कटप्पाने ढिंचाक पूजाचे व्हिडिओ यूट्युबवरून काढण्यास भाग पाडले !

टीम ई सकाळ
बुधवार, 12 जुलै 2017

यूट्युबवर तब्बल 3 कोटींहून अधिक हिट्स मिळाल्याचा दावा पूजा करत होती. त्यातून तिला दरमहा 2 ते 4 लाख रुपयांचे उत्पन्नही मिळत होते.

मुंबई : चित्रपटात बाहुबलीला मारणाऱ्या कटप्पाचा आपण तिरस्कार केला असेल.., मात्र सध्या नेटिझन्स कटप्पाचा जयजयकार करत आहेत. पण हा कटप्पा वेगळा आहे. कटप्पा सिंग असं त्याचं नाव असून, त्याने ढिंचाक पूजाच्या भयंकर संगीतापासून वाचवल्याबद्दल अनेक रसिक नेटिझन्स त्याचे मनापासून आभार मानत आहेत. 

सूर, ताल, लय कसे नसावेत याचा जणू वस्तुपाठच घालून देणारी ढिंचाक पूजा त्रासिक असल्याचं मत रसिक अनेक दिवसांपासून व्यक्त करत आहेत. कलेतलं माधुर्य ज्याच्या गावीही नाही अशा 'ढिंचाक' संगीताबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर उमटत होत्या. तसेच, पूजाच्या गाण्यांतील आशयावरील स्वामीत्व हक्कांचा मुद्दा उपस्थित करत तिच्या सर्व गाण्यांचे व्हिडिओ डिलीट केले आहेत. 
 
यूट्युबवर तब्बल 3 कोटींहून अधिक हिट्स मिळाल्याचा दावा पूजा करत होती. त्यातून तिला दरमहा 2 ते 4 लाख रुपयांचे उत्पन्नही मिळत होते. यूट्युबवर तिचे 1 लाख 82 हजार सबस्क्रायबर्स आहेत. मात्र, तिच्या या कथित चाहत्यांना एक अपवाद वगळता कोणतीही गाणी पाहता येणार नाहीत. 'दिलों का शूटर मेरा स्कूटर' हे तिचं एकमेव गाणं सध्या उपलब्ध आहे. कटप्पा सिंग यांच्या तक्रारीमुळे यूट्युबवरून ढिंचाकची गाणीच काढून टाकण्यात आली आहेत.