नव्या विचारांचा 'अंदाज आपला आपला' लवकरच रंगभूमीवर 

andaz apala apala marathi drama esakal news
andaz apala apala marathi drama esakal news

मुंबई : 'अंदाज आपला आपला'...नशीब असतं की नसतं यावर प्रत्येकांचे आपापले अंदाज असतात. प्रत्येकांचे वेगवेगळे मतं आणि विचार असतात. याच वेगवेगळ्या विचारांमुळे आपापसात वादविवाद आणि समज-गैरसमज होतात, या सर्वांतूनच अनेक गमतीजमती आणि मनोरंजक बाबी पुढे येतात. कीवी प्रॉडक्शनच्या सहयोगाने वेद प्रॉडक्शन निर्मित असेच एक मनोरंजक नाटक लवकरच मराठी रंगभूमीवर येत आहे. 'अंदाज आपला आपला' असे या नाटकाचे नाव असून, या नाटकातील पात्रांचे परस्परांहून भिन्न असे मतं आणि विचार आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

ही सर्व पात्र जेवढी आपल्या विचारांवर ठाम आहेत, तेवढीच दुसऱ्यांच्या विचाराला त्यांचा विरोध आहे, मात्र त्यांचे एकमेकांवर अमाप प्रेम असल्यामुळे, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी झालेली त्यांची गत प्रेक्षकाचे धम्माल मनोरंजन करणारे ठरणार आहे. कारण प्रत्यक्षात ही पात्र ज्या गोष्टीला आपले विचार, मतं किवा तत्व समजतात ते फक्त त्यांचे अंदाज आहेत. आपापल्या अंदाजावर ठाम असलेले हे प्रत्येकजण दुसऱ्यांचा अंदाज खोटे ठरवण्यासाठी कसा धडपडतो, स्वतःचा अंदाज बरोबर ठरवण्यासाठी दुसऱ्यांवर कसा कुरघोडी करतो, याची धम्माल यात पाहायला मिळणार आहे. स्वतःचेच घोडे पुढे दामटू पाहणा-या या पात्रांचा हा गाढवपणा प्रेक्षकांना लोटपोट करून हसवणारा ठरणार आहे. 

प्रयोगाला येणारे रसिकही आपापले अंदाज बांधत नाटकाला येत असतात, त्यामुळे धम्माल, धमासान तसेच पैसा वसूल करणारे नाटक असा अंदाज घेऊन जर हे नाटक पाहायला जाणार असाल, तर तुमचा अंदाज सार्थकी लावणारे हे नाटक आहे. 'अंदाज' या संकल्पनेवर आधारित असलेल्या या घरंदाज नाटकाचे लेखन राजेश कोळंबकर यांनी केले असून, धम्माल दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या संतोष पवारचे दिग्दर्शन त्याला लाभले आहे, शिवाय संतोषने यात अभिनयदेखील केला असून. त्याच्यासोबतीला माधवी गोगटे ही अनुभवी अभिनेत्री पुन्हा एकदा रंगभूमीवर हास्यमैफल रंगवण्यास सज्ज झाली आहे. त्यांच्यासोब्तीला 'कन्यादान' या मालिकेतून नावारूपास आलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री मधुरा देशपांडे यात झळकणार असून,  अक्षय केळकर हा देखणा चेहरादेखील या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर पदार्पण करीत आहे.

रसिकांचा वेळ सार्थकी लावण्यासाठी आणि दोन तास नाट्यगृहात खिळवून ठेवण्यासाठी, यात धम्माल गाणी, गझल आणि एका रोमेंटिक सॉंगचादेखील वापर करण्यात आला आहे. प्रसिद्ध नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य यात असून, साई-पियुष यांचे संगीत, आणि अंजली खोबरेकर यांची वेशभूषा या नाटकाला लाभली आहे. तसेच प्रसिद्ध कोरियोग्राफर मयूर वैद्य यांचे नृत्यदिग्दर्शन यात असून, अनुभवी आणि नवोदित कलाकारांचे मिश्रण आपल्याला यात पाहायला मिळणार आहे.  सध्या या नाटकाची जोरदार तालीम सुरु आहे. ३ नोव्हेंबर रोजी गडकरी रंगातयन येथे या नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार असून, भरपेट मनोरंजनाचा अंदाज खरा ठरवणा-या या नाटकाचा लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात दौरा सुरु होणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com