आदित्य म्हणतोय, ओके जानू... 

संतोष भिंगार्डे  
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

"आशिकी 2', "ये है जवानी दिवानी', "दावत ए इश्‍क' आणि "फितूर' नंतर आदित्य रॉय कपूरचा "ओके जानू' हा चित्रपट आजपासून प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने आदित्यने दिलेली ही खास मनमोकळी मुलाखत... 

"आशिकी 2', "ये है जवानी दिवानी', "दावत ए इश्‍क' आणि "फितूर' नंतर आदित्य रॉय कपूरचा "ओके जानू' हा चित्रपट आजपासून प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने आदित्यने दिलेली ही खास मनमोकळी मुलाखत... 

 •  तुला 2016 हे वर्ष कसं गेलं आणि या वर्षाकडून तुला काय अपेक्षा आहेत? 

- मागील वर्ष चांगलंच होतं. माझा "फितूर' चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो फारसा काही चालला नाही. पण मी ती बाब मनावर घेतली नाही. कारण त्याच दरम्यानच्या कालावधीत मला "ओके जानू' या चित्रपटाची ऑफर आली. त्याचं चित्रीकरण सुरू झालं आणि आता हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याचा नक्कीच आनंद आहे. शिवाय मागील वर्षी मी एका डान्स टूरला गेलो होतो. अशा प्रकारची डान्स टूर करण्याची माझी ती पहिलीच वेळ होती. त्याकरिता खूप रिहर्सल केली. एक महिना डान्सची रिहर्सल करीत होतो. खूप टेन्शन होतं त्या टूरचं. पण एकूणच मजा आली. 

 •  "ओके जानू' हा तुझा चित्रपट प्रदर्शित होत आहे. दडपण आलंय का? 

- हो, खूपच आहे. माझा कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी माझ्यावर दडपण असतंच. कारण कोट्यवधी रुपये गुंतवलेले असतात. अनेकांनी मेहनत घेतलेली असते. एक किंवा दीड वर्ष सर्वांनी त्या प्रोजेक्‍टवर काम केलेलं असतं. त्यामुळे त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा काय मिळतोय? समीक्षक आमच्या कामाबद्दल काय बोलतात? बॉक्‍स ऑफिसवर तो चित्रपट कशी कामगिरी करतो? अशा सर्व गोष्टींमुळे दडपण येतंच. 

 • अर्थात, प्रत्येक शुक्रवार हा कलाकारासाठी महत्त्वाचा असतो. हो ना...तुला काय वाटतं? 

- शुक्रवार नक्कीच महत्त्वाचा असतो. कारण याच दिवशी चित्रपट प्रदर्शित होतो आणि एखाद्याचं करिअर बनतं. प्रत्येक शुक्रवार हा कलाकाराचं नशीब घडवत असतो. "आशिकी -2' नंतरच माझं करिअर घडलं. तत्पूर्वी मला काहीही आत्मविश्‍वास नव्हता. कोणत्या भूमिकेत आपण फिट बसू शकतो, हेही ठाऊक नव्हतं. सुरुवातीला सहकलाकार म्हणून काम केलं. त्यानंतर खूप स्ट्रगल केला आणि "आशिकी 2' नंतरच माझ्यात खरा आत्मविश्‍वास आला. त्यानंतर "दावत-ए-इश्‍क', "फितूर' असे काही चित्रपट आले. पण मी हिट आणि फ्लॉप ही बाब फारशी मनाला लावून घेतली नाही. प्रत्येक चित्रपटाकडून काही तरी शिकत राहिलो. आता तर मी माझ्या करिअरवर चांगलं लक्ष देतोय. 

 • "ओके जानू' हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. ती फिल्म तू पाहिलीस का? 

- हो "ओ कधाल कनमनी' हा तमीळ चित्रपट पाहिल्यानंतरच मला एक विश्‍वास वाटला की याचा हिंदी रिमेक नक्कीच यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे आम्ही स्क्रीन प्लेमध्ये फारसा काही बदल केला नाही. कारण त्याची आवश्‍यकता वाटली नाही. मात्र दिग्दर्शक शाद अलीने त्याच्या पद्धतीने हा चित्रपट बनवला आहे. 

 •  यामध्ये तुझी भूमिका कशा प्रकारची आहे? 

- यामध्ये मी आधी नावाचीच भूमिका साकारीत आहे. तो कानपूरचा राहणारा असतो. मुंबई शहरात तो काम करत असतो. खूप पैसा कमावणं हे त्याचं स्वप्न असतं. त्याला परदेशात जायचं असतं आणि तिथे जाऊन बक्कळ पैसा कमवावा, असं त्याला वाटत असतं. ही भूमिका खूप चांगली आहे. कारण यापूर्वी मी ज्या काही भूमिका केल्या त्या माझ्या पर्सनॅलिटीपेक्षा वेगळ्या होत्या. ही भूमिका माझ्या पर्सनॅलिटीशी मॅच होणारी आहे. आणि मी ती माझ्या स्टाईलने साकारली आहे. 

 • श्रद्धा कपूरबरोबर पुन्हा काम करताना कसं वाटलं? 

- "आशिकी-2'मध्ये श्रद्धा आणि मी एकत्र काम केलं तेव्हा ती अल्लड होती. आता ती खूप मॅच्युअर्ड झाली आहे. भूमिकेतील बारकावे तिला चांगले ठाऊक असतात. पूर्वीइतकीच मेहनत ती आपल्या भूमिकेवर घेते. मला एखादी गोष्ट तिला सांगायची असेल तर मी बिनधास्तपणे सांगतो. ती खूप टॅलेन्टेड आहे. आम्हाला दोघांना पुन्हा एकत्र काम करताना असं वाटलं की, मध्ये आमच्या मैत्रीत खंड पडला होता आणि ती आता पुन्हा सुरू झालीय. शूटिंगच्या दरम्यान आम्हीच आम्हाला पुन्हा सापडत गेलो आणि आमची पुन्हा एकदा घट्ट मैत्री झाली. 

 • तुला जोडीदार म्हणून कशी मुलगी आवडेल? 

त्या मुलीमध्ये स्पॉन्टेनिटी, ऑनेस्टी आणि तिच्या पॅशनसाठी तिनं झोकून दिलेलं असेल, अशी मुलगी माझी ड्रीम गर्ल असेल. मला अशा मुली आवडतात, ज्या त्यांच्या कामाविषयी पॅशनेट आहेत आणि त्या आपल्या ध्येयाशी बांधील आहेत, फोकस्ड आहेत. 

 • तुझं लग्नसंस्थेविषयी काय मत आहे? 

मी खूप इमोशनल मुलगा आहे. जर मी एखाद्या मुलीशी कमिटेड असेन, तर तीही माझ्याशी कमिटेड असली पाहिजे. कमिटमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि हे असंच नातं मला योग्य वाटतं. 

 • एखाद्या मुलीने तुला दिलेली छान कॉम्प्लीमेंट कुठली? 

मला आठवतंय, एक मुलगी मला असं म्हणाली होती की, तू ग्रेट हजबंड मटेरिअल आहेस. मला वाटतं तिचं हे बोलणं खूप स्वीट आहे. ही चांगली कॉम्प्लीमेंट होती, आवडली मला. 

 • हा चित्रपट "लिव्ह इन रिलेशनशिप' या विषयावर आहे. तुझा यावर कितपत विश्‍वास आहे? 

- हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. तो चांगला की वाईट हे मी सांगू शकत नाही. ते प्रत्येकाने ठरवायचं आहे. 

"हम्मा हम्मा' हे गाणं पुन्हा नव्याने घेण्याचं कारण काय? 
- तो निर्णय सर्वस्वी दिग्दर्शक व निर्मात्यांचा होता. आम्ही फक्त गाण्यावर परफॉर्म करत असतो. हम्मा हम्मा हे गाणं मलाही खूप आवडतं. हे लोकप्रिय गाणं पुन्हा घेतलं, याचा मला आनंदच आहे. 

 •  कोणती भूमिका साकारणं तुला आव्हानात्मक वाटतं? 

- कॉमेडी करणं मला आव्हानात्मक वाटतं.