badri ki dulhania movie review
badri ki dulhania movie review

आणखी एक एंटरटेनिंग दुल्हनिया! (नवा चित्रपट - बद्रीनाथ की दुल्हनियां)

"स्टुडंट ऑफ द इअर', "हम्टी शर्मा की दुल्हनियां' आणि आता "बद्रीनाथ की दुल्हनियां'....अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री आलिया भट यांची रुपेरी पडद्यावरील केमिस्ट्री चांगलीच जुळलेली आहे. सध्याच्या घडीला ही बॉलीवूडची यशस्वी जोडी आहे. या जोडीच्या यापूर्वीच्या दोन्ही चित्रपटांना घवघवीत यश मिळालेले आहे. त्यामुळेच काही निर्माते व दिग्दर्शक या जोडीला घेऊन चित्रपट बनवू इच्छित आहेत. हे दोन्ही कलाकार लंबी रेस खेळणार हे केव्हाच सिद्ध झालेले आहे. 
वरुणची इमेज बहुतांश चॉकलेट बॉयची असली तरी आलियाने मात्र "हायवे', "उडता पंजाब'सारखे वेगळे प्रयोग केले आहेत. पडद्यावरचा सहजसुंदर अभिनय ही या जोडीची खासियत. "बद्रीनाथ की दुल्हनियां' या चित्रपटात या दोन कलाकारांनीच धमाल उडवली आहे. दिग्दर्शक शशांक खेतानने या दोघांना चांगलेच प्रेझेंट केले आहे. त्यामुळे एक एन्टरटेनिंग वेडिंग ड्रामा, सजून-धजून आलेली आणखी एक एन्टरटेनिंग दुल्हनिया म्हणूनच या चित्रपटाकडे पाहावे लागेल. 

कथेला सुरुवात होते ती झाशीपासून. झाशी येथे बद्री (वरुण धवन) आपल्या कुटुंबासमवेत राहत असतो. त्याचे वडील पारंपरिक विचारसरणीचे. साहजिकच बद्रीच्या मोठ्या भावाच्या प्रेमाला विरोध करत ते त्याचे लग्न दुसऱ्याच एका मुलीशी जबरदस्तीने लावून देतात. बद्री आपल्या एका मित्राच्या लग्नाला कोटा येथे जातो, वैदेहीला पाहतो आणि अर्थातच प्रेमातही पडतो. वैदेहीशी (आलिया भट) या पहिल्या भेटीतच बद्री तिच्याशी लग्न करण्याचे मनसुबे रचतो, एवढेच नाही; तर आपल्या घरातील मंडळींना सांगून चक्क तिला लग्नाची मागणीही घालतो. पण विरोध चक्क वैदेहीच करते. कारण तिचा फोकस तिच्या करिअरकडेच असतो. तरीही आपल्या मोठ्या बहिणीचे लग्न व्हावे म्हणून ती तडजोड करण्याचा विचार करते. आपल्याशी लग्न करायचे असेल तर बद्रीला एका अटीचे पालन करावे लागेल, तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न जुळवून द्यावे लागेल, अशी ती अट. 
तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न लावून देण्याचे बद्री तिला प्रॉमिस करतो. त्यासाठी जंगजंग पछाडतो. कसेबसे तिचे लग्न जुळते. त्यानंतर अर्थातच वैदेहीचा नंबर. बद्रीऐवजी वैदेहीचे आई-वडीलच वैदेहीलाही बद्रीशी लग्न करण्याचा तगादा लावतात. अखेर ती कशीबशी तयार होते. पण खरा ड्रामा तर त्यानंतरच सुरू होतो... त्यातून नेमके काय होते, बद्रीला त्याची दुल्हन मिळते का, वैदेही करिअरवर लक्ष देते की प्रेमाला अधिक महत्त्व देते, या सगळ्यांचा ठासून भरलेला मालमसाला म्हणजेच हा चित्रपट. 
निर्माता करण जोहर आणि दिग्दर्शक शशांक खेतान यांनी एक हलकीफुलकी कथा मांडलेली आहे. त्याला कलाकारांच्या अभिनयाची समर्थ साथ लाभली आहे. वरुण आणि आलिया यांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर व्वा! क्‍या बात है... असेच म्हणावे लागेल. या दोन्ही कलाकारांनी कमाल केली आहे. दोघांमधील अभिनयाची जुगलबंदी छानच. बद्रीचा हा बिनधास्त व बेधडकपणा वरुणने छान पकडला आहे. उत्तर प्रदेशातील भाषेचा लहेजा त्याने मस्त पकडलेला आहे. 
अन्य कलाकारांची कामगिरीही चांगलीच आहे. अमाल मलिक, तनिष्क बागची आणि अखिल सचदेव यांनी संगीताची बाजू उत्तम लावून धरलीय. "तम्मा तम्मा...' या माधुरी - संजय दत्तने गाजवलेल्या गाण्यावर वरुण आणि आलिया छान थिरकलेत. 
कोटा तसेच सिंगापूरची सफर हा चित्रपट आपल्याला घडवून आणतो. चित्रपटाचा पूर्वार्ध अधिक रंजक आणि वेगवान आहे. उत्तरार्ध मात्र थोडा स्लो, थोडा कंटाळवाणा झाला आहे. 
सिंगापूरची सफर करताना चित्रपटाची कथा मात्र हलतच नाही असे वाटते. 
शादी-ब्याह-लग्न हे विषय हिंदी सिनेमांसाठी फार नवीन नाहीत. लग्नावरून होणारा गोंधळ मांडणारा हा सिनेमा कथेच्या दृष्टिकोनातून फार नावीन्यपूर्ण आहे असे वाटत नाही. पण आजची पिढी त्यातही तरुणीही आपल्या करिअरचा किती आणि कसा विचार करतात... अगदी छोट्या शहरातील मुलीही आपल्या करिअरबाबत किती गंभीर असतात हे सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. 
ही दुल्हनिया कलाकारांच्या अभिनयाने, संगीताने छान सजलीय... पाहायला हरकत नाहीच! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com