अभिनय माझी पॅशन 

deepak balraj vij win international 'Manhunt award
deepak balraj vij win international 'Manhunt award

अभिनेत्री किशोरी शहाणे आणि दिग्दर्शक दीपक बलराज वीज यांचा मुलगा बॉबी वीज लवकरच सिनेसृष्टीत प्रवेश करणार आहे. नुकतंच त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय असलेल्या "ग्लॅडरॅग्ज' या भारतीय नियतकालिकातर्फे दर वर्षी घेण्यात येणाऱ्या मॉडेलिंग स्पर्धेतील मॅन हंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. त्यानिमित्ताने केलेली ही बातचीत... आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय असलेल्या "ग्लॅडरॅग्ज' या भारतीय नियतकालिकातर्फे दर वर्षी घेण्यात येणाऱ्या मॉडेलिंग स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात व राजस्थान यांसारख्या विविध राज्यांतून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. जवळपास दोनशेहून अधिक तरुणांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. अंतिम फेरीत पंचवीस जणांची निवड झाली आणि त्यात मीही होतो. या स्पर्धेचा अंतिम सोहळा नुकताच झाला. त्यात "मॅन हंट' या पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली. अंतिम सोहळ्याच्या एक आठवड्यापूर्वी आधी मी आजारी पडलो होतो आणि डॉक्‍टरांनी स्पर्धेत सहभागी होऊ नको, असं सांगितलं होतं; पण इतक्‍या कालावधीपासून मी या पुरस्कारासाठी मेहनत घेतली होती आणि स्वत:च्या हिमतीवर मी एवढ्या फेऱ्या पार केल्या होत्या. त्यामुळे मला मागे हटायचं नव्हतं. म्हणून मी आई-बाबा दोघांनाही बजावून सांगितलं होतं की, काहीही झालं तरी मी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाणारच आणि या पुरस्कारावर मी मोहोर उमटविलीच. माझ्या जीवनातील हा अप्रतिम अनुभव होता. नेहमीच सगळे बोलतात की तुझे पालक सिनेइंडस्ट्रीमधलेच आहेत. त्यामुळे तुला या क्षेत्रात करिअर करणं खूप सोप्पं आहे. आई-वडिलांनी मला खूप प्रोत्साहन दिलं; पण स्वत:च्या हिमतीवर मी या पुरस्काराचा मानकरी ठरलो. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. या गोष्टीचा खूप आनंदही वाटतो. या स्पर्धेतून मला खूप प्रेरणा मिळालीय. आता मी संपूर्ण लक्ष सिनेइंडस्ट्रीकडे केंद्रित केलं आहे. 

मी लहानपणापासूनच शूटिंगच्या सेटवर जायचो. तिथे वेगवेगळा अनुभव मिळायचा. तिथूनच मला या क्षेत्राविषयी उत्सुकता निर्माण झाली. तेव्हाच मी ठरवलं होतं की, याच क्षेत्रात करिअर करायचं. त्यामुळे मी बालकलाकार म्हणून चित्रपटात काम केलं. "शिर्डी साईबाबा', "मोहट्याची रेणुका', "मुंबई गॉडफादर' या सिनेमांत मी काम केलं आहे. तसंच मी बऱ्याच नाटकांत आणि जाहिरातींत काम केलं आहे. शाळा व महाविद्यालयामध्ये नाटकांत मी मुख्य भूमिका साकारलीय. मला अभिनयाचीच आवड होती; पण मी बीएमएसमध्ये पदवी घेतल्यामुळे बिझनेसमध्येही इंटरेस्ट वाटला म्हणून मी कॉर्पोरेट कंपनीमध्ये काही काळ काम केलं. शेवटी मला कळलं की माझी खरी पॅशन अभिनयच आहे. त्यानंतर मी चित्रपटसृष्टीत काम करण्याचं मनाशी पक्क केलं आणि तयारीला लागलो. 

सिनेक्षेत्रात येण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. वेगवेगळ्या ठिकाणी सहायक दिग्दर्शन केले. त्यानंतर गेल्या एक वर्षापासून मी शिस्तबद्ध डाएट करतोय. जिम, डान्स, मार्शल आर्टस व ऍक्‍शन फाइट यांचे मी धडे गिरवित आहे. पडद्यामागे काम केल्यामुळे माझं अभिनय कौशल्यही सुधारेल, या हेतूने मी सहायकाची कामं केली. माझ्या पालकांचा मला खूप पाठिंबा असतो. माझे अभिनय गुरूही तेच आहेत. अभिनय क्षेत्रात येण्यासाठी मी कोणतंही शिक्षण किंवा पदवी घेतलेली नाही; पण मला जे काही सामान्य ज्ञान मिळालं किंवा सध्याच्या घडीला या क्षेत्रात मी जे काही करू शकतोय ते फक्त माझ्या पालकांमुळेच. कारण ते मला मोलाचं मार्गदर्शन व त्यांचे अनुभव सांगतात ज्यातून मला खूप काही शिकायला मिळतं. या क्षेत्रात त्यांच्याशिवाय मी करिअर करूच शकलो नसतो. लवकरच "ताईगिरी' चित्रपटात मी छोटाशी भूमिका करणार आहे. मला मराठी सिनेसृष्टीत चांगल्या दिग्दर्शकासोबत काम करायला आवडेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com