ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

अरुण साधू यांना प्रकृती अस्वास्थामुळे रविवारी सकाळी मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साधू यांच्या अखेरच्या इच्छेनुसार जेजे रुग्णालयात देहदान करण्यात येणार आहे  

मुंबई : पत्रकारिता आणि साहित्याच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे आज (सोमवार) पहाटे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. 

अरुण साधू यांना प्रकृती अस्वास्थामुळे रविवारी सकाळी मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साधू यांच्या अखेरच्या इच्छेनुसार जेजे रुग्णालयात देहदान करण्यात येणार आहे  

साधू यांच्या निधनामुळं पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. वयोमानामुळं गेल्या काही दिवसांपासून साधू यांची प्रकृती खालावली होती. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्रास वाढत गेल्यानं रविवारी सकाळी त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. साधू यांचं पार्थिव वांद्रे येथील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार आहे. 

अरुण साधू यांनी केसरी, माणूस, इंडियन एक्स्प्रेस अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून पत्रकारिता केली होती. सहा वर्षे ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते. ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मानही त्यांना मिळाला होता. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान व अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. साधू यांनी झिपर्‍या, तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, मुंबई दिनांक, विप्लवा, शापित, शुभमंगल, शोधयात्रा, सिंहासन, स्फोट या कादंबऱ्या लिहिल्या. 

Web Title: Writer Arun Sadhu is no more