जवानांकडून प्रेरणा मिळाली आणि 'लागिर'चा जन्म झाला...

actress shweta shinde
actress shweta shinde

माझ्या सातारा जिल्ह्यातील इतक्‍या जवानांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर आपल्या जीवांची बाजी लावली आहे, या अभिमानाने माझे मन भारावून गेले. माझे जवान बंधू देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची आहुती द्यायला तयार आहेत, हे वास्तवच मला भिडले. आपल्यासाठी, भारतीयांसाठी या जवानांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा त्याग, त्यांचे शौर्य सारे पाहून दाटून आले. अंगावर शहारा आला. देशाभिमान दुणावलाच पण त्यातही माझ्या मातीचे योगदान पाहून माझा उर अभिमानाने भरून आला. या जवानांप्रती आपण प्रत्येकाने कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. इथेच प्रेरणा मिळाली आणि "लागिर'चा जन्म झाला.

कलाकारांच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कारगिलला जाण्याचा योग आला. लष्कराच्या जवानांसमोर कला सादर करताना कलाकारांना हुरूप आला होता. आमच्या प्रत्येकाचेच मन देशाभिमानाने चैतन्यमय झाले होते. माझ्या कलेचा आविष्कार मी सादर केला आणि जवानांशी संवाद साधू लागले. त्यावेळी सभागृहातून "मराठी, मराठी' अशी मागणी होऊ लागली. जम्मू- काश्‍मीरसारख्या राज्यात मराठीचा आग्रह पाहून मीही अचंबित झाले. उत्सुकतेपोटी मराठी समजते, त्यांना हात वर करण्यास मी सांगितले. सभागृहातील बहुतेक हात वर झाले. मग महाराष्ट्रातील किती असे विचारल्यावरही बहुतेक हात वरच. आणि सातारा जिल्ह्यातील जवानांनी हात वर करावा, असे म्हणताच बहुतेक हात वरच राहिले. मला सुखद धक्काच बसला. कारण हे सारे जवान माझ्याच मातीतील होते. तोपर्यंत मला कल्पनाही नव्हती की माझ्या सातारा जिल्ह्यातील इतक्‍या जवानांनी आपल्या देशाच्या, आपल्या प्रत्येकाच्या संरक्षणासाठी सीमेवर आपल्या जीवांची बाजी लावली आहे. माझे मन या अभिमानाने भारावून गेले. माझे जवान बंधू आपल्या देशाच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची आहुती द्यायला तयार आहेत, हे वास्तवच मला भिडले होते. आपल्यासाठी, भारतीयांसाठी या जवानांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा त्याग, त्यांचे शौर्य सारे पाहून दाटून आले. अंगावर शहारा आला. देशाभिमान दुणावलाच पण त्यातही माझ्या मातीचे योगदान पाहून माझा उर अभिमानाने भरून आला. या जवानांप्रती आपण प्रत्येकाने कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. इथेच प्रेरणा मिळाली आणि "लागिर'चा जन्म झाला.

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरचित्रवाणीवरील अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनात स्थान मिळविलेल्या अभिनेत्री श्‍वेता शिंदे- भन्साळी सांगत होत्या. अभिनेत्रीच्या भूमिकेतून त्यांचा प्रभाव मनात असतानाच आता त्या निर्मात्याच्या भूमिकेतून बोलत होत्या. कारगिलमधील घटना सांगतानाच त्यांच्या डोळ्यात जवानांविषयीचा आदर ओसंडून वाहत होता. कारगिलनंतर त्यांच्या मनातून जवानांविषयीचे विचार त्यांना अधिकच अस्वस्थ करीत होते. आपल्या कलेच्या माध्यमातून जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करता येऊ शकेल, हा विश्‍वासही त्याच्या मनात होता. दुदर्म्य इच्छाशक्ती असली की मार्ग सापडतो. तसेच झाले. मुंबईतील एका कार्यक्रमात वाईच्या तेजपाल वाघ या तरूण लेखकाशी त्यांची भेट झाली. चर्चा करताना तेजपाल एक कथा सांगू लागले आणि श्‍वेता त्याला प्रतिसाद देत होत्या. जवानांशी निगडीत कथा ऐकतानाच त्यांना "क्‍लिक' झाले. हीच ती कथा... जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना धागा मिळाला. पुढे तेजपाल यांच्याशी चर्चा करून या कथेवर आधारित काही कलाकृती निर्माण करण्याचे त्यांनी निश्‍चित केले. सिनेमा की मालिका या द्वंदात त्या काही काळ अडकल्याही. आपल्याला हवे ते कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या मनात बिंबविण्यासाठी तीन तासांच्या सिनेमाला मर्यादा येतात. मालिकेमुळे मात्र घराघरांतून प्रत्येकाच्या मनात रोज तो विषय भिनत जातो. म्हणून या माध्यमाद्वारे आपला जवानांविषयीचा आदर व्यक्त करण्याचे त्यांनी निश्‍चित केले. कथा मिळाली. सूत्र ठरले. परंतु पुढचे सोपस्कारही महत्त्वाचे होते. अनेक दिव्यातून पुढे जायचे होते. झी मराठीकडे चर्चा झाली. तेजपालकडून कथा ऐकल्यावर विषय ऐकून मालिकेला तात्काळ मान्यता मिळाली. आता खरी कसोटी होती. मालिकची निर्मिती करायची म्हणजे एक मोठे शिवधनुष्य पेलायचे होते.

कारगिलला मिळालेली प्रेरणा प्रत्यक्षात येण्याचे स्वप्न आता खरे होणार होते. मालिकेचा प्रकल्प करायचा तर तो कसा याचे काही ठोकताळे श्‍वेता शिंदे यांनी आधीच आखून ठेवले होते. मालिका करायची ती सातारा परिसरात. स्थानिक कलाकारांना अधिकाधिक संधी द्यायची. आणि मुख्य म्हणजे सातारी भाषेचा बाज जगासमोर आणायचा. हे सारे आव्हान होते. पण आखणीनुसार काम सुरू झाले. कलाकारांच्या ऑडिशन्स, चित्रिकरण स्थळे, इतर व्यवस्था अशी एकेक प्रक्रिया पूर्ण होत गेली. चित्रिकरण सुरू झाले. झी वाहिनीने लगेचच म्हणजे महाराष्ट्रदिनीच एक मे रोजी ही मालिका प्रक्षेपित करण्याचे ठरविले. वेळ कमी होता. परंतु जिद्दीने काम सुरू केले आणि अखेर एक मे रोजी स्वप्नपूर्तीचा पहिला भाग प्रसारित झाला. पहिल्या भागापासूनच मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मालिकेत मालिकेचा नायक अजून लष्करात भरती व्हायचा आहे. मात्र, लोकांच्या काळजाला हात घालणारा विषय असल्याने लोकांची उत्सुकता ताणली आहे. आणि अर्थातच त्यामुळे मालिकेची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अजिंक्‍य, शीतली, जयडी, राहुल्या, विक्रम, भैय्यासाहेब अशा पात्रांनी आता घराघरांत जणू वास्तव्यच केले आहे.

मालिकेचे चित्रिकरण बहुतांशी वाई आणि सातारा तालुक्‍यातील आहे. वाई तालुक्‍यातील चांदवडी गावालाच "लागीर' झालयं. ही मालिका आपलीच आहे या भावनेतून गावकरी सर्व ती मदत करीत असतात. तिथून जवळच असणाऱ्या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा परिसरही मालिकेत दिसतो. कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांचे मोठे सहकार्य लाभल्याचे श्‍वेता शिंदे सांगतात. सातारा, वाई परिसरातील स्थानिक कलावंतांना छोट्या- मोठ्या भूमिकेतून या मालिकेतून अभिनयाची संधी मिळाली आहे. मालिका करण्याचे निश्‍चित होण्यापूर्वीच आपल्या स्थानिक कलाकारांना वाव देण्याचे ठरविले होते, असे सांगून श्‍वेता शिंदे म्हणाल्या, ""सातारा जिल्ह्याला नाट्यचळवळीची मोठी परंपरा आहे. एकांकिका स्पर्धा, नाटके किंवा इतर सांस्कृतिक उपक्रम सातत्याने होत असतात. रसिकांकडूनही कलाकृतींना चांगले प्रोत्साहन मिळते. मात्र, मुंबईपर्यंत जाऊन या क्षेत्रात यश मिळविणे प्रत्येकाला शक्‍य होत नाही. त्यामुळे अनेक गुणी कलाकार इथल्याच परिघापुरते मर्यादित राहिले. काही मोजके कलावंतच संघर्ष करून यशस्वी झाले. पण इथे कला असूनही गुणांना वाव मिळत नाही, ही गोष्ट बोचत होती. या मालिकेच्या निमित्ताने अनेकांना संधी देण्याचे डोक्‍यात होते. ऑडिशन टेस्टनंतर त्यात यश मिळाले आणि त्यांना संधी देता आली, याचा मनापासून आनंद झाला.''

सातारी भाषा हे "लागीर'चं आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे. हल्ली मराठीच्या वेगवेगळ्या बोली असणाऱ्या मालिकांवर भर दिला जात आहे. कोकणी, कोल्हापूरी, विदर्भातील भाषा सहज दिसू लागली आहे. कोल्हापूर आणि पुण्याच्या मध्ये असणारा सातारा जिल्ह्याचा परिसरातील म्हणजे या सातारी भाषेचे वेगळेपण सिद्ध करणे म्हणजे अवघड गोष्ट होती. साताऱ्यातील रंगकर्मी मकरंद गोसावी यांचा भाषेचा अभ्यास या मालिकेतील पात्रांसाठी उपयुक्त ठरला. नायिका मुंबईची आहे. तिच्याकडून भाषेचा, सातारी बोलण्याचा इतका सराव करून घेतला आहे की तिला पाहून, ऐकून ती मुंबईची आहे, हे सांगितल्याशिवाय खरे वाटत नाही. मकरंदला या कामासाठी चित्रिकरणस्थळी 24 तास "लॉक'च करून ठेवले आहे. त्यामुळेच या मालिकेतील पात्रांची भाषा व संवादफेक परफेक्‍ट सातारी झाली आहे. इतर कलावंत याच परिसरातील असले तरीही बोलण्याचा सराव व सातत्य टिकविण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. केवळ संवादफेकीमुळे "राहुल्या' हे पात्र लोकांना भावल्याचे उदाहरणही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

मालिका लोकांच्या मनात रेंगाळत आहे. मुंबईव्यतिरिक्त इतरत्र चित्रण करायचे म्हणजे मोठी कसरत असते. निर्माती म्हणून श्‍वेता शिंदे दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मालिका पूर्ण करण्यासाठी आणि विषय लोकांच्या मनात घर करून राहण्यासाठी जे जे प्रभावी करता येईल ते ते करण्यासाठी त्या धडपडत आहेत. प्रसंगी काही श्रमाची कामेही त्या पार पाडत आहेत. तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठीही त्यांना सतर्क राहवे लागत आहे. अनेक अडचणींवर मात करून मालिकेची वाटचाल सुरू आहे.

ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. अजून खूप कथानक आहे, उत्सुकता लोकांच्या मनात आहे. श्‍वेता शिंदे यांच्या मनातील संकल्पना मालिकेच्या रूपातून छोट्या पडद्यावर अवतरत आहे. प्रत्येकाच्या मनात जवानांविषयीचा आदर दुणावेल आणि देशभक्तीची भावना जागती राहिल, अशा पद्धतीने एकेक प्रसंग पुढे सरकत आहेत. लागीर होणं, कोणी तरी झपाटलयं, असं म्हणणंसुद्धा अंधश्रद्धा आहे. पण इथ लागीर झालयं ते विचारांचं आहे. देशप्रेमाचं. लष्कराच्या अभिमानाचं. जवानांच्या त्यागाचं. देशासाठी आपलं सर्वस्व देणाऱ्या कुटुंबीयांचं. जवानांविषयीचा आदर घरोघर पोहचविण्यासाठी श्‍वेता शिंदे खरोखरच झपाटलेल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com