लांबलेल्या 'खटल्या'ला कलाकारांचा 'न्याय' (जॉली एलएलबी 2)

महेश बर्दापूरकर
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

कथेच्या सुरवातीच्या टप्प्यात जॉलीची कौटुंबिक पार्श्‍वभूमी व पोलिसांनी केलेला एन्कॉउंटर दाखवण्यात बराच वेळ खर्च करण्यात आला आहे. मूळ कथा असलेल्या खटल्याच्या प्रसंगाला मध्यंतरानंतरच हात घातला जातो. तोपर्यंत गाणी, जॉली व पुष्पाचं (लग्नानंतरचं) प्रेम, बनावट एन्काउंटर झालेल्या व्यक्तीच्या पत्नीची कैफियत यांवर भर दिला गेला आहे.

अक्षयकुमारचा "जॉली एलएलबी 2' न्यायव्यवस्था, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर थेट भाष्य करणारा आणि देशाची सुरक्षा, हिंदू-मुस्लिम भाईचाऱ्यासारख्या विषयांना भिडणारा चित्रपट आहे. अक्षयच्या जोरदार अभिनयाबरोबरच सौरभ शुक्‍ला आणि अन्नू कपूर यांच्यातील अभिनयाची जुगलबंदी, हुमा कुरेशीची वेगळी भूमिका, दिग्दर्शक सुभाष कपूर यांची नेटकी हाताळणी यांमुळं चित्रपट गुंतवून ठेवतो. 

"जॉली एलएलबी 2'ची कथा आहे जगदीश्‍वर मिश्रा ऊर्फ जॉली (अक्षयकुमार) या बनारस शहरात राहणाऱ्या होतकरू वकिलाची. छोटे खटले लढून पोट भरणारा व मोठा वकील होण्याची स्वप्न पाहणारा जॉली स्वतःचं चेंबर होण्यासाठी धडपडतोय. ते झाल्यास आपलंही नाव होईल असं त्याला वाटतं आणि पत्नी पुष्पाला (हुमा कुरेशी) तो हे पटवून देतो. त्यासाठी तो एका अशिलाला चक्क फसवून पैसे उकळतो. मात्र, हे प्रकरण जॉलीच्या खूपच अंगलट येतं, एक महिलेवर आत्महत्येची वेळ येते. प्रायश्‍चित्त घेण्यासाठी त्या प्रकरणाचा नव्यानं छडा लावण्याचा निश्‍चय जॉली करतो आणि पोलिस, अतिरेकी व वकिलांमधील एक वेगळाच सामना रंगतो. प्रतिस्पर्धी वकील एस. के. माथूर (अन्नू कपूर) जॉलीमध्ये खडाजंगी सुरू होते. न्यायाधीश सुंदरलाल त्रिपाठी (सौरभ शुक्‍ला) दोघांची बाजू ऐकून घेताना धमाल उडते. मूळ प्रकरण थेट देशद्राहाचं असतं. पोलिस व अतिरेक्‍यांमधील लागेबांधे व त्याला न्यायव्यवस्थेच्या साथीचा छडा जॉली आपल्या पद्धतीनं लावतो व चित्रपटाचा अपेक्षित शेवट होतो. 

कथेच्या सुरवातीच्या टप्प्यात जॉलीची कौटुंबिक पार्श्‍वभूमी व पोलिसांनी केलेला एन्कॉउंटर दाखवण्यात बराच वेळ खर्च करण्यात आला आहे. मूळ कथा असलेल्या खटल्याच्या प्रसंगाला मध्यंतरानंतरच हात घातला जातो. तोपर्यंत गाणी, जॉली व पुष्पाचं (लग्नानंतरचं) प्रेम, बनावट एन्काउंटर झालेल्या व्यक्तीच्या पत्नीची कैफियत यांवर भर दिला गेला आहे. मात्र, वकील माथूर आणि न्यायाधीश त्रिपाठी यांची एन्ट्री होताच चित्रपट तुफान वेग पकडतो. या भागातील प्रसंग आणि संवाद न्यायव्यवस्थेतील त्रुटी दाखवत, त्यावरचे उपाय सांगत, व्यवस्थेवर कोरडे ओढत तुफान हसवतात आणि विचार करायलाही भाग पाडतात. रात्री बारानंतर सुनावणी करत न्यायाधीशांनी नोंदविलेल्या साक्षी आणि त्या दरम्यान घडलेले प्रसंग तुफान मनोरंजक झाले आहेत. शेवट खूपच अपेक्षित असला तरी हिंदी चित्रपटांमध्ये न्यायालयांची पांढरी आणि काळीही बाजू उघडपणे मांडल्यानं चित्रपट वेगळा ठरतो. (इथं चैतन्य ताम्हणेच्या "कोर्ट' या मराठी चित्रपटाची आठवण येतेच.) 

अक्षयकुमारनं त्याच्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध अशी मवाळ भूमिका साकारली आहे. (चित्रपटात त्याला एकदाही हात उचलण्याची संधी मिळालेली नाही.) मात्र, भावनिक आणि विनोदी प्रसंगात कमाल करीत त्यानं बाजी मारली आहे. सौरभ शुक्‍ला यांनी साकारलेला न्यायाधीश पहिल्या भागाप्रमाणंच भन्नाट. शुक्‍ला यांनी प्रत्येक वाक्‍यावर हशा किंवा टाळी वसूल केली आहे. देहबोली आणि संवादफेकीतून त्यांनी मस्त परिणाम साधला आहे. अन्नू कपूरनं साकारलेला वकीलही जबरदस्त आणि न्यायाधीश-वकील जुगलबंदी पाहण्यासारखी. हुमा कुरेशीनं जॉलीच्या पत्नीच्या भूमिकेत छान काम केलं आहे. 

एकंदरीतच, चित्रपटामध्ये विनाकारण पेरलेली गाणी, ओढून-ताणून आणलेले भावनिक प्रसंग, मूळ कथेला हात घालण्यासाठी लावलेला वेळ या त्रुटी आहेत. मात्र, सर्वच कलाकारांनी भन्नाट अभिनयातून कथेला "न्याय' दिल्यानं चित्रपट देखणा झाला आहे. 

निर्मिती - फॉक्‍स स्टार स्टुडिओ 
दिग्दर्शक - सुभाष कपूर 
भूमिका - अक्षय कुमार, सौरभ शुक्‍ला, अन्नू कपूर, हुमा कुरेशी आदी.