बच्चेकंपनीसोबत कल्ला करायला येतोय ‘वायू’

‘मंकी बात’ चित्रपटातील एका दृष्यात बालकलाकार वेदांत आपटे आणि ‘वायू’ द मंकी.
‘मंकी बात’ चित्रपटातील एका दृष्यात बालकलाकार वेदांत आपटे आणि ‘वायू’ द मंकी.

पुणे - लहान मुलांना सहजच त्यांच्या आवडत्या ऋतूबद्दल विचारलं तर ते चटकन उत्तर देतील, उन्हाळा. त्यामागील मुख्य कारण म्हणजे अभ्यासाची, परीक्षेची कटकट संपवून करता येणारी मनसोक्त धम्माल, मस्ती आणि धिंगाणा. दिवसभर फुल्ल टू कल्ला केल्यानंतर रात्री थंडगार आइस्क्रीम खाण्याची मजा काही औरच आहे. अशाच सर्व लहान सवंगड्यांच्या सुट्या अधिक मजेशीर करण्यासाठी, त्यांच्यासोबत दंगा करण्यासाठी ‘मंकी बात’ घेऊन येत आहे ‘वायू’.

बालपण म्हणजे खुशाल बागडण्याची, धम्माल करण्याची पर्वणीच असते. त्यात उन्हाळ्याच्या सुट्या म्हटलं की किलबिल, दंगा असे माकडचाळे ओघाने आले, त्या शिवाय कोणाचेही बालपण पूर्ण होत नाही. मात्र अलीकडे इंटरनेटच्या आभासी जाळ्यात मुले अडकत चालली आहेत. यामुळेच काही वर्षांपूर्वी लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की बालनाट्य, चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चार्ली चॅप्लिन, लॉरेल अँड हार्डी, चंपक, मोगली अशा पात्रांची भुरळ पडलेली असायची. मात्र ती आता दिसत नाही.

मराठीमध्ये मागील काही वर्षांत मुलांसाठी म्हणून बालचित्रपटसुद्धा आलेला नाही. ही उणीव लेखक, दिग्दर्शक विजू माने यांनी ‘मंकी बात’मधून भरून काढल्याचे दिसते.

प्रोॲक्‍टिव्ह प्रस्तुत, निष्ठा प्रॉडक्‍शन्स निर्मित ‘मंकी बात’ या चित्रपटाची प्रस्तुती आकाश पेंढारकर, विनोद सातव यांच्यासह अभय ठाकूर, प्रसाद चव्हाण, शंकर कोंडे यांची असून विवेक डी, रश्‍मी करंबेळकर, मंदार टिल्लू आणि विजू माने निर्माते आहेत. चित्रपटाची कथा महेंद्र कदम आणि विजू माने यांची, गीते आणि संवाद  संदीप खरे यांचे, तर संगीत डॉ. सलिल कुलकर्णी यांनी दिले आहे. सध्या लहान मुलांच्या तोंडी रुळलेली ‘हाहाकार...’ आणि ‘श्‍या ... कुठे येऊन पडलो यार’ ही गाणी शुभंकर कुलकर्णी याने गायली आहेत. तसेच ‘परिणिता’, ‘रबने बना दि जोडी’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘शामिताभ’ अशा अनेक प्रसिद्ध हिंदी चित्रपटांचे रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी ‘मंकी बात’ या बालचित्रपटासाठी विशेष माकड तयार केले आहे. 

या चित्रपटामध्ये बालकलाकार वेदांत आपटेसह पुष्कर श्रोत्री, भार्गवी चिरमुले, मंगेश देसाई, विजय कदम, नयन जाधव, समीर खांडेकर आदी कलाकार आहेत. तर गायक, संगीतकार, दिग्दर्शक असलेला अवधूत गुप्ते या चित्रपटातून अभिनयात पदार्पण करत आपल्या चाहत्यांना सरप्राइज देणार आहे. गॅजेट्‌सच्या दुनियेत हरवलेल्या बच्चे कंपनीला पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात, मैदानावर खेळायला घेऊन जाणारा ‘मंकी बात’ शुक्रवार (ता. ११) पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com