फातिमाने "चंदामामा'ला केले "दूर' 

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जून 2017

"दंगल'फेम अभिनेत्री फातिमा सना शेख सध्या आगामी चित्रपट "ठग्स ऑफ हिंदुस्तान'बाबत खूपच उत्सुक आहे.

"दंगल'फेम अभिनेत्री फातिमा सना शेख सध्या आगामी चित्रपट "ठग्स ऑफ हिंदुस्तान'बाबत खूपच उत्सुक आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. हा चित्रपट फातिमाच्या करिअरमधील दुसरा अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे.

या चित्रपटासाठी फातिमाने "चंदामामा दूर के' चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे. फातिमाला अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मुख्य भूमिका असलेला "चंदामामा दूर के' या चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली होती; मात्र फातिमाने विशेष रस दाखवला नाही. पहिल्यांदा तिने स्क्रिप्ट ऐकली. त्यानंतर तिला जाणवले की, चित्रपट पूर्णपणे नायकावर आधारित आहे. म्हणजेच सुशांत सिंग राजपूतवर.

सूत्रांच्या माहितीनुसार, "दंगल'सारख्या चित्रपटातून यश संपादन केल्यानंतर पुन्हा एकदा स्वत:चे कौशल्य दाखवता येईल, अशा चित्रपटाचा भाग बनले पाहिजे, असे फातिमाचे मत आहे. जेव्हा "चंदामामा दूर के' चित्रपटासाठी फातिमाला विचारण्यात आले, त्याचवेळी "ठग्स ऑफ हिंदुस्तान'ची चर्चा सुरू होती. "ठग्स ऑफ हिंदुस्तान' फातिमासाठी महत्त्वाचा असल्याने तिने "चंदामामा दूर के' या चित्रपटाला नकार दिला.