लहानग्यांचा अभिनय मस्तच.. 

तेजल गावडे 
मंगळवार, 18 एप्रिल 2017

कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिका करून सर्व रसिकांना आपलेसे करणारे अभिनेते बोमन इराणी "सोनी टेलिव्हिजन'वरील "सबसे बडा कलाकार' या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहेत. त्यानिमित्ताने केलेली ही बातचीत- 

कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिका करून सर्व रसिकांना आपलेसे करणारे अभिनेते बोमन इराणी "सोनी टेलिव्हिजन'वरील "सबसे बडा कलाकार' या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहेत. त्यानिमित्ताने केलेली ही बातचीत- 

'सबसे बडा कलाकार' या शोबद्दल तुम्ही काय सांगाल? 
- माझ्या आईला नेहमीच वाटायचं की, मी चांगला कलाकार बनू शकतो. त्यामुळे मी अभिनय क्षेत्राकडे वाटचाल केली. मात्र त्या काळात लहानपणी तसं वातावरण नव्हतं. कोणत्या रंगमंचावर परफॉर्मन्स करता येईल हेही माहीत नव्हतं. हल्लीच्या मुलांना अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळतो आहे ही खूप चांगली बाब आहे. "सबसे बडा कलाकार' या शोचे जे गुरू आहेत, ते सगळे चांगले कलाकार असून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवलेले आहेत. या शोच्या ऑडिशनला खूप मुले आली होती. त्यांनी खूप छान सादरीकरण केले होते. त्यातील काही मुलांची निवड झाली. मुलांच्या अभिनयात बराच फरक पाहायला मिळाला. गुरूंनी त्यांच्यावर खूप मेहनत घेतली आहे. 

या शोमधील स्पर्धकांना भविष्यात काय फायदा होईल? 
- या शोच्या माध्यमातून भविष्यात खूप चांगला कलाकार या इंडस्ट्रीला मिळेल. यातून निवडून आलेला बालकलाकार मोठा झाल्यावर चांगला कलाकार बनू शकतो. यात सहभागी झालेल्या मुलांमधील आत्मविश्वास वाढेल. 

आतापर्यंत मुलांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? 
- लहान मुलांसोबत काम करणं खूप सोपं आहे. त्यांच्यासोबत काम करायला खूप मजा येते. ती शिकण्यासाठी कधीही तयार असतात. ते सांगितलेल्या गोष्टी ऐकतात. तसेच ते खूपच चांगले सादरीकरण करतात. न घाबरता ते परफॉर्मन्स करतात. ते मनापासून खरे बोलतात व वागतात. आम्ही इथे काम करायला येतो. त्यामुळे इथे आम्हाला आरामदायी खुर्चीत बसून एकापेक्षा एक दमदार परफॉर्मन्स पाहायचे आहेत. जगातील हा सर्वात चांगला जॉब आहे. त्यांचे परफॉर्मन्स पाहायला अजिबात कंटाळा येत नाही. आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला अशा शोचं परीक्षण करायला मिळतंय. 

अर्शद वारसी आणि तुम्ही याआधीही एकत्र काम केले आहे... त्याच्याबद्दल काय सांगाल? 
- हा छान योगयोग आहे. मी वयाच्या पस्तिसाव्या वर्षी पहिले संगीत नाटक केले होते. ज्याचे नृत्य-दिग्दर्शन अर्शद वारसीने केले होते. त्यानंतर नऊ वर्षांनी मी पहिला चित्रपट केला "मुन्नाभाई एम. बी. बी. एस.' यात अर्शदही होता आणि आज मी टेलिव्हिजनवर पदार्पण करतोय तेव्हाही अर्शद बरोबर आहे. तो नेहमी आनंदी असतो आणि मला सकारात्मक ऊर्जा असणाऱ्या व्यक्तीसोबत राहायला व काम करायला खूप आवडतं. 

मराठी चित्रपट "व्हेंटिलेटर'मध्ये तुम्ही काम केलं, हा अनुभव कसा होता? 
- मी दोन मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यातील एक "व्हेंटिलेटर' आणि दुसरा महेश मांजरेकरांच्या एका चित्रपटात स्पेशल अपियरन्स केला आहे. हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही. "व्हेंटिलेटर'मध्ये एकूण 24 कलाकार होते. यात मी डॉक्‍टरचा रोल केला होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी मला जाणवले, की मराठी कलाकार खूप अप्रतिम काम करतात. त्यांचे त्यांच्या कामावर खूप प्रेम आहे. त्यांचे लिखाण व विषय खूप चांगले आहेत. मराठी लोक चित्रपट कलाप्रकार म्हणून पाहायला जातात. त्यांना निव्वळ मनोरंजन नको असते. त्यामुळे मराठीत वेगवेगळे विषय हाताळले जातात. कलाकार खूपच मेहनती असतात. 

मुन्नाभाईच्या तिसऱ्या सिक्वेलबद्दल काय सांगाल? 
- तिसऱ्या सिक्वेलमध्ये संजय दत्त व अर्शद वारसी या दोघांच्या भूमिका पुढे जातील. बाकी सगळ्याच व्यक्तिरेखा नवीन असतील. (हसत हसत) जर राजकुमार हिराणीने मला यात नाही घेतले तर थयथयाट करीन!'