अमेरिकन चॅनलसाठी प्रियांका चोप्रा-माधुरी दिक्षित एकत्र

टीम ई सकाळ
शनिवार, 29 जुलै 2017

माधुरी दिक्षित आणि प्रियांका चोप्रा या दोन अभिनेत्री आता एकत्र येणार आहेत. अमेरिकेतील चॅनलसाठी त्या दोघी एका मालिकेची निर्मिती करणार असून, हा शो माधुरी दिक्षितवर बेतलेला असणार आहे. प्रियांका याची निर्माती असून माधुरी कार्यकारी निर्माती असणार आहे. 

मुंबई : माधुरी दिक्षित हे नाव भारतीयांसह अमेरिकन नागरिकांना नवं नाही. कारण हिंदी चित्रपटांमुळे ती भारतभरात माहीत झाली. पुढे अमेरिकेत गेल्यानंतर तिथेही ती सर्वपरिचित झाली. आता तिच्यापाठोपाठ बेवाॅच आणि क्वांटिकोमुळे प्रियांका चोप्राची लोकप्रियता जगभरात वाढली आहे. प्रियांकानेही अमेरिकेत जाऊन आपलं नाव कमावलं. आता या दोघी एकत्र येणार आहेत. प्रियांका आणि माधुरी मिळून एक काॅमेडी सीरीज प्रोड्यूस करणार आहेत. अमेरिकन चॅनलसाठी हा शो असणार आहे.

माधुरी दिक्षितवर हा शो बनणार असून लग्नानंतर माधुरी अमेरिकेत कशी आली, ती कशी सेटल झाली असा हा शो असणार आहे. प्रियांका चोप्रा या शोची सहनिर्माती असणार आहे. तर माधुरी आणि श्रीराम नेने या शोचे कार्यकारी निर्माते असणार आहेत. या तिघांनी त्यासाठी खास फोटोशूट केले आहे. हा शो कघीपासून दिसू लागणार, त्यात आणखी काय काय असणार ते मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. विशेष बाब अशी की हा शो काॅमेडी शो असणार आहे.