बद्री आणि वरुण! 

संतोष भिंगार्डे 
गुरुवार, 9 मार्च 2017

बॉलीवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता वरुण धवन "बद्रीनाथ की दुल्हनियां' चित्रपटातून आलिया भटबरोबर प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय. आलिया-वरुण जोडीचा हा तिसरा चित्रपट आहे. कशी आहे बद्रीची दुल्हन? 

बॉलीवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता वरुण धवन "बद्रीनाथ की दुल्हनियां' चित्रपटातून आलिया भटबरोबर प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय. आलिया-वरुण जोडीचा हा तिसरा चित्रपट आहे. कशी आहे बद्रीची दुल्हन? 

आजच्या तरुण पिढीचा तू आयकॉन आहेस. तुला फॉलो केलं जातंय. कसं वाटतंय? 
- आनंद तर होतोच; परंतु त्याबरोबरच आपली जबाबदारी किती वाढलीय हेही जाणवतं. कारण आपल्याला कुणी फॉलो करताहेत म्हटल्यानंतर चित्रपट स्वीकारताना अगदी बारीकसारीक गोष्टींचा विचार करावा लागतो. माझी भूमिका, दिग्दर्शक आणि बॅनर्सबरोबरच संगीताचाही विचार करावा लागतो. संगीत चांगलं असणंही तितकंच आवश्‍यक झालं आहे. माझे केवळ चित्रपट पाहूनच ही मंडळी खूश झाली पाहिजेत असे काही नाही. तर माझ्या चित्रपटातील गाण्यांवर ही पिढी थिरकली पाहिजे, असं मला वाटतं. त्यामुळे याचाच विचार करून मी चित्रपट स्वीकारतो; परंतु यशस्वी अभिनेता होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते हे मी सर्वांना सांगू इच्छितो. हे सर्व यश मला एका झटक्‍यात मिळालेलं नाही. त्याकरिता मला खूप कष्ट घ्यावे लागले. मला फॉलो करणाऱ्यांनी हेही समजून घ्यायला हवं की यश इन्स्टंट नाही मिळत. मेहनतीला पर्याय नसतोच. 

 पुन्हा तुझा चित्रपट प्रदर्शित होण्याची वेळ आलीय. टेन्शन आहे? 
- टेन्शनपेक्षा उत्सुकता जास्त आहे. हे प्रत्येक सिनेमाबाबतच होत असतं. कारण आपण काम चांगलं केलेलं असतं. आपल्या कामावर आपला विश्‍वास असतो. अख्ख्या युनिटने मेहनत घेतलेली असते. बारा-सोळा तास राबलेलो असतो आणि त्या साऱ्या मेहनतीचं काय झालंय याचा रिझल्ट एकाच दिवशी अर्थात शुक्रवारी लागणार असतो. म्हणजे त्या दिवशी आम्ही दिलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होणार की नाही ते कळणार असतं. त्यामुळे मनाला उत्सुकता लागलेली असते; मात्र यश किंवा अपयश हे सर्वस्वी प्रेक्षकांच्या हाती असतं. त्यांनी एखाद्या कलाकृतीचं चांगलं स्वागत केलं की त्याचा आनंद मोठा असतो. अपयश आलं तर मनात नाराजी निर्माण होते खरी; पण अपयश आलं म्हणून खचून जाता कामा नये. नव्या जोमाने आणि उत्साहाने पुन्हा काम करावं, असंच मी सांगेन. कारण ही इंडस्ट्री अशी आहे की, एखाद्याला एकाच दिवशी ती स्टार बनवेल तर एखाद्याला घरीदेखील बसवेल. शेवटी हा सगळा नशिबाचा खेळ आहे. 

"हम्टी शर्मा की दुल्हनिया' घेऊन तूच आला होता आणि आता "बद्रीनाथ की दुल्हनियां' घेऊन पण तूच येतोयस... तू काय सिद्ध करतोयस... दिलवाले है इसलिये दुल्हनिया हमही ले आयेंगे? 
- दिलवाले तो हम है ही.. दुल्हनियां घेऊन येण्यामागचं कारण मात्र हेच की या दोन्ही चित्रपटांची कथा वेगळी आहे. हम्टीपेक्षा बद्रीची भूमिका मला अधिक आव्हानात्मक वाटली. बद्री हा झांशी येथे राहणारा तरुण असतो, तर यातील तरुणी अर्थात चित्रपटाची नायिका वैदेही ही कोटा येथे राहणारी असते. या दोन्ही ठिकाणचं अंतर चार तासांचं आहे. खरं तर आपल्या भारत देशात चार तासांच्या अंतरावर भाषा आणि तेथील लोकांचे आचारविचार तसेच राहणीमान बदलत असतं; मात्र प्रेमाची भाषा ही सगळीकडे एकसारखीच असते. आमच्या या चित्रपटात हेच दाखवलं आहे. या दोन्ही शहरांत चार तासांचं अंतर असतं खरं. अर्थात प्रेम हा धागा समान आहेच या सगळ्यातला. 

बद्रीची भूमिका हॅपी गो लकी आहे का...? 
- ही भूमिका हॅपी आहे; पण लकी अजिबात नाही. त्याचा स्वभाव तापट आहे. मी आतापर्यंत केलेल्या चित्रपटापेक्षा ही वेगळी भूमिका आहे. यासाठी मला तितकीच मेहनत घ्यावी लागली आहे. या चित्रपटाचा अनुभव वेगळा होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक खेतानबरोबरचा माझा हा दुसरा चित्रपट आहे आणि त्यानेच मला यातील भूमिकेकरिता चांगल्या टिप्स दिल्या आहेत. आम्ही संवादावर मेहनत घेतली. आमच्या कार्यालयात रिहर्सल केली. 

आलिया वैदेहीची भूमिका साकारीत आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तू वैदेहीला बराच इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोस असं दिसतंय... 
- बद्री वैदेहीला इम्प्रेस करण्याचा खूप प्रयत्न करीत असतो; पण त्याला काही ती दाद देत नाही. कारण कोटा हे एक आयआयटी हब आहे. तेथे अनेक हुशार विद्यार्थी राहत असतात. बद्री हा फारसा शिकलेला नसतो. तरीही तो वैदेहीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. त्या दोघांमध्ये जणू काही प्रश्‍नोत्तरांची सरबत्ती सुरू होते. मग पुढे हा चित्रपट कसं वळण घेतो याचं चित्रण दिग्दर्शक शशांक खेतानने कमालीचं दाखविलं आहे. 

आलियाबरोबर तुझा हा तिसरा चित्रपट आहे. तिच्याबद्दल...? 
- आलिया चांगली कलाकार आहे. सेटवर ती सतत हलवा खात होती. ती खूप खादाड आहे. मी मात्र रोटी आणि भाजी खात होतो. 

सध्या चित्रपटात जुनी गाणी रिक्रिएट केली जातायत, याचं कारण काय असावं? 
- हा ट्रेण्ड तर गेली काही वर्षे सुरू आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही. 

या चित्रपटात "थानेदार'मधील "तम्मा तम्मा...' हे गाणं आहे. या गाण्यासाठी तुला माधुरीने काही टेप्स शिकविल्या. त्याबद्दल काय सांगशील? 
- हो... खूप मजा आली हे गाणं करताना. 

या चित्रपटात ऍक्‍शन किती आहे आणि ड्रामा किती आहे? 
- ही एक लव्ह स्टोरी आहे. यामध्ये ऍक्‍शन थोडी आहे; परंतु ड्रामा आणि लव्ह स्टोरीचा योग्य मेळ आहे. यातील कॉमेडी नक्कीच सगळ्यांना आवडेल. 

''जुडवा 2' चित्रपटात तू दुहेरी भूमिका करीत आहेस, त्याबद्दल काय सांगशील? 
- राजा आणि प्रेम अशी त्या भूमिकांची नावं आहेत. यातील राजा ही व्यक्तिरेखा मराठी आहे आणि याकरिता मला मराठी भाषा शिकावी लागली. माझ्या आजूबाजूला असणारी बरीचशी मंडळी मराठी आहेत. त्यांच्याकडून मला चांगल्या टिप्स मिळाल्या. मी मराठी चित्रपट "सैराट' पाहिला. मला तो खूप आवडला. "जुडवा'चं काही चित्रीकरण झालं आहे; पण बरंचसं बाकी आहे.