येत्या रविवारी 'गोष्ट तशी गमतीची' या नाटकाचा रंगणार 'अंक तिसरा'

टीम ई सकाळ
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

'ई सकाळ'ने नव्याने सुरु केलेल्या 'अंक तिसरा' या उपक्रमाला वाचकांनी तसेच 'ई सकाळ'च्या आॅनलाईन प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. म्हणूनच 'आॅल द बेस्ट 2' या नाटकाची 'अंक तिसरा'ची व्ह्यूअरशिप सात हजारावर होती. तर 'अर्धसत्य'ला मिळालेला प्रतिसाद होता नऊ हजारांवर. आता या मैफलीत येणार आहे 'गोष्ट तशी गमतीची' या नाटकाची टीम. 

पुणे : ई सकाळने सकाळशी बांधिलकी जपलेल्या वाचकांची, प्रेक्षकांची नाळ ओळखून अनेक नवनवे उपक्रम राबवले आहेत. यामध्ये चित्रपटातील कलाकारांशी लाईव्ह गप्पा होतातच. शिवाय लाईव्ह रिव्ह्यूची संकल्पनाही सर्वप्रथम राबवली गेली ती ई सकाळच्या व्यासपिठावर. त्या सर्व उपक्रमांना ई सकाळच्या रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

नवनव्या प्रयोगांना पाठबळ दिले. त्यामुळे नव्या उमेदीने ई सकाळने सुरू केला अंक तिसरा हा नाटकांवर बेतलेला उपक्रम. गेले दोन रविवार हा उपक्रम चालू आहे. 'आॅल द बेस्ट 2' आणि 'अर्धसत्य' या नाटकातील कलाकार या उपक्रमात यापूर्वी लाईव्ह भेटीला आले होते. त्याच माळेत आता 'गोष्ट तशी गमतीची' या नाटकाचे कलाकार सहभागी होणार आहेत. रविवारी, 20 आॅगस्टला सायंकाळी साडेचार वाजता ही लाईव्ह मैफल रंगेल. 

रविवारी रंगणाऱ्या या गप्पांत या नाटकाचे दिग्दर्शक व कलाकार मंगेश कदम, अभिनेत्री लीना भागवत आणि तरूणाईच्या गळ्यातील ताईत शशांक केतकर सहभागी होणार आहे. हे नाटक सुरू होण्यामागच्या गमतीजमती तर यावेळी कळतीलच. शिवाय प्रयोग सुरू असतानाचे रंगमंचामागील किस्से, अनुभव यांचा खजिनाही  या आॅनलाईन व्यासपीठावर रिता होणार आहे. विशेष बाब अशी की 'ई सकाळ'चे वाचकही या गप्पांत भाग घेऊ शकतात. हा सोहळा रविवारी सायंकाळी साडेचार वाजता रंगणार आहे.