अक्षयकुमारची शाळा 

शब्दांकन : भक्ती परब 
गुरुवार, 4 मे 2017

अलीकडे आपल्याला कोणी माहिती किंवा सल्ला देऊ लागलं किंवा अगदीच काही समजून सांगू लागलं की आपण म्हणतो काय राव कशाला माझी शाळा घेताय. कारण- आपल्याला कंटाळा येतो. पण, बॉलीवूडचा खिलाडी अक्षयकुमारने आपली शाळा घेतली तर... तर मात्र त्यातून खूप काही घेण्यासारखं असतं. अक्षयकुमार नेहमीच सामाजिक विषयावर भाष्य करत असतो.

अलीकडे आपल्याला कोणी माहिती किंवा सल्ला देऊ लागलं किंवा अगदीच काही समजून सांगू लागलं की आपण म्हणतो काय राव कशाला माझी शाळा घेताय. कारण- आपल्याला कंटाळा येतो. पण, बॉलीवूडचा खिलाडी अक्षयकुमारने आपली शाळा घेतली तर... तर मात्र त्यातून खूप काही घेण्यासारखं असतं. अक्षयकुमार नेहमीच सामाजिक विषयावर भाष्य करत असतो.

तो सामाजिक मुद्दे उचलून धरत काही कृती करत असतो. मग ती जवानांसाठी त्याने केलेली भरीव कामगिरी असो की मुलींसाठी खास मार्शल आर्टचे क्‍लासेस असो किंवा अगदी अलीकडेच ट्रान्स्फॉर्म महाराष्ट्रमधील त्याचा सहभाग असो. या सगळ्यातून अक्षयचा प्रामाणिकपणा आपल्याला भिडतो. नुकताच त्याने राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक साडेचार मिनिटांचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यात तो असं म्हणाला की, या निमित्तानं एका वर्षी शाळेत नापास झालो, तेव्हाचा क्षण आठवतोय. मी या मानसिक ताणात वावरत होतो की, घरी गेल्यावर मला मार मिळणार आहे. पण, माझ्या पालकांनी त्या वेळी मला समजून घेतलं. माझ्याशी ते मनमोकळेपणाने बोलले आणि माझ्या आवडी-निवडीचा पाठपुरावा करण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं. मला खेळ आवडतो, असं सांगितलं, तेव्हा त्यांनी खुशाल खेळ, असं पालकांनी सांगितलं. मला माझ्या पालकांनी तेव्हा हे समजावून सांगितलं नसतं की, माझी ताकद कशात आहे? तर आज माझ्या हाती हा पुरस्कार नसता. बातम्यांमध्ये मी असं वारंवार वाचतोय की तरुण मुलं अभ्यासाच्या ताणामुळे आत्महत्या करताहेत. आठ लाख आत्महत्या जगाभरात फक्त शिक्षण आणि नातेसंबंधातील ताण यामुळे होताहेत. यामध्ये दीड लाख लोक फक्त भारतातील आहेत. 

मला असं वाटतं. आत्महत्येचे विचार डोक्‍यात आले, तर पालकांचा विचार करा. त्यांना दुखी करू नका. अलीकडे तरुणांमध्ये प्रचंड मानसिक ताण व नैराश्‍य ही समस्या आहे. त्यासाठी वेळ पडली, तर डॉक्‍टरकडेही गेलं पाहिजे. पण याविषयी आधी पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधला पाहिजे. मुलांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, असं व्याख्यान देण्यापेक्षा त्यांच्यासाठी खास वेळ देऊन बोललं पाहिजे. मुलांनीही आपल्या पालक, मित्र व नातेवाईक यांच्याशी आपल्याला येत असणाऱ्या ताण, अडचणींविषयी बोललं पाहिजे. खरंच अक्षय कुमार जे काही बोलतो, सांगतो ते अगदी मनापासून असतं. त्यामुळेच आजच्या भाषेत "शाळा' न वाटता आपलं जवळचं कुणीतरी संवाद साधतंय, असं वाटतं. व्हिडीओच्या शेवटी त्यानं एक छान शेर सांगितला... अगर दिल खोल लेते अपने यारों के साथ तो आज दिल खोलना ना पडता औजारौं के साथ...

Web Title: akshaykumar social work