जेजुरी गड गहिवरला...! 

jai malhar serial on zee marathi
jai malhar serial on zee marathi

"जय मल्हार'चा यळकोट यळकोट 

साडेनऊची वेळ, सूर्यकिरणं जेजुरी गडावर पसरली होती. अवघी जेजुरी सोनेरी दिसू लागली होती. सगळीकडे धावपळ, लगबग सुरू होती. एकेक करून सगळे कलाकार सेटवर येत होते... वेशभूषेत तयार होत होते. 
दिग्दर्शक अविनाश वाघमारे आणि कार्यकारी निर्मात्या माधुरी देसाई-पाटकरांचं पटकथा संवादांचं वाचन सुरू होतं. ते झाल्यावर दिग्दर्शक आणि कॅमेरामनची सीनची आखणी सुरू झाली... 

हे चित्र होतं दादासाहेब फाळके चित्रनगरीत हुबेहुब साकारलेल्या जेजुरी गडावरचं... जय मल्हार मालिकेच्या सेटवरचं. 

वातावरण तसं नेहमीचंच असलं तरी इथल्या प्रत्येकालाच काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. काही तरी हातातून निसटतंय असं वाटत होतं... कारण काही दिवसांतच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

हा गड साकारला त्याला आता काही वर्षं लोटली. नक्की सांगायचं तर 18 मे 2014 पासून जेजुरी गड, बानूचं गाव, त्याच्या आजुबाजूचा परिसर इथे वसलाय, गजबजलाय. सतीश पांचाळ यांनी तो साकारलाय. गेली तीन वर्षे बानू, देव आणि म्हाळसा इथेच वास्तव्यालाच होते म्हणायला हरकत नाही; 

पण आता हा जेजुरी गडच हळवा झाला आहे. कलाकारांना, निर्मात्यांसाठी सोन्याची जेजुरी ठरलेला हा सेट आता काही दिवसांनी या ठिकाणी नसेल. इथली लगबग, लाईट, कॅमेरा, ऍक्‍शनच्या दिग्दर्शकीय सूचना, कलाकारांचे संवाद, लंच टाईमला चालणारी मस्ती, पॅकअपनंतरची धमाल... सगळं काही शांत शांत होणार आहे. ही जेजुरी आता त्यामुळेच गहिवरली आहे. सेटवरचं सारं वातावरणच हळवं झालंय... 

चांगभलं आठवणींचं 

जय मल्हारसाठी विचारणा होण्याआधी मी एक मालिका करत होतो. त्या वेळी मनोज कोल्हटकर हा माझा जिवलग स्नेही फोटो पाठव, असं सांगायचा; पण काही ना काही कारणामुळे राहूनच गेलं ते. मग त्यानेच माझे फेसबुकवरून आणि अजून कुठून कुठून काही फोटो मिळवून कोठारे व्हिजन्सकडे पाठवून दिले. त्यांचा थेट फोनच आला मला. म्हणाले, ऑडिशनसाठी या. मी गेलो ऑडिशनला. तिथे, जय मल्हार मालिकेचे जनक संतोष अयाचित सर होते. त्यांनी सांगितलं, ही मालिका आहे महाराष्ट्राचं लाडकं दैवत खंडेरायाची. झी मराठीवर येतेय. मग ऑडिशनला सुरुवात झाली. ती पूर्ण होण्याच्या आतच संतोषसर म्हणाले, बस्स, थांब... सापडला आम्हाला आमचा खंडेराय सापडलाय! 

मग महेश कोठारे सरांनी खंडेरायाचे कॉश्‍चुम्स दिले. तेव्हा ते म्हणाले आतापर्यंत मी कित्येकांना हे कपडे दिले; पण तुझ्या अंगावर ते असे दिसताहेत की ते तुझ्यासाठीच बनलेत. 

दरम्यान वाहिनीमधील क्रिएटिव्हजही विचार करत होते. सगळी पात्रं ठरत होती; पण खंडेराय ठरत नव्हता. तेव्हा प्रोमो हेड अमोल पाठारे म्हणाले, की माझ्यासमोर एकच चेहरा येतोय तो म्हणजे देवदत्त नागे... तिथे आलेले निर्माते म्हणाले, आम्हीही त्याचीच ऑडिशन क्‍लीप घेऊन आलोत. ती पाहिल्यावर माझी निवड नक्कीच झाली. त्यांनी खूप विश्‍वास टाकला माझ्यावर आणि आज तीन वर्षानंतर वाटतंय तो विश्‍वास मी सार्थ ठरवलाय. ही मालिका सुरू असताना खूप मोठ्या ऑफर्स आल्या; पण मी त्या नाकारल्या. कारण माझी बांधिलकी या मालिकेशी आणि वाहिनीशी होती. 

मला आठवतंय, आमचं पहिलं फोटो शूट. त्या दिवशी माझ्यासोबत बाणाई, म्हणजे ती भूमिका साकारणारी इशा (केसकर) होती. त्या प्रोमोमध्ये मी उजवा पाय उचलतोय असा शॉट होता. तेव्हापासून मला असं वाटतं की माझा उजवा पाय दिसला म्हणजे तो प्रोजेक्‍ट हीट होणार. तो प्रोमो खूप गाजला. प्रेक्षकांना मालिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली. काही एपिसोड शूट झाले होते; पण माझ्या मनातल्या शंका संपत नव्हत्या. मी खंडेराय नीट साकारेन की नाही, याची भीती कायम मनात होती. एके दिवशी तर मी संतोष सरांना अक्षरशः रडत-रडत फोन केला. त्यांना विचारलं, प्रेक्षक मला स्वीकारतील ना... ते म्हणाले, तू अजिबात काळजी करू नकोस. त्यानंतर मालिका सुरू झाली आणि प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मला मिळाली आणि मी खूप भारावून गेलो. 

तेव्हापासून आतापर्यंत जे काही शूट केलंय ते सारं श्रद्धेने शूट केलंय. मालिकेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत शेवटचे काही दिवस राहिले असताना यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात भंडारा उधळला जातो आणि माझ्या मेकअपला सुरुवात होते; मग जेजुरीहून आणलेला भंडारा माझ्या कपाळी लावला जातो. आणि मी खंडेरायांच्या वेशभूषेत तयार होतो. तेव्हा असं वाटतं खंडेरायांचा अंश माझ्यात आलाय. त्याच पद्धतीने मग मी संवाद बोलतो. माझी भाषा, माझं बोलणं ही माझ्या पालकांची देण आहे. त्याचबरोबर माझं सुदृढ शरीर जे मी नियमित व्यायामाने कमावलं आहे. मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही. मला फक्त व्यायामाचं व्यसन आहे. मी नियमित व्यायाम करतो. त्यात कधीही खंड पडू देत नाही. आम्ही सेटवर 18 तास शूट करत असतो. त्यामुळे व्यायामाला वेळ मिळावा म्हणून मी गेली तीन वर्षं फक्त चार तास झोप घेऊन उर्वरित वेळ व्यायामाला देतोय. कारण प्रेक्षकांना खंडेराय त्यांच्या देहयष्टीसहित भावलेले आहेत. शूटिंगदरम्यान आम्ही अनेक चांगल्या वाईट प्रसंगाना तोंड दिलं आहे. आणि आव्हान म्हणाल तर खंडू गावडा साकारणं हे आव्हान होतं. जेव्हा म्हाळसा खंडेरायांना शाप देते की तुम्ही वृद्ध व्हाल. त्यानंतर माझ्यावर खूप दडपण आलं होतं की मी माझं पिळदार शरीर म्हाताऱ्याची भूमिका करताना कसं लपवू? तेव्हा मी खंडेरायांना मनातून साकडं घातलं आणि ती भूमिकाही नीट निभावली. 

रसिक प्रेक्षकांनी आणि खंडेरायाने मला देवत्व बहाल केलं. प्रेक्षक सेटवर भेटायला येतात तेव्हा चप्पल काढूनच माझ्याजवळ येतात. मला नवस बोलतात. चांगलं होऊ दे, असं म्हणतात. आतापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक मला सेटवर भेटायला आलेले आहेत. तेव्हा त्यांना साक्षात खंडेराय भेटल्याची अनुभूती होते. एक आजीबाई आमच्या सेटवर आल्या होत्या. त्यांना कॅन्सर होता. त्यांनी मला पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्यांना काही बोलायला सुचत नव्हतं. मी त्यांना जवळ घेऊन शांत केलं. 

रसिकांनी माझ्यावर, खंडेरायांवर खूप प्रेम केलं. आता ही मालिका निरोप घेत असताना माझाही कंठ दाटून येतोय; पण मी शूटिंगच्या शेवटच्या दिवसापर्यंत माझ्या भावना दाबून ठेवतोय. कारण मी खूप भावनिक आहे. माझे डोळे भरून आले तर शूटवर त्याचा परिणाम होईल. म्हणून मी या क्षणी माझ्या भावना हृदयाच्या कप्प्यात दडवल्या आहेत. माहीत नाही शेवटच्या दिवशी कदाचित त्यांना वाट मोकळी करून देईन. सेटवर यायची इतकी सवय झालीय की वाटतं की शूट संपलं तरी मी झोपेतून उठून थेट सेटवरच येईन. 

खंडेरायांची भूमिका साकारल्यानंतर आता माझ्या ओळखीच्या निर्मात्या, दिग्दर्शकांकडून इतर प्रोजेक्‍टसाठी विचारणा होतेय. तो सिनेमा, नाटक किंवा मालिका असेल हे अजून ठरवलं नाहीय. मला अजून खूप काही शिकायचं आहे. मी स्वतःला अजून विद्यार्थीच समजतो. प्रेक्षकांनी जी जबाबदारी अभिनेता म्हणून माझ्यावर टाकली आहे, त्याला साजेशी भूमिका स्वीकारून सिनेमा, नाटक किंवा टीव्ही हे माध्यम निवडेन. 

आशुतोष परांडकर (पटकथा आणि संवाद लेखक) 
मी लेखक म्हणून या मालिकेवर काम करण्याआधी संतोष आयाचित (संकल्पना आणि लेखक) आणि नीलेश मयेकर (तेव्हाचे कार्यकारी निर्माते) या दोघांनी मिळून बरंचसं काम केलं होतं. मग जय मल्हार ही मालिका सुरू होण्याआधी सहा महिने मी मालिकेसाठी लेखन करायला सुरुवात केली. त्या वेळी आम्ही प्रत्येक जण शिस्तबद्ध पद्धतीने नीट ठरवून एपिसोडची आखणी करायचो. एपिसोडची बांधणी कशी व्हायला हवी, यावर खूप चर्चा करायचो. तसंच पटकथा लेखन करताना काही नियम आखून घेतले होते. जय मल्हार मालिका ही एका अर्थाने एक केस स्टडी होती. ही भव्य-दिव्य मालिका साकारणं हा एक प्रयोगच होता; पण हा लेखनाचा प्रवास उत्सुकतेने भारलेला होता. 

आम्ही एकत्र मिळून कधी नागावसारख्या ठिकाणी जाऊन चर्चा करायचो. मालिकेचं कथानक भरकटत तर नाही ना, यावर विचार करायचो. प्रत्येक छोट्या गोष्टीचा विचार करून लिहायचो. संवादलेखन करताना आम्ही दोन भाग केले होते. त्यामध्ये बानूच्या गावाकडची बोलीभाषा ठेवली होती. गावाकडच्या लोकांची साधी बोली त्यांना दिली होती आणि खंडेरायाच्या जेजुरीगडावरील पात्रांची शुद्ध मराठी प्रमाण भाषा दिली होती. यानिमित्ताने जुनं मराठी वाचनात आलं. 

आजची मराठी भाषा आणि जुनं मराठी यांची सांगड घालून संवादाची ओघवती शैली ठेवली. वाहिनी, निर्माते, आम्ही लेखक ही मालिका एक चांगली कलाकृती झाली पाहिजे, याच ध्येयाने काम करत होतो. मालिका लेखनाचा पुरेपूर आनंद घेत काम केलं. वाहिनी आणि निर्मात्यांनी आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. मी याआधी अशा प्रकारची दैनंदिन मालिका लिहिली नव्हती. त्यामुळे हा माझा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला, त्याला खंडेरायांचाच आशीर्वाद होता, असं वाटतंय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com