्यंत पोचू शकलो, असे मोर्चाच्या समन्वय समितीच्या विशाखा भालेराव यांनी सांगितले. 
 

इतर जिल्हा पातळीवरील मोर्चांचा प्रतिसाद पाहिल्यावर पुण्यासारख्या मोठ्या शहरात मोर्चाला किती लोक जमणार आणि मोर्चात मराठा समाजातील महिला घराबाहेर पडणार का अशी खास कुजबुज सर्व समाजांमध्ये सुरू होती. मात्र, मराठा समाजाने केवळ महिलांना मोर्चात सहभागी केले नाही तर जाणीवपूर्वक मोर्चाचे नेतृत्वच त्यांच्या हाती सोपविले. ही कामगिरी महिलांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली.

‘शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा, पण शेजाऱ्याच्या घरात‘ ही म्हण जशी लोकांच्या वेळकाढू वृत्तीचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते, तसेच आता मोर्चाच्या प्रवाहात आवर्जून सामील झालेले तद्दन घरंदाज म्हणविणारे मराठे घरातील ‘लक्ष्मी‘ला रस्त्यावर उतरविणार का... असा प्रश्न उपस्थित केला जात होता. 
तसेच, ‘महिलाच्या सबलीकरणाची भाषा करणारे ‘शिवाजी शेजारी जन्मावेत‘ या म्हणीप्रमाणे समाजातील इतरांच्या स्त्रियांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करतील, मात्र घरातील स्त्रीला उंबऱ्याच्या बाहेर काढणार नाहीत. बहुजन चळवळीत भाषणे देताना राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई फुले यांची उदाहरणे हिरीरीने सांगितली जातात. मात्र, स्वतःच्या घरातील महिलांना सामाजिक चळवळीत आणले जात नाही,‘ अशी खास पुणेरी टीका काही लोकांकडून आमच्यावर करण्यात येत होती. 
मात्र, पुरुषांच्या बरोबरीनेच मराठा समाजातील महिला लाखोंच्या संख्येने बाहेर पडल्या. आणि केवळ मोर्चात सहभागी झाल्या 
नाहीत तर नियोजनापासून ते मोर्चाचे नेतृत्व करण्यापर्यंत त्यांनी कामगिरी बजावली. मूक मोर्चाच्या माध्यमातूनच त्यांनी या टीकेला महिलांनी खास मराठा शैलीत उत्तर दिले आहे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजन समितीतील महिला सदस्याने सांगितले. 

मोर्चात सुरक्षिततेची भावना
एरवी सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या मनात जी नकळत जी असुरक्षिततेची भावना असते. ती या मोर्चामध्ये अजिबात वाटली नाही, असे मोर्चामध्ये सहभागी झालेल्या श्वेता दिलीप बोंद्रे हिने सांगितले. मोर्चात समांतर चालणाऱ्या व मागून येणाऱ्या महिला कार्यकर्त्यांसाठी खास वाट करून देण्यात आली. त्यांच्यासाठी मराठा सेवकांनी स्वयंस्फूर्तीने मानवी साखळी करून संरक्षणही दिले, हे चित्र उल्लेखनीय आहे. 

विशेष म्हणजे आधी ज्याप्रमाणे चर्चा करण्यात आली त्याला विरोधाभासी चित्र यावेळी दिसले. कोणी घरचे धनी मोर्चात घेऊन जाण्याची वाट या महिलांनी पाहिली नाही. तरुणींसह प्रौढ महिला स्वतःच्या वाहनांना झेंडे लावून उत्स्फूर्तपणे मोर्चात दाखल झाल्या.