विद्या एके विद्या (नवा चित्रपट - बेगम जान)

vidya-balan
vidya-balan

सन 2015 मध्ये श्रीजीत मुखर्जीने "राजकहिनी' हा बंगाली चित्रपट बनविला होता. या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तेव्हा श्रीजीतने या बंगाली चित्रपटात काम करण्यासाठी विद्या बालनला विचारले होते; परंतु बिझी शेड्युल्डमुळे ते काही तिला शक्‍य झाले नाही. मात्र, या बंगाली चित्रपटाचा हिंदी रिमेक बनविण्याचा निर्णय गेल्या वर्षी भट कॅम्प आणि श्रीजीतने घेतला, तेव्हा त्याला विद्याची पुन्हा एकदा आठवण आली आणि हा योग जुळून आला आहे.

या चित्रपटाची कथा आहे भारत व पाकिस्तान फाळणीच्या वेळेची. भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा ठरविली जाते. सर रॅडक्‍लिफ एक सीमारेषा आखून देतात. पण सरकारी अधिकारी श्रीवास्तव (आशीष विद्यार्थी) व इलियास (रजत कपूर) सीमारेषेची आखणी करायला जातात, तेव्हा त्यांच्या लक्षात येते की या सीमारेषेच्या मधोमध बेगम जान (विद्या बालन)चा कुंटणखाना आहे. तो अर्धा भारतात आणि अर्धा पाकिस्तानात असतो. त्यामुळे हे सरकारी अधिकारी बेगम जानला हा कुंटणखाना खाली करण्याची एक महिन्याची नोटीस बजावतात; मात्र बेगम जान हा कुंटणखाना सोडण्यास तयार नसते. कारण- ती त्याला जणू काही आपले घरच मानत असते. तीच नाही, तर तिच्याबरोबर राहणाऱ्या अन्य मुलीही त्याला आपले घरच मानत असतात. मग हा कुंटणखाना खाली कसा करायचा, असा प्रश्‍न पडतो. त्याकरिता कबीर (चंकी पांडे) या खलनायकावर ही कामगिरी सोपविली जाते. तो आपल्या पद्धतीने हा कुंटणखाना खाली करून देण्याचे आश्‍वासन त्यांना देतो आणि चित्रपट हळूहळू पुढे सरकतो.

भारत आणि पाकिस्तान यांच्या विभाजनावर कित्येक चित्रपट आले असले तरी बेगम जान हा चित्रपट काहीसा वेगळ्या पठडीत मोडणारा चित्रपट आहे. फाळणीच्या वेळचा तो काळ, तेव्हा वेश्‍यांच्या जगण्यावर झालेला परिणाम, त्या वेळची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती... तसेच कुंटणखाना हटविण्यास असलेला बेगम जानचा विरोध आणि त्याविरोधात त्यांनी पुकारलेला लढा... अशा सर्व गोष्टी दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जीने छान टिपलेल्या आहेत. विद्या बालन, नसिरुद्दीन शाह, आशीष विद्यार्थी, रजत कपूर, राजेश शर्मा, पल्लवी शारदा, चंकी पांडे, गौहर खान आदी कलाकारांनी आपल्या अभिनयाने या चित्रपटाच्या कथानकाला योग्य न्याय दिला आहे. विशेष कौतुक करावे लागेल ते विद्या बालनचे. तिचा अभिनय रॉकिंग झाला आहे. विद्या ही बॉलीवूडची परफेक्‍शनिस्ट आणि पर्टिक्‍युलर अभिनेत्री मानली जाते. भूमिका निवडण्याच्या बाबतीत ती खूप चुझी असते. बेगम जान हा चित्रपट पाहिल्यानंतर पुन्हा त्याची खात्री पटल्याशिवाय राहत नाही. संपूर्ण चित्रपट जणू काही तिने आपल्याच खांद्यावर पेलला आहे. बेगम जानचा हा बिनधास्त आणि बेधडक रोल तिने मोठ्या वकुबीने साकारला आहे. नसिरुद्दीन शाह यांनी राजाची भूमिका साकारली आहे. मध्यांतरानंतर त्यांची एन्ट्री होते; पण त्यांची भूमिका लक्षात राहणारीच आहे. चित्रपटातील संवाद ही या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू आहे. त्याकरिता श्रीजीतचे कौतुक करावेच लागेल.

सिनेमॅटोग्राफर गोपू भगत आहेत. त्यांचा कॅमेरा बोलका झाला आहे. विशेष म्हणजे ड्रोन कॅमेऱ्याचा केलेला वापर परिणामकारक झाला आहे. मात्र, चित्रपटाचे संगीत निराशादायक आहे. कोणतेही गाणे लक्षात राहत नाही; शिवाय चित्रपट संथ गतीने पुढे सरकत जातो. चित्रपट वेगाने पुढे सरकला असता, तर त्याचा रिझल्ट आणखी चांगला मिळाला असता. शिवाय महत्त्वाचे म्हणजे कबीर या व्यक्तिरेखेची गजरच काय, असा प्रश्‍न चित्रपट पाहताना पडतो. काही दृश्‍यांचा संदर्भ लागत नाही. मनोरंजनाच्या पातळीवर हा चित्रपट निराशा करतो. विद्या बालनचे तुम्ही फॅन असाल तर हा चित्रपट पाहायला हरकत नाही. कारण- विद्या एके विद्या आणि तिचा जबरदस्त परफॉर्मन्स म्हणजे बेगम जान. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com