पडद्यावरची "प्यारी' मॉं! 

भक्ती परब 
शुक्रवार, 19 मे 2017

कलावंत आपल्या कलेतून एका अमूर्ततेचा ध्यास घेत असतो. हा ध्यास त्याला कधी स्वस्थ बसू देत नाही. असा ध्यास घेणाऱ्यांपैकी एक गुणी अभिनेत्री रिमा लागू. त्यांनी हिंदी-मराठी सिनेमा, मालिका, नाटक आणि जाहिरातींमधून आपल्या अभिनयाची ताकद वेळोवेळो दाखवून दिली; पण त्यांच्या खास लक्षात राहणाऱ्या भूमिका या आईच्या आणि आईपणाच्या वेगळ्या व्याख्या मांडणाऱ्या होत्या. पडद्यावरच्या "प्यारी' "मॉं'ला ही आदरांजली... 

कलावंत आपल्या कलेतून एका अमूर्ततेचा ध्यास घेत असतो. हा ध्यास त्याला कधी स्वस्थ बसू देत नाही. असा ध्यास घेणाऱ्यांपैकी एक गुणी अभिनेत्री रिमा लागू. त्यांनी हिंदी-मराठी सिनेमा, मालिका, नाटक आणि जाहिरातींमधून आपल्या अभिनयाची ताकद वेळोवेळो दाखवून दिली; पण त्यांच्या खास लक्षात राहणाऱ्या भूमिका या आईच्या आणि आईपणाच्या वेगळ्या व्याख्या मांडणाऱ्या होत्या. पडद्यावरच्या "प्यारी' "मॉं'ला ही आदरांजली... 

रिमा लागू आजच्या पिढीच्या आईचे मूर्तिमंत स्वरूप. सिनेमात मुख्य अभिनेता किंवा अभिनेत्रीची आई म्हणजे सहायक कलाकाराची भूमिका; पण रिमाजींनी त्यांच्या ममता आणि वात्सल्याने समरसून ती भूमिका अशी काही साकारावी की त्यांची मुख्य भूमिका आहे की अगदी काहीच दृश्‍यांपुरती याचे भानच राहू नये. त्यांच्याबद्दल लिहिताना त्यांचा एकेक सिनेमा नजरेसमोर तरळतोय. राजश्री प्रॉडक्‍शनच्या "हम साथ साथ है' सिनेमातल्या एका दृश्‍यात... त्यांच्या तिन्ही सुना नटून थटून बसल्यात, गोकुळाष्टमीचा सण आहे. त्या लाडक्‍या कान्हाची म्हणजेच त्यांच्या तिन्ही मुलांची त्यांच्याकडेच लाडे लाडे तक्रार करताहेत... मग गाणे सुरू होते... "मय्या यशोदा, ये तेरा कन्हय्या, पनघट पे मेरे पकडे है बैया...' तर या गाण्यात "मय्या यशोदा' हे दोन शब्द जेव्हा उच्चारले जातात, तेव्हा कॅमेरा रिमाजींच्या चेहऱ्यावर येतो. तेव्हा जो त्यांचा ममतेने ओतप्रोत असा प्रेमळ चेहरा दिसतो ना... प्रेक्षकांच्या तोंडून पटकन निघून जाते, आई असावी तर अशीच... 

मय्या यशोदा हे गाणेच नाही... याच सिनेमातले "ये तो सच है की भगवान है' या गाण्यात त्यांची तिन्ही मुले त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गाणे म्हणतात. त्यात एक असे कडवे आहे की- 
जन्म देती है जो, 
मॉं जिसे जग कहे, 
अपनी संतान में प्राण जिसके रहे, 
लोरिया होठों पर, 
सपने बुनती नजर, 
नींद जो वार दे, 
हॅंस के हर दुःख सहे, 
ममता के रूप में है प्रभू, 
आपसे पाया ये वरदान है...धरती पे... 

हे संपूर्ण कडवे गायले जात असताना रिमाजींनी चेहऱ्यावर आईची माया दाखवणारा जो आंगिक अभिनय केलाय, त्याला तोड नाही. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. त्यातही आवर्जून उल्लेख करावा अशी "वास्तव'मध्ये त्यांनी साकारलेली रघूची आई शांताची भूमिका. या सिनेमातला शेवटचा सीन अंगावर काटा आणतो. आई-मुलाच्या नात्यातील असे दृश्‍य क्वचितच कुठल्या सिनेमात असेल. सिनेमाचा शेवट अजिबात न विसरता येण्यासारखा आहे. रघू आणि त्याच्या आईमधला तो संवाद हे रिमाजींच्या अभिनय कारकिर्दीतले मानाचे पान. त्यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये आईच्या भूमिका केल्यात. त्यापैकी "कयामत से कयामत तक', "मैने प्यार किया', "आशिकी', "साजन', "दिलवाले', "हम आपके है कौन', "जुडवा', "येस बॉस', "कुछ कुछ होता है', "हम साथ साथ है', "वास्तव', "जिस देश में गंगा रहता है', "कल हो ना' ही नावे घेतल्याशिवाय त्यांच्याविषयी बोलणे केवळ अशक्‍य. 

राजश्री प्रॉडक्‍शनसोबत त्यांचे अनोखे नाते होते. "मैने प्यार किया', "हम आपके है कौन', "हम साथ साथ है' यातल्या रिमाजींनी साकारलेल्या भूमिका म्हणजे आईपणाची नवी व्याख्याच मांडणाऱ्या होत्या. त्या भूमिकांमध्ये रिमाजींशिवाय दुसरे कोणी ही कल्पनाही करू नये. इतक्‍या अप्रतिम त्यांनी त्या वठवल्या. प्रेम या नावाने त्यांनी मारलेली हाक अजूनही प्रेक्षकांच्या कानी येईल. इतके त्या भूमिकेतील आईच्या हाकेत वात्सल्य होते. सलमान खानची आई असेही त्यांना संबोधले जायचे. पडद्यावर त्या खरेच सलमानने साकारलेल्या प्रेमच्या आई वाटायच्या. राजश्री प्रॉडक्‍शनचे सिनेमे म्हणजे संस्कारी सिनेमे अशी ओळख; पण रिमाजींनी त्यांच्या संवादामधून जे आईपण दाखवले, ते कधीच अती वाटले नाही. अलीकडे आपण अतिशय भावनिक विषयावर कोण बोलायला लागले की अरे थांब... बस्स नको, असे वाटते. कारण आपल्याला ती खोटी आपुलकी वाटते; पण तुम्ही रिमाजींच्या आईच्या भूमिकेतील संवाद पाहताना किंवा ऐकताना असे वाटत नाही. इतकी सहजता त्यांच्या अभिनयात होती. 
बॉलीवूडच्या आताच्या आघाडीच्या अभिनेत्यांच्या त्या आई झाल्या होत्या. त्यांच्याशी खऱ्या आयुष्यातही त्यांचे आई-मुलाचे नाते होते. हिंदीत काम करत असताना त्या मराठी सिनेमा आणि नाटकापासून अजिबात दूर गेल्या नाहीत. हिंदी-मराठी सिनेसृष्टी, हिंदी-मराठी मालिका आणि नाटके अशा माध्यमांमध्ये आपला वावर कायम ठेवला. 
"सिंहासन', "शुभमंगल सावधान', "बिनधास्त', "आई शपथ', "सावली', "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', "घो मला असला हवा', "अनुमती', "कट्यार काळजात घुसली' (कट्यारीचा आवाज), "जाऊ द्यां ना बाळासाहेब' अशी त्यांच्या मराठी सिनेमांची नावे या क्षणी आठवताहेत. त्यात खास उल्लेख करावी अशी बिनधास्त आणि सावलीमधील त्यांची भूमिका. या दोन्ही सिनेमांतील त्यांच्या भूमिकेमध्ये जे वेगळेपण बघायला मिळालेय, हे केवळ अप्रतिम. त्यांच्यातल्या आईपणाला आपलेपणाची जी किनार लाभायची ती खास त्यांच्या शैलीमुळे. या शैलीला आपण आता मुकलो आहोत. 
मुलाला पाहून हंबरडा फोडणे म्हणजेच आईपण दाखवणे नव्हे तर डोळ्यांतून वात्सल्याची ओढ दाखवणेही आईपण असते हे रिमाजींनी दाखवून दिले. आईच्या भूमिकेला त्यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आई म्हणजे अगदी कारुण्याची, ममतेची साक्षात मूर्ती अशी जी प्रतिमा होती त्याला छेद दिला असे म्हणता येईल. त्यांनी साकारलेली आई चेहऱ्याने खास करून डोळ्यांनीच जास्त व्यक्त व्हायची आणि संवादाची त्याला जोड मिळाली की लाजवाब. दुसरा शब्दच नाही. 

हिंदी-मराठी सिनेमात त्या अभिनय करत होत्या तरी त्यांची मालिकांमधून खास ओळख बनली होती. त्यांच्यातल्या विनोदी अभिनेत्रीचे दर्शन मालिकांमुळे प्रेक्षकांना होऊ शकले. लहानपणी त्यांची "श्रीमान श्रीमती' ही मालिका लागायची. ती मालिका निखळ विनोदी मालिका म्हणून लोकप्रिय होतीच; पण यातील कलाकारांचेही छान सूर जुळले होते. रिमाजींनी साकारलेली कोकिला कुलकर्णी प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत. त्यानंतर "तू तू मै मै' मालिकेत सुप्रिया पिळगावकर आणि रिमाजींची जुगलबंदी लय भारीच होती. वर्णन करायला शब्दच नाहीत. नुकतीच त्यांची भूमिका असलेली "नामकरण' मालिका स्टार प्लसवर सुरू होती. त्यात त्या दयावंती मेहताची भूमिका त्या साकारत होत्या. 

'सासू माझी ढॉंसू' या नाटकाच्या प्रयोगाला शिवाजी मंदिरला त्यांच्याशी भेट झाली होती. तीच भेट शेवटची ठरली. साक्षात आईला भेटल्याचाच तो अनुभव होता. 
हिंदी सिनेसृष्टी मातृत्वाला पारखी झालीय, अशी भावना समस्त बॉलीवूडकर व्यक्त करताहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रही त्यांच्या रूपात एका हरहुन्नरी अभिनेत्रीला मुकले आहे. अभिनय कलेतील न भरून निघणारे हे स्थान जे ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ आहे. रिमाजींच्या अभिनयातील ममत्वाने ते सदैव लखलखत राहील.  
 

Web Title: Bollywood Maa Rima lagu