निराश न करणारा 'सुलतान'

निराश न करणारा 'सुलतान'

सलमान खानचा सुलतान लांबलचक असला, तरी मनोरंजक आहे. अनेक चित्रपटांचे मध्यंतरानंतरचे भाग फसतात, इथं मात्र दुसरा भाग खिळवून ठेवतो. एका कुस्तीगीराच्या जीवनावरची ही काल्पनिक गोष्ट अनेक चढ-उतारांनी भरलेली आहे व तुफान हाणामारी, प्रेम, ताटातूट व पुन्हा प्रेमाचा विजय, चटपटीत संवाद असा यशस्वी चित्रपटासाठीचा मसाला तिच्यात ठासून भरलेला आहे. सलमान खाननं त्याच्या वयाला शोभणारी भूमिका जबरदस्त साकारली आहे व हाणामारीबरोबरच हळव्या प्रसंगांतही बाजी मारली आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सलमानच्या स्टारडमचा पुरेपूर उपयोगही करून घेतला आहे. अनुष्का शर्मानं हरियानी मुलीची भूमिका छान साकारली आहे व इतर सर्वच कलाकारांनी या दोघांना चांगली साथ दिल्यानं चित्रपट लक्षात राहतो.
"सुलतान‘ ही कथा सुरू होते हरियानातील एका गावात. सुलतान (सलमान खान) हा शेतकऱ्याचा मुलगा छोटे व्यवसाय करून पोट भरत असतो. गावातील दिल्लीत जाऊन कुस्तीगीर बनून आलेल्या आरफावर (अनुष्का शर्मा) त्याचं पहिल्या नजरेत प्रेम जडतं. आरफानं डिवचल्यानं तो कुस्तीगीर बनतो, तिच्या अपेक्षांप्रमाणं राज्यस्तरीय स्पर्धा जिंकतो व ऑलिंपिकचं सुवर्णपदकही जिंकून आणतो. मात्र, या यशाची हवा त्याच्या डोक्‍यात जाते. आरफानं नकार देऊनही तो एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जातो व त्याच्या कुटुंबामध्ये एक गंभीर प्रसंग घडतो. दुखावलेली आरफा सुलतानला सोडून जाते. खचलेला सुलतान सरकारी खात्यात नोकरी करीत एक स्वप्न उराशी बाळगून जगत राहतो. याच काळात मार्शल आर्टच्या एका स्पर्धेची ऑफर सुलतानला येते. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी व स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो पुन्हा उभा राहतो. दिल्लीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत करतो, स्वतःला सुदृढ बनवतो. तुफान हाणामाऱ्या रंगतात, अनेक भावुक प्रसंग निर्माण होतात व अपेक्षेप्रमाणे शेवटासह चित्रपटाचा शेवट होतो. सुलतानचं स्वप्न काय असतं, आरफा त्याला पुन्हा मिळते का, मार्शल आर्टच्या स्पर्धेचं काय होतं अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरं चित्रपटाच्या शेवटी मिळतात.

चित्रपटाच्या कथेत फारसं नावीन्य नाही आणि त्याचा फटका पहिल्या भागाला बसला आहे. अत्यंत ढोबळ प्रेमकथा, मैदानातील अविश्‍वसनीय प्रसंग आणि ओढून-ताणून आणलेले भावुक प्रसंग यांच्या माराही करण्यात आला आहे. सुलतान-आरफाचं प्रेम, त्याचं लग्न आणि वेगळं होणं हे सर्व मध्यंतरापर्यंत संपतं. मात्र, सुलतान मार्शल आर्टच्या स्पर्धेसाठी दिल्लीत दाखल झाल्यावर चित्रपट वेग घेतो. हा पूर्ण भाग खिळवूनही ठेवतो. या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यातील सामन्यांची मांडणी आणि चित्रण छान झालं आहे. प्रत्येक खेळाडूची स्पर्धा प्रतिस्पर्ध्याशी नव्हे, तर स्वतःशीच असते, असा वेगळा संदेश देण्यातही चित्रपट यशस्वी झाला आहे. शेवटी एका "डार्क हॉर्स‘चा विजय प्रेक्षकांना खूष करून जातो.

सलमान खाननं त्याच्या वयाला साजेशी भूमिका साकारली आहे आणि या चित्रपटातील संवादही (बजरंगी भाईजानप्रमाणे) त्याला शोभणारे आहेत. भूमिकेतील (हाणामारीच्या प्रसंगांसह) अनेक छटा बेमालूम साकारत त्यानं कमाल केली आहे. त्याची संवादफेक व नृत्याच्या अतरंगी लकबी त्याच्या चाहत्यांना खूष करतात. अनुष्का शर्मानं साकारलेली हरियानी मुलगीही छान. सलमानच्या मित्राच्या भूमिकेत अनंत शर्मा हा अभिनेता लक्षात राहतो. रणदीप हुडा छोट्या भूमिकेत छाप पाडतो. गाणी अनावश्‍यक असली तरी श्रवणीय आहेत. संकलनावर कष्ट घेऊन चित्रपटाची लांबी नक्कीच कमी झाली असती. मात्र, एकंदरीतच हा चित्रपट निराश नक्कीच करीत नाही.

श्रेणी : 4
निर्मिती : आदित्य चोप्रा
दिग्दर्शक : अली अब्बास जाफर
भूमिका : सलमान खान, अनुष्का शर्मा, अनंत शर्मा, रणदीप हुडा आदी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com