नृत्य साधनेची पंचविशी 

वृत्तसंस्था
बुधवार, 24 मे 2017

'पहला नशा पहला खुमार' या गाण्यावर नाचताना आमिर खान आणि आयेशा झुल्का आठवतायेत का? सध्याची प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फराह खानने हे गाणे दिग्दर्शित केले होते.

'पहला नशा पहला खुमार' या गाण्यावर नाचताना आमिर खान आणि आयेशा झुल्का आठवतायेत का? सध्याची प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फराह खानने हे गाणे दिग्दर्शित केले होते.

या चित्रपटाला आता 25 वर्षे पूर्ण झाली. तसेच फराहच्या कारकिर्दीलाही. "जो जीता वही सिकंदर' या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. खरं तर त्या काळी बॉलीवूडमध्ये प्रवेश करून टिकणे हे फार कठीण होते. त्यात फराह खानने आपली वेगळी छाप पाडून चांगली प्रगती केली. "वो लडकी है कहां' (दिल चाहता है), "रूक जा ओ दिल दिवाने' (दिलवाले दुल्हनियॉं ले जायेंगे), "छैय्या छैय्या' (दिल से) "एक पल का जिना' (कहो ना प्यार है) अशा काही निवडक गाण्यांमुळे फराह खान "द फराह खान' झाली. तिने शाहरूख खान, हृतिक रोशन, अभिषेक बच्चन, शाहिद कपूर, सैफ अली खान या अभिनेत्यांच्या गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.

पुढे आपले लक्ष फक्त नृत्य दिग्दर्शन एवढेच न ठेवता तिने आपला मोर्चा दिग्दर्शनाकडेही वळवला. 2004 मध्ये तिने दिग्दर्शित केलेला "मैं हू ना' हा पहिलाच चित्रपट होता आणि त्याला घवघवीत यश मिळाले. तिचा जिवलग मित्र शाहरूख खानबरोबर त्यानंतर तिने "ओम शांती ओम', "हॅप्पी न्यू इयर' हे चित्रपट केले. तसेच तिने दिग्दर्शित केलेले सगळेच चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर भाव खाऊन गेले.

तिने दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन याव्यतिरिक्त "इंडियन आयडॉल', "नच बलिये', "एण्टरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा', "झलक दिखला जा' अशा अनेक रिऍलिटी शोमधून परीक्षकाचे कामही केले. तसेच काही चित्रपटांतून अभिनेत्री म्हणूनही काम केले. आता तीन मुलांची आई होऊनही तिचा हा प्रवास थांबलेला नाही. फराह म्हणते, "मी स्वत:ला खूप नशीबवान समजते, की मी गेली 25 वर्षे मला जे हवे आहे ते काम करतेय. माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींनी, कुटुंबियांनी आणि चाहत्यांनी खूप प्रेम दिले; त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.'