कृष्णधवल चित्रपट गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शकिला यांचे निधन

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

बॉलिवूडमध्ये १९५०-६० च्या दशकात गुरुदत्त यांच्या ‘सीआयडी’ आणि ‘आरपार’ या चित्रपटांतील अभिनयामुळे शकिला प्रसिद्ध झाल्या.

मुंबई : कृष्णधवल चित्रपटांच्या काळात गुरुदत्त यांच्या ‘सीआयडी’ आणि ‘आरपार’ चित्रपटांसह, राज कपूर, शम्मी कपूर यांच्यासोबतच्या भूमिकांतून बॉलिवूड गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शकिला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. 

‘आरपार’ चित्रपटातील त्यांचे ‘बाबुजी धीरे चलना’ गाणे ५० च्या दशकात खूप गाजले. बॉलिवूडमधील 'एव्हरग्रीन' गाण्यांपैकी हे एक आहे. 
हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्यानंतर शकिला यांना बुधवारी तात्काळ वांद्रे येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तेथे सोय नसल्यामुळे त्यांना जुहू येथील आरोग्य निधी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

बॉलिवूडमध्ये १९५०-६० च्या दशकात गुरुदत्त यांच्या ‘सीआयडी’ आणि ‘आरपार’ या चित्रपटांतील अभिनयामुळे शकिला प्रसिद्ध झाल्या. ‘अलिबाबा और ४० चोर’, ‘हातिम ताई’, ‘आरपार’, ‘श्रीमान सत्यवादी’, ‘चायना टाउन’ यासारख्या ५० चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. ‘उस्तादो के उस्ताद’ या १९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील त्यांची भूमिका शेवटची ठरली.