हट्ट पुरविण्याऐवजी संवाद घट्ट करा!

हट्ट पुरविण्याऐवजी संवाद घट्ट करा!

टेक्‍नोसेव्ही झालेल्या आजच्या पिढीला सांभाळणे पालकांसमोर मोठे आव्हानच आहे. मोबाईल हातातून घेतल्यामुळे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय मुले घेतात. भावनांवर नियंत्रण गमावून बसलेल्या नव्या पिढीला घडवण्याच्या प्रयत्नात पालकांची दमछाक होते. तंत्रज्ञानाच्या विश्‍वात अडकलेल्या अशा मुलांच्या पालकांसमोर वेगळीच आव्हाने आहेत. अल्लड वयातील ‘शहाणपण’ आणि त्यातून निर्माण होणारे वाद थांबवायचे असतील, तर ‘नको ते’ बालहट्ट पुरवू नका, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

बडबडगीतही न समजणाऱ्या मुलांना सध्या मोबाईल सहज वापरता येतो आहे. इंटरनेटसारखे प्रभावी माध्यम नव्या पिढीला सहज उपलब्ध आहे. त्यामुळे मुलांची भावनिक वाढ लवकर होते. त्यातच मुलांच्या हातात मोबाईल देऊन त्यांचे रडणे थांबवणे पालकांना ‘शहाणपणा’चे वाटते. ही भूमिकाच चुकीची आहे, असे मत बालविकास क्षेत्रातील ऑक्‍युपेशनल थेअरपिस्ट डॉ. सुमीत शिंदे यांनी व्यक्त केले. मुलांना योग्य वयात योग्य गोष्टी देण्याकडे पालकांनी लक्ष द्यावे. १० वर्षांच्या आतील मुलाला त्याच्या बौद्धिक विकासासाठी मैदानी खेळ आणि वेगवेगळ्या पुस्तकांची गरज असते. त्याने लॅपटॉपचा हट्ट केल्यास पालकांनी नकार द्यावा. पालक आपल्या गैरहजेरीची कमतरता भरून काढण्यासाठी मुलांचे नको ते हट्ट पुरवतात. त्यामुळे मुलांमध्ये मरगळ वाढते. त्याचे दुष्परिणाम पालक-मुलांच्या नात्यावर होतात, असेही ते म्हणाले. मुलांशी संवाद अधिक घट्ट करून पालक हेच मुलांचे पहिले समुपदेशक ठरू शकतात. यातूनच मुलांच्या भावनांना आवर घालून भविष्यातील अनेक धोके दूर करता येऊ शकतील, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

मुलांचा प्रत्येक हट्ट पुरविण्याऐवजी संवाद अधिक घट्ट करून पालकांनीच आपल्या मुलांचे समुपदेशक होण्याची गरज आहे. ‘सकाळ’ने काही मानसोपचारतज्ज्ञांशी यासंदर्भात चर्चा केली. पालकांची सध्याची भूमिका बदलायला हवी, असे मत चर्चेतून पुढे आले.  

जागतिक पालक दिन
आपल्याला जे हवे, ते तत्काळ मिळतेय, अशी भावना मुलांमध्ये इंटरनेटच्या सततच्या वापरातून निर्माण होते. पुढे हे व्यसनच होते. त्यामुळे मुलांना चुकीच्या सवयी लागणार नाहीत, याची काळजी घ्यावी. वयाच्या १० वर्षांपर्यंत मुलांना सोशल नेटवर्किंग साइट्‌सपासून दूर ठेवावे. पालकत्वातील बदलती आव्हाने ही पालकांच्या अशा चुकीच्या सवयींमुळेच निर्माण झाली आहेत.
- डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ, हेल्थ स्प्रिंग, मुंबई

पाच-सहा वर्षांची मुले सर्रास स्मार्टफोनने खेळतात. स्मार्टफोनच्या वापरातील पाल्याचे ‘कौशल्य’ पाहून पालकांना कौतुक वाटते. मात्र, हेच कौतुक डोईजड होते. वेळ गेल्यानंतर डोळे उघडण्यापेक्षा आधीच मुलांना पुरेसा वेळ द्या. त्यांच्या हट्टांना नकार द्या. मुले चांगल्या पद्धतीने घडू शकतील, अशा गोष्टींमध्ये त्यांचे मन गुंतवा. मुलांसाठी पुरेसा वेळ देणे हेच पालकांसमोर मोठे आव्हान असेल, तर मुलांना इंटरनेटच्या आहारी जाण्यापासून रोखता येणे कठीण आहे.
- डॉ. अली अकबर गब्रानी,  मानसोपचारतज्ज्ञ, डॉ. माचीसवाला क्‍लिनिक

आई-वडील नोकरीसाठी घराबाहेर पडले की मुले घरी एकटीच असतात. त्यांना खूश ठेवण्यासाठी त्यांचे सर्व हट्ट पुरवले जातात. त्यामुळे अशा मुलांना नकार ऐकण्याची सवय नसते. थोडे मनाविरुद्ध झाले की त्यांना नैराश्‍य येते. त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. भावनिक जवळीकीपेक्षा भौतिक वस्तूंना प्रेम मानले जात आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे आव्हाने वाढत जाणार आहेत. त्याला पालकच जबाबदार आहोत. सध्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मुले लवकरच ‘वयात’ येतात, याचेही भान पालकांनी ठेवायला हवे.
- डॉ. अरुंधती चव्हाण,  अध्यक्ष, पालक-टीचर असोसिएशन, युनायटेड फोरम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com