आम्ही धर्मेंद्र आणि हेमा? नो वे!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

खरेतर ही जोडी रसिकांना दिली ती छोट्या पडद्याने. पिंजरा या मालिकेतून ही जोडी दिसली. या जोडीचे नाव आहे भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे. ही जोडी सतत दिसत असल्यामुळे सध्या यांच्या लिंक अप्सच्या चर्चा रंगू लागल्या आहेत

पुणे: गेल्या काही महिन्यांपासून ही जोडी सतत वेगवेगळ्या सिनेमांमधून दिसते आहे. निवडुंग, शिव्या ही त्याची काही उदाहरणे. आता मिलींद शिंदे दिग्दर्शित एका आगामी सिनेमातही ही जोडी दिसणार आहे. खरेतर ही जोडी रसिकांना दिली ती छोट्या पडद्याने. पिंजरा या मालिकेतून ही जोडी दिसली. या जोडीचे नाव आहे भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे. ही जोडी सतत दिसत असल्यामुळे सध्या यांच्या लिंक अप्सच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्याचवेळी या बातम्यांत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण भूषणने दिले आहे. 

या बाबतीत बोलताना भूषण म्हणाला, आमच्याबाबत बरेच बोलले जाते हे खरे आहे. आमचे चाहतेच नव्हे, तर आपल्या सिनेजगतातही ही चर्चा होती. एका बड्या दिग्दर्शकानेही आम्हाला असे विचारले होते. कि, तुम्हाला काय मराठीतील धर्मेंद्र आणि हेमा मालिनी व्हायचे आहे का? यावर आम्ही तडक नाही म्हणून सांगितले होते. मिलिंद शिंदे दिग्दर्शित सिनेमाच्या शूटसाठी तो पुण्यात आला होता. 

ई सकाळशी बोलताना तो म्हणाला, आम्हाला खरेच धर्मेंद्र आणि हेमा व्हायचे नाही. आमची पिंजराची जोडी रसिकांना खूप आवडली. म्हणूनच आम्हाला पुन्हा पुन्हा बोलावले जाते. पण, सिनेमात आणि रिअल लाइफमध्ये आम्हाला खरेच अशी ओळख नको आहे.