ललितचे 'सोलार प्रेम'

चिन्मयी खरे 
शुक्रवार, 12 मे 2017

"आभास हा', "गंध फुलांचा गेला सांगून', "जिवलगा' या मालिकांमध्ये काम करणारा ललित प्रभाकर "जुळून येती रेशीमगाठी' मालिकेत आदित्यच्या भूमिकेने सर्वांचा लाडका झाला. त्याने नाट्यदिग्दर्शन आणि नाटकातही अभिनय केलेला आहे. आता "चि. व चि.सौ.कां.' या चित्रपटातून सोलारपुत्राच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कसा आहे हा सोलारपुत्र? 

"आभास हा', "गंध फुलांचा गेला सांगून', "जिवलगा' या मालिकांमध्ये काम करणारा ललित प्रभाकर "जुळून येती रेशीमगाठी' मालिकेत आदित्यच्या भूमिकेने सर्वांचा लाडका झाला. त्याने नाट्यदिग्दर्शन आणि नाटकातही अभिनय केलेला आहे. आता "चि. व चि.सौ.कां.' या चित्रपटातून सोलारपुत्राच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कसा आहे हा सोलारपुत्र? 

"जुळून येती रेशीमगाठी' ही माझी पहिली मालिका होती आणि "चि. व चि. सौ. कां.' हा माझा पहिलाच चित्रपट आहे. मला दोन्ही ठिकाणी काम करताना तेवढीच मजा आली. दोन्हीकडे काम करतानाचे माझे अनुभव वेगवेगळे आहेत. दोन्ही माझ्या आयुष्यातले टर्निंग पॉईंट होते. मालिकेत काम करताना हेमंत देवधर दिग्दर्शक होते. चित्रपटात काम करतानाही माझ्याबरोबर परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी असे गुणी कलाकार होते आणि मधुगंधाबरोबर तर मी आधीही काम केलंय. त्यामुळे समरसून काम केलं आणि काम करताना मजा आली. "चि. व चि. सौ. कां.' या चित्रपटात सोलारपुत्र म्हणजेच "सत्या' ही व्यक्तिरेखा करतो आहे. सोलारपुत्र का म्हणतात हे तुम्हाला या चित्रपटाचा ट्रेलर पाहून आत्तापर्यंत समजले असेलच. मी एक उद्योजक आहे; ज्याचा सौरऊर्जा बनवण्याचा कारखाना आहे आणि तो कामासाठी खूपच पॅशनेट आहे. त्याच्या कामावर त्याची खूप निष्ठा आहे. आपल्याकडे कोणतंही काम करताना आपण आपला फायदा पाहून काम करतो. पण त्याचं तसं नाहीय. या चित्रपटात माझ्याबरोबर मृण्मयी गोडबोले काम करतेय. तिचीही भूमिका तशीच आहे. तिचंही तिच्या कामावर खूप प्रेम आहे. ती प्राण्यांवर प्रेम करते; तर हा निसर्गावर. म्हणजे मला स्वतःला पाणी, वीज वाचवून काही मिळणार आहे का? तर तसं काही नाही. पण सौरऊर्जेच्या माध्यमातून ते करण्यासाठी तो झटतो आहे. त्यांच्या दोघांमध्ये त्यांच्या कामाविषयी काही स्वार्थ नाहीय. स्वार्थ न ठेवता काम करणारी माणसं खूप कमी असतात. त्यापैकी सोलारपुत्र आणि व्हेजकन्या या दोन भूमिका आहेत. मला वेगळी भूमिका या चित्रपटातून करायला मिळतेय त्याबद्दल खूप आनंद झाला. कारण कोणत्याही कलाकाराला यापेक्षा आणखी काय हवं असतं? "चि. व चि. सौ. कां.' हा एक विनोदी चित्रपट आहे. पण म्हणजे हा नेहमीसारखा विनोद नाही तर एक वेगळा विषय घेऊन केलेला विनोदी चित्रपट आहे. मराठी चित्रपटात विषयाला जास्त महत्त्व असतं. या चित्रपटाचंही तसंच आहे. असा विनोदी चित्रपट मराठीत आतापर्यंत झालेला नाहीय. लग्न संस्थेबद्दलचे वेगळे विचार या चित्रपटात मांडले आहेत. मुलगी लग्न व्हायच्या आधी मुलाबरोबर राहून बघण्याची अट घालते. तर असा वेगळा विषय घेऊन मराठीत हा प्रयोग होतोय. असे वेगवेगळे प्रयोग मराठीत होणं फार महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. 

हा चित्रपट लिव्ह इन रिलेशनशिपवर भाष्य करणारा नक्कीच नाही. लग्न करायचं नसतं तेव्हा ती लिव्ह इन रिलेशनशिप असते. पण इथे लग्न करायचं आहे. पण म्हणून त्यासाठी त्या मुलाच्या घरी त्याच्या घरच्यांबरोबरसुद्धा त्या मुलीला राहून पाहायचं आहे. आपण छोट्या-छोट्या गोष्टी घेतानासुद्धा किती विचार करून घेतो. लग्न करताना तर संपूर्ण आयुष्याचा निर्णय आपण घेत असतो. अरेंज मॅरेजमध्ये लग्न करायच्या आधी मुलगा-मुलगी भेटतात. पण त्या थोडक्‍या भेटीतून माणसं फार कळत नाहीत आणि कळली तरी आपण जेव्हा एका छताखाली राहतो त्या वेळी त्यातील बारकावे कळतात. तर ते नंतर कळण्यापेक्षा आधी कळणं फार गरजेचं आहे. कारण पुढचं संपूर्ण आयुष्य तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर घालवायचं आहे. त्यामुळे जर मुलगा किंवा मुलीला त्याच्या घरच्यांबरोबर त्याच्याबरोबर राहून पाहायचं असेल तर काय हरकत आहे? असं मला वाटतं. उलट हा एक चांगला मार्ग आहे, असं मी म्हणेन. 

मृण्मयी गोडबोलेबरोबर मी पहिल्यांदा काम करत असलो तरी माझं आणि तिचं ट्युनिंग खूप छान जुळलं. तिलाही नाटकाची पार्श्‍वभूमी असल्यामुळे काम खूप मन लावून करणं हे आमच्यात भिनलं आहे. त्यामुळे तिच्याबरोबर काम करताना मला खूप मजा आली. "टीटीएमएम' म्हणजेच "तुझं तू माझं मी' या चित्रपटातही मी काम केलं आहे. ही एक लव्हस्टोरी आहे. एवढंच मी आत्ता सांगू शकेन. मी नेहा महाजनबरोबर या चित्रपटात काम केलं आहे. नेहाबरोबर मी याआधी "झी टॉकिज'च्या टॉकीज लाईटहाऊस या कार्यक्रमात काम केलं होतं. तिच्याबरोबर मैत्रीही होती. त्यामुळे खूप मजा आली. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल.