हिंदीतले खलनायक आले मराठीत

khalanayak marathi movie esakal news
khalanayak marathi movie esakal news

मुंबई : आजवर बऱ्याच कलाकारांनी खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम केलं आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे खलनायकी भूमिका साकारणारे काही कलाकार तर नायकांइतके लोकप्रियही झाले आहेत. अवतार गिल, रझा मुराद, शाहबाझ खान आणि कुनिका या कलाकारांनीही आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर वेळोवेळी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता ‘धिंगाणा’ या मराठी चित्रपटात या कलाकारांचा खलनायकी अभिनय पाहायला मिळणार आहे. येत्या ८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक चंद्रकांत दुधगावकर यांनी ‘धिंगाणा’चं दिग्दर्शन केलं असून, समीर सदानंद पाटील यांनी ममता प्रोडक्शन हाऊस या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अवतार गिल, रझा मुराद, शाहबाझ खान आणि कुनिका हे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार प्रथमच मराठीत एकत्र दिसणार आहेत. मराठी चित्रपट ही संक्रमणावस्थेतून जात असल्याने हिंदीतील बऱ्याच कलाकारांचा मराठीकडे ओढा वाढला आहे, पण एकाच वेळी चार नामवंत कलाकारांना ‘धिंगाणा’मध्ये खलनायकी भूमिकेसाठी निवडलं जाणं ही कथेची गरज असल्याचं निर्माता समीर सदानंद पाटील यांचं म्हणणं आहे.

या चित्रपटाची कथा वर्तमान काळातील वास्तववादी सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी आहे. त्यामुळे यातील खलनायकी भूमिका साकारणारे कलाकारही त्याच ताकदीचे असणं गरजेचं होतं. मराठीतही खलनायकी भूमिका साकारणारे तगडे कलाकार असले तरी ‘धिंगाणा’मधील व्यक्तिरेखांसाठी हिंदीतले कलाकार आवश्यक होते. या चारही जणांना जेव्हा ‘धिंगाणा’मध्ये अभिनय करण्याबाबत विचारलं गेलं तेव्हा त्यांना आपापल्या व्यक्तिरेखा खूप भावल्या आणि त्यांनी तात्काळ होकार दिल्याचं दिग्दर्शक चंद्रकांत दुधगावकर यांचं म्हणणं आहे. हे चौघेही एक चिटफंड कंपनी चालवत असल्याचे चित्रपटात पाहायला मिळेल. अवतार गिल यांनी मोहनअण्णा, रझा मुराद यांनी अंजनमामा, शाहबाझ खान यांनी राजा भैया, तर कुनिका यांनी करिष्मा नावाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

‘धिंगाणा’चं दिग्दर्शन करणाऱ्या चंद्रकांत दुधगावकर यांनी या चित्रपटात एका आशयघन कथानकाद्वारे महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. हेमंत एदलाबादकर यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. प्रियदर्शन जाधव आणि प्राजक्ता हनमघर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

कॅमेरामन आय. गिरीधरन यांनी छायांकन केलं असून, फैझल महाडीक यांनी संकलन केलं आहे. ‘धिंगाणा’ मध्ये विविध मूड्समधील तीन गाणी असून, संगीतकार अमितराज आणि शशांक पोवार यांनी संगीतबद्ध केली आहेत. कोरिओग्राफर सुजीत कुमार यांनी या चित्रपटातील गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. संदिप इनामके यांनी कलादिग्दर्शन केलं आहे, तर संजय कांबळे प्रोडक्शन डिझाइनर आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूरमधील विविध लोकेशन्सवर चित्रीत झालेला हा सिनेमा ८ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com