“माचीवरला बुधा हे आप्पांनी त्यांच्या मरणाचे पाहिलेले स्वप्न आहे.– डॉ. वीणा देव

टीम ई सकाळ
सोमवार, 12 जून 2017

“माचीवरला बुधा हे आप्पांनी त्यांच्या मरणाचे पाहिलेले स्वप्न आहे. जीवन संपवायचे असेल तर ते बुधा सारखे...असे ते नेहमी म्हणत! खरंतर बुधा ही व्यक्तिरेखा म्हणजे आप्पा स्वत:च होते, असे वीणा देव यांनी सांगताच, कमालीची शांतता पसरली. आणि त्या प्रतिभावंत लेखकाबद्दलचा आदर कमालीचा वाढला. निमित्त होते माचीवरला बुधा या सिनेमाच्या संगीत प्रकाशनाचे.

मुंबई ; “माचीवरला बुधा हे आप्पांनी त्यांच्या मरणाचे पाहिलेले स्वप्न आहे. जीवन संपवायचे असेल तर ते बुधा सारखे...असे ते नेहमी म्हणत! खरंतर बुधा ही व्यक्तिरेखा म्हणजे आप्पा स्वत:च होते, असे वीणा देव यांनी सांगताच, कमालीची शांतता पसरली. आणि त्या प्रतिभावंत लेखकाबद्दलचा आदर कमालीचा वाढला. निमित्त होते माचीवरला बुधा या सिनेमाच्या संगीत प्रकाशनाचे.

मानव आणि निसर्गाचे अद्वैत अधोरेखित करणारे ज्येष्ठ साहित्यिक गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर यांची अजरामर साहित्यकृती ‘माचीवरला बुधा’ दृश्यरुपात येत्या शुक्रवारी १६ जून रोजी प्रदर्शित होत आहे. गो. नी. दाण्डेकर यांच्या जैत रे जैत आणि पवनाकाठचा धोंडी या कादंबऱ्यावर चित्रपट आले आणि गाजले. परंतु माचीवरला बुधा या कादंबरीवर गेल्या साठ वर्षात इच्छा असूनही कुणी चित्रपट निर्मिती करू शकले नाही. महाराष्ट्राचे कोकण महाद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सुमारे २५०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या राजमाची गडावर चित्रीकरण करणे किंवा त्यासारखे दुसरे स्थळ मिळणे हे महाकठीण काम होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी, छत्रपती शाहू महाराज आदिंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजमाचीवर जाऊन सिनेमा पूर्ण करण्याचे दिग्दर्शक विजयदत्त आणि गोनिदांची कन्या डॉ. वीणा देव यांचे स्वप्न निर्मात्या दीपिका विजयदत्त यांनी सत्यात उतरवले आहे.

मुंबईच्या धकाधकीतले नकोसे झालेल्या जगण्याचा त्याग करून राजमाची गडावर निवांतपणे निसर्गाच्या कुशीत स्वतःला विलीन करणाऱ्या बुधा या नायकाची भूमिका ज्येष्ठ अभिनेते सुहास पळशीकर यांनी साकारली असून स्मिता गोंदकर, भगवान पाचोरे, नितीन कुलकर्णी आणि बालकलाकार कृष्णादत्त आदी सहकलाकारांच्या भूमिका आहेत. पटकथा-संवाद प्रताप गंगावणे यांचे असून छायालेखन अनिकेत खंडागळे यांचे आहे. संगीत धनंजय धुमाळ यांचे असून पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे.‘माचीवरला बुधा’ मध्ये बुधा या नायकाबरोबर निसर्ग आणि वन्यजीव-पशुपक्षीही एक पात्र म्हणून समोर येतात. त्यात ‘टिप्या’ या बुधाच्या लाडक्या श्वानाच्या भुमिकेतील कलाकाराने अप्रतिम अभिनय केला आहे.