नक्षत्रांचे झुंबर उतरले भुईवर, सोहळा तो जाहला अनुपम!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

'सकाळ प्रीमिअर अॅवॉर्ड' नामांकनासाठी अवतरले तारे-तारका

मुंबई : सचिन पिळगावकर, महेश कोठारे, श्रेयस तळपदे, वर्षा उसगावकर, अभिनय देव, दीपाली सय्यद, विजय कदम, विजय पाटकर, किशोरी शहाणे, सुशांत शेलार, अभिनय बेर्डे यांच्यासह अनेक तारे-तारकांनी लावलेल्या उपस्थितीमुळे सभागृहात नक्षत्रांचे झुंबर उतरल्याचा भास होत होता. या आटोपशीर; परंतु झगमगत्या सोहळ्यात सन्मानचिन्हाचे अनावरण झाले आणि नामांकनेही जाहीर झाली. खास मराठी चित्रपटसृष्टीसाठी असलेल्या या "सकाळ प्रीमिअर ऍवॉर्ड 2017'ची नामांकन संध्येच्या निमित्ताने उपस्थितांनी एक अनुपम सोहळा अनुभवला.

एरवी मराठी तारे-तारकांचे शेड्युल रात्रीपर्यंत बिझीच असते. महत्त्वाची शूटिंग सुरू असतात; पण कित्येक जण ते बिझी शेड्युल सोडून या ऍवॉर्डसाठी कोणाची नामांकने जाहीर होतात हे पाहण्यासाठी आले होते. एक निवांत संध्याकाळ अनुभवण्यासाठी सर्वजण फ्रेश मूडमध्ये रमतगमत आले. नामांकनाबाबत सस्पेन्स असल्याने त्याबाबत आधीपासूनच चर्चा सुरू होती. जुहू येथील "नोव्होटेल' या पंचतारांकित हॉटेलात सायंकाळपासून गौरव घाटणेकर, दीपाली सय्यद, स्वरूप भालवणकर, स्मिता गोंदकर, मानसी नाईक, गायक सागर फडके, अभिनय बेर्डे, तीर्था मुरबाडकर, राजेश मापूसकर, नानूभाई, समित कक्कड, अर्चना नेवरेकर आदी मान्यवरांचे आगमन होऊ लागले. एकमेकांच्या भेटीगाठी, गप्पाटप्पा, हास्यकल्लोळ, विनोदांना टाळ्यांनी दिलेली दाद असे हलकेफुलके वातावरण मराठी चित्रपट कलाकारांमधील सौहार्द दाखवणारे होते. प्रीमिअरच्या या पहिल्यावहिल्या पुरस्कार सोहळ्याबद्दल सर्वांच्या मनात कुतूहल होते. "सकाळ प्रीमिअर'सारख्या आघाडीच्या व बहुमानाच्या या स्पर्धेत आपल्याला सहभागी व्हायला मिळाल्याचा आनंद कलाकारांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

ज्येष्ठ अभिनेते व निर्माते सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांचेही दणक्‍यात स्वागत झाले. त्यांनी एकमेकांना आलिंगन दिले. नवोदित अभिनेते या दोघांसमोर आदराने झुकत होते; पण हे दोघेही नवोदितांना प्रेमभराने आलिंगन देऊन त्यांनाही मान देत होते. महेश कोठारे तर मोठ्या आवाजात सर्वांना "हाय' असे म्हणत त्यांचे स्वागत करत होते. एकीकडे नव्या-जुन्या अभिनेत्यांचे फोटोसेशन, कॅमेऱ्यांपुढे बाईट्‌स हे सुरू असतानाच एकमेकांची ख्यालीखुशाली विचारणे, नव्या चित्रीकरणांबाबत चौकशी हेदेखील सुरू होते. कॅमेऱ्यांच्या क्‍लिकचा झगमगाट तर सतत सुरू होता.

निवेदिका मृण्मयी देशपांडे हिने माईकचा ताबा घेताच सर्व जण स्थानापन्न झाले. आपण लहानपणापासून पुण्यात "सकाळ'च्या संस्कारात कसे वाढलो, हे मृण्मयीने आधीच सांगून टाकले. "सकाळ'चे (मुंबई आवृत्ती) निवासी संपादक राहुल गडपाले यांनीही "सकाळ माध्यम समूह' व मराठी चित्रपटसृष्टी यांच्यातील जुने नाते अधोरेखित केले व ते यापुढेही अधिकाधिक दृढ होईल, अशी ग्वाही दिली. "प्रीमिअर'च्या आतापर्यंतच्या वाटचालीचा धावता आढावा, परीक्षक मंडळाचा सत्कार, सन्मानचिन्हाचे अनावरण, महेश कोठारे, सचिन पिळगावकर या दिग्गजांकडून "सकाळ प्रीमिअर'चा गौरव तसेच त्यांनी सांगितलेले "प्रीमिअर ऍवॉर्ड'चे महत्त्व अशा टप्प्यांत सोहळा रंगत गेला.

सरतेशेवटी सर्वांची उत्सुकता ताणली गेल्यावर मोठ्या पडद्यावर नामांकने जाहीर करण्यात आली. या वेळी सतत टाळ्यांचा कडकडाट होत होता. नामांकन मिळालेल्यांचे सर्व जण अभिनंदन करत होते. नाव जाहीर झालेल्या व्यक्ती भारावून गेल्या होत्या. एका मोठ्या पुरस्कार सोहळ्यात आपली दखल घेतली गेल्याचा सार्थ अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
सोहळा संपल्यावर पुन्हा सर्वांच्या गप्पा आणि फोटोसेशनचा दुसरा अंक सुरू झाला. सर्व जण तृप्त मनाने भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी गेले. तिथे चर्चा होती ती फक्त 10 ऑगस्टला प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिरात होणाऱ्या अंतिम सोहळ्याची!