चला, पाणी येऊ द्या...! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

गुढीपाडव्याला अद्याप अवकाश असला तरी आमीर खानने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी गुढीपूजन केले! निमित्त होते "चला, हवा येऊ द्या'च्या गुढीपाडवा विशेषचे. या भागात आमीर "चला, पाणी येऊ द्या' हे सांगण्यासाठी सहभागी झाला आहे. 

गुढीपाडव्याला अद्याप अवकाश असला तरी आमीर खानने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी गुढीपूजन केले! निमित्त होते "चला, हवा येऊ द्या'च्या गुढीपाडवा विशेषचे. या भागात आमीर "चला, पाणी येऊ द्या' हे सांगण्यासाठी सहभागी झाला आहे. 

आमीर खानचा वाढदिवस म्हणजे मीडियासाठी एक महत्त्वाचा इव्हेंट असतो. यंदाही तसा तो होता. दर वेळी आमीरचे काही वेगळेच फंडे दिसतात. यंदाही तो दिसला. वाढदिवसाच्या निमित्ताने आमीर चक्क एका कार्यक्रमाच्या शूटिंगमध्ये सहभागी झाला होता. तो कार्यक्रमही होता आपला मराठमोळा "चला हवा येऊ द्या...' पण, आमीर या वेळी आला होता तो त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नव्हे तर "चला, पाणी येऊ द्या' हे सांगण्यासाठी... 

"झी मराठी'च्या "चला हवा येऊ द्या'च्या गुढीपाडवा विशेष भागात आमीर खान दिसणार आहे. मालाड येथील एका स्टुडिओत या विशेष भागाचे चित्रीकरण पार पडले. आमीरचा वाढदिवस आणि "चला हवा येऊ द्या'चा गुढीपाडवा विशेष भाग असे दुहेरी सेलिब्रेशन तिथे झाले. आमीर खान आपली पत्नी किरण रावसह सहभागी झाला होता. सत्यजित भटकळ आणि डॉ. अविनाश पोळ ही मंडळीही या विशेष भागात सहभागी झाली होती. 
लेझिमच्या पथकाच्या तालावर आमीरचे जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी आमीर खानने पाणी फाऊंडेशनबद्दलची माहिती दिली. तो म्हणाला, की आमच्या पाणी फाऊंडेशनचे काम वर्षभर सुरू असते. गेल्या वर्षी तीन तालुके दुष्काळमुक्त झाले. या वर्षी 30 तालुके दुष्काळमुक्त करणार आहोत. याकरिता आम्ही दहा हजार जणांना ट्रेनिंग दिले आहे. ही मंडळी विविध गावांत जाऊन तेथे पाणी फाऊंडेशनच्या कामाबद्दल आणि आमच्या वॉटर कप स्पर्धेबद्दल माहिती सर्वांना देतील. वॉटर कप स्पर्धा एप्रिल-मे महिन्यात होईल आणि जून-जुलैमघ्ये परीक्षक आपला निकाल देतील. याशिवाय आम्ही एक शो बनविणार आहोत. एप्रिल महिन्यात तो करणार आहोत. मराठीतील सर्व वाहिन्यांवर तो दिसेल. तो शो आणि पाणी फाऊंडेशनची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी याकरिता आम्ही आता या "चला हवा येऊ द्या'मध्ये सहभागी झालो आहोत. पाणी फाऊंडेशनला महाराष्ट्र सरकारचे चांगले सहकार्य लाभलेले आहे, असेही आमीर म्हणाला. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा आमचा विचार आहे, असेही त्याने सांगितले. 
सत्यजित भटकळ म्हणाले, की पाणी फाऊंडेशन माझे किंवा आमीर तसेच किरणचे नाही तर हे सगळ्यांचे आहे. कारण पाणी सगळ्यांनाच हवे आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. 

"चल हवा येऊ द्या'चा सूत्रसंचालक आमीरला प्रश्‍न विचारीत होता आणि आमीर तसेच किरण राव काही प्रश्‍नांची उत्तरे मराठीतून देत होते. आमीर म्हणाला, की मला मराठी समजते; परंतु संवाद साधताना कठीण होते. साधे मराठी मी बोलू शकतो; पण कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर घाबरतो. सुरुवातीला आमीर व किरण रावच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले आणि त्यानंतर या विशेष भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली.  
 

Web Title: aamir khan in chala hawa yeu dya