थरार आणि साहसी दृश्‍यांचा "द ममी' 

हर्षद सहस्रबुद्धे 
मंगळवार, 6 जून 2017

द ममी हा ऍक्‍शन-हॉरर-ऍडव्हेंचर अशा प्रकारच्या जॉनरमधे मोडणारा "युनिव्हर्सल पिक्‍चर्स'च्या डार्क युनिव्हर्स चित्रपट मालिकेमधला पहिला बिग बजेट सिनेमा येत्या 9 जूनला आपल्या भेटीला येतोय. त्यानिमित्ताने... 

द ममी हा ऍक्‍शन-हॉरर-ऍडव्हेंचर अशा प्रकारच्या जॉनरमधे मोडणारा "युनिव्हर्सल पिक्‍चर्स'च्या डार्क युनिव्हर्स चित्रपट मालिकेमधला पहिला बिग बजेट सिनेमा येत्या 9 जूनला आपल्या भेटीला येतोय. त्यानिमित्ताने... 

इजिप्त देशात पूर्वीच्या काळी माणसांचे मृतदेह मृत्युपश्‍चात ठरावीक पद्धत वापरून जतन करून ठेवले जात. अशा विशिष्ट पद्धतीने जतन करून ठेवलेल्या देहाला "ममी' असं संबोधलं जातं. त्याचं कथासूत्र घेऊन साकारलेले ममी मालिकेतले भव्य-दिव्य असे सिनेमे. काही पुरातत्त्ववेत्ते कामानिमित्त इजिप्तमध्ये जातात. तिथल्या पिरॅमिडभोवतालच्या परिसरात काम करत असताना काहीतरी असं घडतं, की ममीच्या रूपात असणारं तिथलं जुनं पिशाच्च जागं होतं आणि मग सुरू होतो जीवन-मृत्यूच्या पाठशिवणीचा थरारक खेळ. साधारणपणे असं कथासूत्र असणारी "द ममी' ही अत्यंत लोकप्रिय चित्रपट मालिका. द ममी हा ऍक्‍शन-हॉरर-ऍडव्हेंचर अशा प्रकारच्या जॉनरमधे मोडणारा "युनिव्हर्सल पिक्‍चर्स'च्या डार्क युनिव्हर्स चित्रपट मालिकेमधला पहिला बिग बजेट सिनेमा 9 जूनला आपल्या भेटीला येतोय. "द ममी' म्हटलं की आपल्याला आठवतात ते 1999 च्या आसपासचे स्टीफन सोमर्सने दिग्दर्शित केलेले सिनेमे. 
"द ममी'च्याच कथासूत्राचा धागा पकडून असणारी स्कॉर्पियन किंगची कथानकं आणि त्यावर आधारित काही सिनेमे (या पद्धतीच्या सिनेमांना स्पिन ऑफ मूव्हीज, असं म्हणतात). 1932 ते 1955 या कालावधीत युनिव्हर्सल स्टुडिओनं द ममी या कथा संकल्पनेवर आधारित असणाऱ्या सहा चित्रपटांची निर्मिती केली. कार्ल फ्रेअंडनं दिग्दर्शित केलेला द ममी हा 1932 मध्ये प्रदर्शित झालेला "ममी' मालिकेतला पहिला चित्रपट. हा फक्त 73 मिनिटे लांबी असलेला सिनेमा होता. या सिनेमात इम्होटेप नावाची एका इजिप्शियन धर्मगुरूची ममी काही पुरातत्त्ववेत्त्यांकरवी जागृत होते आणि सर्वांना वेठीस धरते, असं कथासूत्र होतं. इम्होटेप, अनख-सुन-अ-मून वगैरे पात्रं आपल्याला 1999 मध्ये आलेल्या स्टीफन सोमर्सच्या "द ममी'मध्ये भेटतात. खरं तर 1932 च्या सिनेमाचा कथाविस्तारच आपल्याला सोमर्सच्या सिनेमात पाहायला मिळतो. त्यानंतर टॉम टायलरने दिग्दर्शित केलेला फक्त 66 मिनिटांचा कृष्णधवल सिनेमा "द ममीज हॅण्ड' 1940 मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर 1942 व 1944 मध्ये लोन शान जुनियरने दिग्दर्शित केलेले द ममीज टूंब, द ममीज घोस्ट व द ममीज कर्स हे 1932 मधल्या द ममीचे पुढचे भाग म्हणजेच सिक्वल प्रदर्शित झाले. 

त्यानंतर 11 वर्षांनी "अबॉट ऍण्ड कोस्टलो मीटस्‌ द ममी' नावाचा सिनेमा आला. चार्ल्स लेमोंटनं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा थोडा विनोदी शैलीचा होता. हॉरर कॉमेडी अशा मिक्‍स जॉनरचा. हा सिनेमा आधी प्रदर्शित झालेल्या सिनेमांहून खूप वेगळा होता. "युनिव्हर्सल'च्या या सिनेमांवरून प्रेरणा घेऊन हॅमर फिल्म प्रॉडक्‍शन या ब्रिटिश स्टुडिओनं द ममी, द कर्स ऑफ ममीज टूंब, द ममीज श्राऊड, ब्लड फ्रॉम ममीज टूंब अशा चार सिनेमांची निर्मिती 1959 ते 1971 या काळात केली. मधे जवळपास तीन दशकांचा अवधी लोटला. 1999 मधे स्टीफन सोमर्सने 1932 च्या मूळ चित्रपटाचं कथासूत्र काळानुरूप बदललं. मूळ कथानकात योग्य ते बदल करून, त्यातली भीतीदायक प्रसंगाची मात्रा कमी करून, त्यात साहसी दृश्‍यांचा समावेश केला. आवश्‍यक त्या ठिकाणी व्हीएफएक्‍स तंत्राची जोड देऊन द ममी नावाचा सिनेमा बनवला. द ममी आणि त्याचा सिक्वेल द ममी रिटर्न्स हे दोन्ही सिनेमे मोठ्या प्रमाणात गाजले. ब्रॅंडन फ्रेझर, रॅशेल विझ हे कलाकार मुख्य भूमिकांत असलेले हे सिनेमे चित्रपट मालिकेत नवा पायंडा पाडणारे ठरले. 

वेगवान पटकथा, चटपटीत संवाद, आगळंवेगळं रहस्य, तुफानी साहसी दृश्‍ये व या सगळ्याला असलेला विनोदी बाज ही या दोन भागांची वैशिष्ट्ये होती. त्यानंतर आलेला याच मालिकेतला तिसरा भाग रॉब कोहेननं दिग्दर्शित केलेला "द ममी टूंब ऑफ द एम्परर' लक्षवेधी नव्हता. ब्रॅंडन फ्रेझरच्या जोडीला जेट-लीसारखा ऍक्‍शनचा बादशहा असूनही हा सिनेमा तिकीट बारीवर फारसा यशस्वी ठरला नाही. त्यामुळे यानंतर येणारा पुढचा भाग त्या वेळी प्रदर्शित करायचा नाही, असं युनिव्हर्सल पिक्‍चर्सनं ठरवलं. 
पण आता येणारा "द ममी' हा बिग बजेट सिनेमा खूपच वेगळा असल्याचं ट्रेलरवरूनच जाणवतंय. युनिव्हर्सल पिक्‍चर्स "डार्क युनिव्हर्स' नावाची चित्रपट मालिका सुरू करत आहे. युनिव्हर्सल पिक्‍चर्सने निर्मिती केलेल्या सिनेमांपैकी काही कथानकं आणि काही पात्रांच्या मूळ स्वभावात बदल करून, ती नवीन सिनेमांच्या बदललेल्या रूपांत सादर केली जातील. हे सिनेमे मुख्यत्वेकरून "मॉन्स्टर मूव्हीज' प्रकारात मोडणारे असतील. 
मॉन्स्टर मूव्ही प्रकारात खलप्रवृत्तीच्या मुख्य पात्राभोवती संपूर्ण सिनेमाचं कथानक फिरतं. अशा सिनेमांची कथा हे कुणी एखादा लेखक लिहीत नाही. युनिव्हर्सल पिक्‍चर्सचे पूर्वीचे सिनेमे, पात्रं थोडक्‍यात युनिव्हर्सल पिक्‍चर्सचं युनिव्हर्स यांच्याशी संबंधित असलेल्या नवनवीन कथा रचल्या जातात. या कथांची उपकथानके अभ्यासली जातात, चर्चा केल्या जातात आणि यातूनच सर्वानुमते नवीन सिनेमाचं कथानक आकारास येतं. यानिमित्ताने डार्क युनिव्हर्सचा नवा लोगोही प्रदर्शित केला गेलाय. या नवीन मालिकेतला "द ममी' हा पहिला सिनेमा असेल. त्यानंतर ड्रॅक्‍युला, फ्रॅंकेस्टाईन, वूल्फ मॅन, इनव्हिजिबल मॅन असे अनेक सिनेमे डार्क युनिव्हर्स या मालिकेंतर्गत बनवण्याचा "युनिव्हर्सल'चा मानस आहे.

 पटकथालेखन आणि सिनेनिर्मितीत 10 वर्षे असणारा ऍलेक्‍स कर्टझमन "द ममी'चा दिग्दर्शक आहे. टॉम क्रूझ, रसेल क्रो यांसारखे मोठे सुप्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेते प्रमुख भूमिकांत असणं, हे या वेळच्या "द ममी'चं मुख्य आकर्षण आहे. सोफिया बुटेला व अनाबेल वॅलिस या प्रसिद्ध अभिनेत्रीदेखील या सिनेमात असतील. 2डी, 
3डी व आयमॅक्‍स 3डी अशा वेगवेगळ्या फॉरमॅट्‌समध्ये हा सिनेमा 9 जूनला जगभर प्रदर्शित होतोय. 107 मिनिटांच्या या सिनेमाचं बजेट आहे सव्वाशे मिलियन अमेरिकी डॉलर्स. टॉम क्रूझ एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. एका मिशनवर असताना त्याच्या एका कृतीमुळे ममी जागृत होते आणि सर्वनाश ओढवतो. या वेळचं कथानक फक्त इजिप्तपुरतं मर्यादित न राहता स्थल-कालाच्या मर्यादा ओलांडून बाहेर पडताना दिसतं. सिनेमा बराचसा गंभीर वळणाचा दिसतोय. यंदाच्या "ममी'मध्ये विनोदी डूब काढून टाकत हॉररचा समावेश झालेला आहे. ऍक्‍शन-हॉरर-ऍडव्हेंचर असं वेगळं जॉनर यानिमित्ताने जगभरातल्या ममी चित्रमालिकेच्या चाहत्यांना अनुभवायला मिळतील.