'फर्जंद'मधील कमळीच्या अंतरंगात...

संतोष भिंगार्डे
शुक्रवार, 25 मे 2018

अभिनेत्री नेहा जोशी "फर्जंद' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. त्यानिमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा..

"झेंडा", "पोश्‍टर बॉईज', "बघतोस काय मुजरा कर' असे चित्रपट; तर "का रे दुरावा' या मालिकेतून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री नेहा जोशी "फर्जंद' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. त्यानिमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा..

अभिनयाची आवड 
- वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षापासूनच मला अभिनेत्री व्हायचे आहे, हे निश्‍चित होते. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात जाण्याचा माझा विचार नव्हता. तेव्हा शबाना आझमी, ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, जया भादुरी, दीप्ती नवल, स्मिता पाटील यांचे चित्रपट पाहत मोठी झाले आहे. माझे आई-वडीलही नाशकात नाटकात काम करत असल्यामुळे या क्षेत्रात येण्याचे नक्की होते. एकदा आमच्या शाळेत गॅदरिंग होते. तेव्हा केसाला गंगावन लावून मीनाकुमारीची ऍक्‍टिंग करीत होते. अचानक लाईट गेले म्हणून मी मेणबत्ती लावली आणि रिहर्सल केली. तेव्हा माझे केस जळले. ही गोष्ट आजही मी विसरलेले नाही. 

neha joshi

"फर्जंद'मधील भूमिका 
- कोंडाजी फर्जंदच्या पत्नीची अर्थात कमळीची भूमिका या चित्रपटात मी साकारत आहे. या कमळीचे तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम असते; परंतु तिचा त्याच्यावर थोडा रागही असतो. कारण सतत त्याची युद्ध आणि त्याची तालीम सुरू असते. त्यामुळे आपल्या पत्नीला तो फारसा वेळ देत नाही. घरी असला तरी युद्धाचा आणि महाराजांचा विचार त्याच्या डोक्‍यात घुमत असतो. त्यामुळे कधी कधी ती त्याच्यावर रुसते आणि चिडते; परंतु तितकेच त्याच्यावर प्रेमही करते. एके दिवशी तो तालमीतून घरी येतो. त्याला उशीर झाल्यामुळे ती भयंकर चिडलेली असते. परंतु तो तिला सांगतो, की महाराजांनी माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे पन्हाळा जिंकण्याची. तेव्हा ती प्रचंड घाबरते. आता काय होईल... आपला पती मोहिमेवर जाणार... तो जिवंत परत येईल की नाही, याची धाकधूक तिच्या मनात निर्माण होते. कोंडाजीही तिला लगेच म्हणतो, की "ही मोहीम खूप कठीण आहे. मलाही भीती वाटते. मी मोहीम कशी फत्ते करणार...' लगेच ती स्वतःला सावरते आणि अगदी सोप्या भाषेत त्याला सांगते, की अहो... तुम्ही तानाजीरावांचे शागीर्द आहात...त्यांच्यासारखे जा वरती आणि कापून काढा शत्रूला. एकूणच तिचे त्याच्यावर असलेले प्रेम आणि निष्ठा तसेच तिची तगमग छान टिपण्यात आली आहे. 

भूमिकेची तयारी 
- भूमिकेची तयारी खूप करावी लागली हे खरे; परंतु माझ्यापेक्षा अधिक तयारी दिग्पाल लांजेकरने केली होती. त्याचे इतिहासाचे वाचन अफाट आहे. त्याचा दांडगा अभ्यास आहे. ही भूमिका करताना त्याने मला काही टिप्स दिल्या. त्याने मला जेव्हा ही भूमिका ऑफर केली तेव्हा तो मला सुरुवातीलाच म्हणाला होता, की चार-पाचच सीन्स आहेत; पण अत्यंत मोलाचे आणि महत्त्वाचे आहेत. त्यातील एक-दोन सीन्समध्ये तुला संवादच नाहीत. तुझ्या भावना तू डोळ्यातून व्यक्त करायच्या आहेस. खरे तर जेव्हा आपण डोळ्यांतून भावना व्यक्त करतो तेव्हा आपल्या साथीला शब्द असतात. परंतु दोनेक सीन्समध्ये शब्दच नाहीत. ते सीन्स माझ्यासाठी खूप कठीण होते. परंतु दिग्पालने मला याकरिता चांगली मदत केली. ही कमळी फार काही बोलत नाही. पण आतल्या आत ती तडफडत असते... चिडलेली असते. जेव्हा माझी या भूमिकेसाठी लूक टेस्ट झाली तेव्हा मला साध्या काचेच्या बांगड्या आणि पाटल्या दिल्या होत्या. दिग्दर्शक दिग्पालच्या हे लक्षात आले तेव्हा त्याने लगेच कॉश्‍च्युम्स डिझायनर्सला बोलावून घेतले आणि सांगितले, अरे ही कोंडाजी फर्जंदची पत्नी आहे. कोंडाजी हा काही साधा मावळा नव्हता; तर त्याच्याकडे पाच हजार सैनिक होते... वगैरे वगैरे बाबी त्याला सांगितल्या आणि तेव्हाच मला माझ्या भूमिकेचे महत्त्व किती आहे हे लक्षात आले. 

चित्रीकरणाचा अनुभव 
- प्रत्यक्ष आपण त्या काळात आहोत की काय, असेच जणू काही वाटत होते. जिजाऊ मॉंसाहेबांचा आणि माझा एक सीन या चित्रपटात आहे. तो सीन आम्ही भवानी आईच्या एका मोठ्या मूर्तीसमोर चित्रित करत होतो. तो सीन चित्रित करत असताना आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी विरत गेल्या असेच मला जाणवले. तेव्हा मी कॅमेरा...आजूबाजूची जीन्स व टी शर्ट घातलेली माणसे.. सगळे काही विसरून गेले आणि आपण आताच मोहिमेवर चाललो आहोत की काय, असाच भास झाला. या चित्रपटात पन्हाळा किल्ला जिंकल्याची कथा सांगण्यात आली असली आणि हा ऐतिहासिक चित्रपट असला तरी राजकीय आणि कौटुंबिक सीन्सही आहेत. कोंडाजी आणि त्याची कौटुंबिक स्थिती वगैरे गोष्टीही दाखवल्या आहेत. हा ऐतिहासिक चित्रपट आहे. त्यामध्ये कोणतीही लिबर्टी घेण्यात आलेली नसली तरी आजच्या राजकीय; तसेच समाजव्यवस्थेतील मुद्दे अगदी हुशारीने हाताळण्यात आलेले आहेत. 

Web Title: interview of neha joshi for upnext marathi movie farjand