बाहुबली 2: पहाटे 4चा शो, 10 लाख ऑनलाईन बुकिंग

टीम ई सकाळ
गुरुवार, 27 एप्रिल 2017

...म्हणून कटप्पाने बाहुबलीला मारलं?

याबाबतचा तुमचा अंदाज किंवा तुमचं उत्तर बातमीखालील प्रतिक्रियांमध्ये व्यक्त करा. किंवा eSakalUpdate येथे ट्विट करा. कल्पक व योग्य उत्तरांना प्रसिद्धी दिली जाईल.

चेन्नई : भव्य सेट, स्पेशल इफेक्ट्स, सर्वांत जास्त बजेट आणि सर्वाधिक कमाई यामुळे मागील दोन वर्षांपासून बॉलिवूडसह इतर चित्रपटसृष्टींमध्येही चर्चेत असलेल्या 'बाहुबली'चा पुढील भाग 'बाहुबली 2 : द कनक्लुजन' प्रदर्शित होण्याआधीच ऑनलाईन तिकिटांवर अक्षरशः उड्या पडल्या आहेत. हा प्रतिसाद पाहता दंगल चित्रपटाच्या कमाईचा विक्रम 'बाहुबली' पहिल्या दिवशी मोडेल अशी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

'बाहुबली'साठी आतापर्यंत दहा लाखांहून अधिक ऑनलाईन तिकीट खरेदी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबतचा नेमका अंतिम आकडा अद्याप स्पष्ट झाला नसला तरी 'कटप्पाने बाहुबलीला का मारले' हे जाणून घेण्यासाठी रसिकांमध्ये असलेली प्रचंड उत्सुकता बॉक्स ऑफिसवर स्पष्ट दिसत आहे. विविध भाषांमध्ये बाहुबली पाहण्यासाठी अनेक संकेतस्थळांवरून ऑनलाईन तिकिटे बुक करण्यासाठी मंगळवारपासूनच टेक सॅव्ही लोक धडपडत आहेत. दरम्यान, काही मोजक्या चित्रपटगृहांमध्ये गुरुवारी रात्री साडेआठ वाजल्यापासूनच बाहुबली प्रदर्शित करण्यात येणार आहे.

'कटप्पाने बाहुबलीला का मारले' याचं उत्तर सर्वांत आधी जाणून घेऊन त्याबद्दल सोशल मीडियावरून मित्रांना सांगण्यासाठी अनेकांमध्ये एक अघोषित स्पर्धाच लागली आहे. 'बाहुबली 2'ची क्रेझ एवढी आहे की तिकिटांसाठीची मागणी पाहून चित्रपटगृहांच्या मालकांनी पहाटे 4 वाजल्यापासून शो ठेवले आहेत. ते पाहण्यासाठी 600 रुपये खर्च करून तिकिटे घेतली जात आहेत. हैदराबादसह काही ठिकाणी तर तिकिटाचा भाव 5000 रुपयांच्या पुढे गेल्याचे सांगण्यात आले. या चित्रपटाचा एक खेळ पाहण्यासाठी पाच हजारांहून अधिक रुपये मोजण्याची लोकांची तयारी आहे, यावरूनच 'बाहुबली'ने रसिकांना किती वेड लावलंय हे लक्षात येतं. 

मंगळवारपासून ऑनलाईन तिकिटे आणि बुधवारपासून सिंगल स्क्रीन व मल्टिप्लेक्सच्या बॉक्स ऑफिसवर तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तेव्हापासून तिकीट खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. कर्नाटकची राजधानी बंगळूरमध्ये 30 सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये 'बाहुबली-2' तेलुगू भाषेतून प्रदर्शित करण्यात येणार आहे. आणि या केवळ 30 चित्रपटगृहांमध्ये पहिल्या दिवशी 'बाहुबली-2'चे एकूण 130 खेळ ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी दिवसात चार तर काही ठिकाणी 5 खेळ दाखविण्यात येणार आहेत. 

'बाहुबली - द बिगिनिंग' हा पहिला भाग 2015मध्ये प्रदर्शित करण्यात आला तेव्हा 600 कोटी रुपयांची कमाई झाली होती. या चित्रपटाबद्दल पद्धतशीरपणे अतिप्रसिद्धी करण्यात आली, आणि त्याबद्दल रसिकांमध्ये क्रेझ वाढविण्यात आली, असे मत काहीजण व्यक्त करीत आहेत.