चाकोरीबाहेरचा कौल

चाकोरीबाहेरचा कौल
चाकोरीबाहेरचा कौल

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटाची परिभाषा बदलत चालली आहे. मराठी चित्रपट राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गरुडभरारी घेत आहे. सध्याची नवीन दिग्दर्शकांची फळी हुशार अन्‌ कल्पक आहे. नवीन कलाकारांना घेऊन नवनवीन विषयांची हाताळणी ही मंडळी अप्रतिम करत आहेत. खरे तर ते एक प्रकारचे धाडसच म्हणायला हवे. नवोदित दिग्दर्शक आदिश केळुसकरने अशाच प्रकारचे धाडस केले आहे. मनोरंजनाच्या कक्षेत न बसणारा किंबहुना वेगळ्या धाटणीचा "कौल' चित्रपट त्याने बनविला आहे. त्याच्या या धाडसाचे पहिल्यांदा कौतुक करावे लागेल. लेखन आणि दिग्दर्शन अशा दोन्ही बाजू त्याने सांभाळल्या आहेत.


"कौल' चित्रपटाची कथा कोकणच्या पार्श्‍वभूमीवर घडणारी आहे. एका माणसाच्या हातून खून होतो आणि त्यानंतर त्याला अद्‌भुत अनुभव येत जातो. त्यातून त्याची होणारी मनोवस्था या चित्रपटात टिपण्यात आली आहे. अर्थात त्याच्या जीवनात घडणाऱ्या चित्रविचित्र घटना आणि त्याचा त्याच्या जीवनावर होणारा परिणाम... असे कथासूत्र आहे. शहरातून कोकणात नोकरी करायला आलेला एक शिक्षक. शहरातील त्याचे पूर्वायुष्य... त्यानंतर कोकणात आल्यानंतर त्याला भेटलेली एक गूढ व्यक्ती. त्यातून मनात निर्माण होणारा संभ्रम आणि तो सोडविण्याची त्याची चाललेली धडपड. एकूणच श्रद्धा-अंधश्रद्धा आणि विश्‍वास-अविश्‍वास अशा सगळ्या गोष्टींवर नकळतपणे भाष्य करणारा हा चित्रपट आहे.


रोहित कोकाटे, दीपक परब, मकरंद काजरेकर आणि सौदामिनी टिकले या कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे. रोहितने साकारलेली शिक्षकाची भूमिका ही चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा आहे आणि रोहितने तितक्‍याच ताकदीने ती पेलली आहे. चित्रपटाची सर्वांत जमेची बाजू आहे ते ध्वनिसंयोजन. ऋतिक राज पाठक आणि सिद्धार्थ दुबे यांचे कौतुक त्याकरिता करावे लागेल. पक्ष्यांचा किलबिलाट, पावसाची टिपटिप... या सर्व गोष्टी पाहताना ध्वनिसंयोजनाची किमया चांगलीच जाणवते. तरीही काही गोष्टींची उणीव आहेच. चित्रपटाच्या सुरुवातीला कथा काय आहे आणि ती कशा पद्धतीने पुढे सरकते आहे, याचा योग्य उलगडा होत नाही. नंतर मात्र हळूहळू तिचा अंदाज येत जातो. साहजिकच चित्रपट आपण तुकड्या तुकड्याने पाहत आहोत की काय, असेच जाणवते. कारण, एका दृश्‍याचा दुसऱ्या दृश्‍याशी काहीच संबंध येत नाही. कथा अत्यंत संथपणे व हळुवारपणे पुढे सरकत जाते.


चित्रपटाची निर्मिती चिंटू सिंह आणि उमा महेश केळुसकर यांनी केली आहे. अमेय चव्हाण यांचे छायांकन आहे. एक वेगळ्या धाटणीचा आणि चाकोरीबाहेरचा चित्रपट आदिशने दिला आहे.


दर्जा : **

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com