नवा चित्रपट : मिर्झिया 

Mirzya
Mirzya

तरल प्रेमाची 'गुलजार' गोष्ट 
 

'मिर्झिया' हा गीतकार, कथाकार गुलजार यांच्या चाहत्यांसाठीचाच सिनेमा आहे. तरल शब्द, कथानक व हे सर्व सूत्रधाराच्या माध्यमातून कथन करण्याची पद्धत या आपल्या वैशिष्ट्यांसह गुलजार चित्रपट सादर करतात. राकेश ओमप्रकाश मेहरा 'रंग दे बसंती'चा पॅटर्न वापरत इतिहासातील प्रेमकथेला आजच्या काळात आणून ठेवत दोन्हींची तुलना करत मंत्रमुग्ध करतात. छायाचित्रण आणि शंकर-एहसान-लॉय यांच्या संगीतामुळं ही जादू आणखीनच गहरी झाली आहे. मात्र, आजच्या काळातील कथा सादर करताना कलाकारांची हवी तशी साथ न मिळाल्यानं चित्रपट बऱ्याच अंशी फसला आहे. 


'मिर्झिया'ची कथा सुरू होते राजस्थानमध्ये. मुनीष व सुचित्रा हे दोघं शाळेत शिकत असतात. मुनीष गरीब घरातील, तर सुचित्रा बड्या पोलिस अधिकाऱ्याची मुलगी. प्रेमात पडलेल्या या जोडीला एका दुर्दैवी प्रसंगामुळं वेगळं व्हावं लागतं. अनेक वर्षं जातात आणि उच्चशिक्षित सुचित्रा पुन्हा आपल्या शहरात परतते. गुन्हेगाराचा शिक्का बसलेल्या मुनीषला स्वत:ची ओळख पुसून आदिल (हर्षवर्धन कपूर) व्हावं लागतं. सुचित्राचा (सैयामी खेर) विवाह शहरातील राजकुमार करण (अनुज चौधरी) याच्याशी ठरतो. सुचित्रा व आदिल पुन्हा भेटतात व बालपणीची ओळख पटते. करणला हे गोष्ट खटकते आणि यातून मोठा संघर्ष उभा राहतो. या कथेबरोबर पंजाबी लोककथांचा भाग असलेली मिर्झा-साहिबान यांची कथाही समांतर चालत राहते. दोन्ही कथांचा शेवट एकाच प्रकारे घडतो आणि प्रेक्षकांना चटका लावून जातो. 

गुलजार यांची कथा सांगण्याची पद्धत हेच या चित्रपटाचं वैशिष्ट्य. तरल शब्द, दिलखेचक शेर आणि त्याच्या जोडीला लोकसंगीताच्या माध्यमातून पुढं सरकणारी कथा असा मंत्रमुग्ध करणारा पट ते उभा करतात. मात्र, मध्यंतरापर्यंत समांतर चालणाऱ्या दोन कथा फारशा पुढं सरकत नाही आणि प्रेक्षकांची चुळबूळ सुरू होते. मध्यंतरानंतर मात्र कथा वेग घेते आणि शेवटाकडं जाताना उत्कंठा वाढवत नेते. दिग्दर्शक इतिहासातील कथा बर्फाळ प्रदेशात, तर आजची कथा राजस्थानातील वाळवंटामध्ये मांडत त्यांच्यातील समान दुवे उलगडून दाखवतो. गुलजार यांचे शब्द, शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत व शंकर महादेवन आणि दलेर मेहंदी यांच्या आवाजातील गाणी यांचा जबरदस्त मिलाफ चित्रपटाला वेगळी उंची देतो. नेत्रसुखद चित्रण ही चित्रपटाची आणखी जमेची बाजू. 

हर्षवर्धन कपूर आणि सियामी खेर या नवोदित कलाकारांनी ही प्रेमकथा साकारण्यासाठी मेहनत घेतली आहे. हर्षवर्धन (अनिल कपूर यांचा मुलगा) सुरवातीला खूप बुजल्यासारखा वावरला आहे. तो नि:शब्द आदिल डोळ्यांतून उभा करण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याला पुरेसं यश आलेलं नाही. उत्तरार्धात त्याचा अभिनय थोडा खुलतो. सैयामी खेरच्या (मराठी अभिनेत्री उषाकिरण यांची नात) बाबतीतही असंच घडलं आहे. प्रेमकथेला हवी असलेली आग दोघंही आपापल्या भूमिकांत ओतू शकलेले नाहीत व त्यांचं नवखेपण चित्रपटाला मारकच ठरलं आहे.

राजकुमाराच्या भूमिकेत अनुज चौधरीचं काम तुलनेनं उजवं. छोट्या भूमिकेत अंजली पाटील भाव खाऊन जाते. 

एकंदरीतच, 'इश्‍क में अक्‍सर ऐसा होता है, चोट कही लगती है, दर्द कही और होता है,' हे गुलजारांनी वापरलेलं कथासूत्र, कथा, पटकथा, दिग्दर्शक, गीत-संगीत या पातळ्यांवर उजवा असलेला हा चित्रपट अभिनयाच्या पातळीवर कमी पडतो. अशा प्रकारच्या ऍबस्ट्रॅक्‍ट प्रेमकथा पाहण्यात रस असणाऱ्या व गुलजार यांच्या चाहत्यांसाठीच हा चित्रपट आहे...इतरांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा... 

श्रेणी : 3 
निर्मिती :
रोहित खट्टर 
दिग्दर्शन : राकेश ओमप्रकाश मेहरा 
भूमिका : हर्षवर्धन कपूर, सैयामी खेर, अनुज चौधरी, अंजली पाटील, के. के. रैना आदी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com