खुर्चीचा काल्पनिक खेळ 

game of thrones 7
game of thrones 7

"गेम ऑफ थ्रोन' या जगभर लोकप्रिय ठरलेल्या मालिकेचा सातवा सीझन लवकरच सुरू होतोय. त्याआधी नुकताच त्याचा उत्कंठावर्धक ट्रेलर लॉन्च झालाय. त्यानिमित्ताने केलेली थोडीशी ही उजळणी... कशी आहे आणि असणार ही लोकप्रिय सीरिज? 

वेस्टोरॉस आणि इतर अनेक राज्ये ही कल्पना घेऊन जॉर्ज आर. आर. मार्टिनच्या "सॉंग ऑफ आईस ऍण्ड फायर' या कादंबऱ्यांवर आधारित असलेली "गेम ऑफ थ्रोन्स' ही टीव्ही सीरिज 2011 मध्ये पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. एच. बी. ओ.ची ही ओरिजीनल सीरिज म्हणजे मध्ययुगीन काळातील एक राजाच्या पदी बसण्याचा लढा, हे तिचे स्वरूप होते. पाहायला गेले तर ही फारच साधी कल्पना; पण लेखकाच्या कल्पनाशक्तीला दाद दिली पाहिजे. वेस्टोरोसमध्ये असलेला थ्रोन म्हणजेच राजाची खुर्ची मिळवण्यासाठी सगळ्या घराण्यांमध्ये लागलेली चुरस, त्यातून घडणारे किंवा घडवले जाणारे राजकारण, खेळी, कुरघोड्या, युद्धे, जादूटोणे अशा सगळ्या मनोरंजक पद्धतीने हा खेळ रंगला. साध्या असणाऱ्या कल्पनेवरही उत्सुकता ताणून धरेल अशा प्रकारची कथा त्याने लिहिली आणि ही मालिका खूपच हिट ठरली. त्या मालिकेतील पात्रांवर लोक भरभरून प्रेम करू लागले आणि आपल्या आवडत्या पात्राचा मृत्यू झाल्यानंतर हळहळही व्यक्त करू लागले. विशेषत: तरुण पिढीला ही मालिका खूपच आवडू लागली आणि या मालिकेत पुढे काय घडते? याची उत्सुकता प्रत्येक भागानंतर तशीच राहते. या मालिकेत पुढे काय घडणार? याची चातकासारखी वाट पाहणाऱ्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. मागच्या वर्षी जूनमध्ये या मालिकेचा सहावा सीझन संपला. या सीरिजचा सातवा सीजन या वर्षी 16 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक अमेरिकन आणि ब्रिटिश टीव्ही सीरिजपैकी ही भारतातही लोकप्रिय ठरलेली आणखी एक मालिका आहे. मालिकेतील याआधीच्या प्रत्येक सीजनमध्ये आपल्याला एक तासाचे दहा भाग पाहायला मिळाले होते. पण आता हा खेळ संपत आला आहे. या मालिकेचा पुढचा म्हणजे आठवा सीजन हा शेवटचा सीजन असणार आहे. त्यामुळे सातव्या सीजनमध्ये प्रेक्षकांना फक्त सातच भाग पाहायला मिळणार आहेत, असे या मालिकेचे दिग्दर्शक डेव्हिड बेनिऑफ आणि डी. बी. वाईस यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. लॅनिस्टर, टार्गेरिअन, स्टार्क, बराथिअन, ग्रेजॉय, मार्टेल, टायरेल, फ्रे, बोल्टन, टली, नाईट्‌स वॉच ही मुख्य आणि अशी अनेक घराणी आणि त्यांच्या हाती असलेली त्यांची राज्ये आणि या सर्व राज्यांवर राज्य करण्यासाठी थ्रोनवर बसण्याचे स्वप्न हा प्रत्येक घराण्यातील सदस्य पाहतोय. या प्रत्येक घराण्याची आपापली अशी चिन्हे (सीजील) आहेत. पण आतापर्यंत टार्गेरिअन, बराथिअन आणि त्यानंतर लॅनिस्टर या घराण्यांनी या खुर्चीवर आपला कब्जा मिळवला आहे. या मालिकेत मागच्या सीजनमध्ये अनेक घटना घडल्या. जे प्रेक्षक ही मालिका पाहतात, त्यांना माहितीच असेल, की सहाव्या सीजनच्या शेवटी लॅनिस्टर घराण्याची मुलगी सर्सी जिने बराथिअन राजाशी लग्न केले आहे; आपल्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर तिने थ्रोनवर कब्जा मिळवलेला आहे. आणि टार्गेरिअन घराण्याची मुलगी खलिसी डेनेरिस थ्रोनवरचा तिचा खरा हक्क मिळवण्यासाठी आपल्या तीन ड्रॅगन्सबरोबर समुद्रमार्गे वेस्टोरॉसकडे आगेकूच करत आहे. 
जॉन स्नो या स्टार्क घराण्याच्या मुलाने आपले राज्य विंटरफेल बोल्टन या घराण्याकडून परत मिळवले आहे. या थ्रोनसाठी असलेल्या युद्धात त्याला काही रस नाही. त्याने मरण जवळून पाहिले आहे आणि त्याचे म्हणणे आहे की, खरे युद्ध हे ग्रेट वॉल लीकडे आहे. उन्हाळ्यापासून सुरू झालेल्या या मालिकेच्या प्रवासामध्ये लोकांना विंटर म्हणजेच हिवाळ्याची फार दहशत असलेली दिसते. त्याचे कारण वॉलपलीकडे असलेले व्हाईट वॉकर्स. मेल्यानंतर जिवंत झालेली ही माणसे सगळ्या जगाला मारू शकतात, ही भीती आणि त्यांना संपवू शकणाऱ्या दोनच गोष्टी त्या म्हणजे आग आणि ड्रॅगन ग्लास. 
सातव्या सीजनचा टीझर नुकताच रीलिज झालाय. त्यातही सर्व घराण्यांचे असणाऱ्या सीजीलचा चुरडा होत असताना दिसतो आहे आणि एकच सत्य राहतं ते म्हणजे व्हाईट वॉकर्स. त्यामुळे सातव्या सीझनमध्ये आपल्याला व्हाईट वॉकर्सबरोबरचे युद्ध पाहायला मिळेल की सर्व घराण्यांमधील चुरस अशीच चालू राहील, याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. काहींचे म्हणणे आहे, की लॅनिस्टर कुटुंब वेस्टोरोसमधून कायमचे नष्ट होईल; तर काहींचे म्हणणे आहे की, टार्गेरिअन पुन्हा एकदा थ्रोनवर कब्जा मिळवतील. त्यातही अनेक सत्य आणि डावपेच खेळले जातील आणि अंतिम युद्ध हे जीवन-मरणाचे व्हाईट वॉकर्सबरोबरच होईल, असे अंदाज बांधले जात आहेत. इंटरनेटवर या मालिकेबाबत प्रेक्षकांनी अनेक थिअरी मांडल्या आहेत आणि मालिकेत पुढे काय घडेल याचे काही अंदाज बांधले आहेत. शेवटी थ्रोन कोणाला मिळणार? हे 16 जुलैपासून "गेम ऑफ थ्रोन्स' प्रेक्षकांना पाहायला मिळेल तेव्हा कळेलच...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com