'स्व'त्वाच्या शोधाचा भरकटलेला रस्ता (जब हॅरी मेट सेजल)

शनिवार, 5 ऑगस्ट 2017

इम्तियाज अलीचे "जब वुई मेट', "रॉकस्टार', "हायवे' किंवा "तमाशा'सारखे चित्रपट पाहिलेल्यांनाही कथा कोणत्या दिशेला जाणार याचा अंदाज पहिल्या काही मिनिटांत येतो. इम्तियाजची पात्रं कायमच (हातचं सोडून) नव्यानं स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात आणि हा प्रवास खूप लांबचा आणि संथही असतो.

'जब हॅरी मेट सेजल' हा इम्तियाज अली दिग्दर्शित आणि शाहरुख खान व अनुष्का शर्माच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट मोठ्या अपेक्षा निर्माण करतो, मात्र अगदीच थोड्या पूर्ण करतो. पात्रांकडून सुरू असलेला "स्व'त्वाचा शोध हळूहळू रस्ता भरकटल्यानं प्रेक्षकांच्या पदरी निराशा येते. शाहरुख व अनुष्कानं आपापल्या भूमिकांत जीव ओतला असला, तरी त्यांच्यातील केमिस्ट्री जुळलेली नाही. संगीत व युरोपातील नेत्रसुखद छायाचित्रण या जमेच्या बाजू असल्या तरी त्या चित्रपटाला तारू शकत नाहीत.

"जब हॅरी मेट सेजल'च्या कथेमध्ये हॅरी (शाहरुख खान) युरोपमध्ये टुरिस्ट गाइडचं काम करीत असतो. त्याच्या आयुष्यात काही कमतरता असतात. (नक्की काय समजत नाही.) लग्न ठरलेली, हॅरीबरोबर युरोप टूर पूर्ण केलेली, मात्र भारतात परत जाताना विमानतळावरच होणाऱ्या नवऱ्याशी अंगठी हरवल्यानं भांडण झालेली सेजल (अनुष्का शर्मा) हॅरीच्या आयुष्यात येते. ती हरवलेली अंगठी शोधण्यासाठी हॅरीला पुन्हा एकदा पाहिलेल्या सर्व ठिकाणी बरोबर येण्याची गळ घालते. आता नकाशावर युरोपातील एक-एक देश दाखवत हे दोघं अंगठी शोधत (?) फिरू लागतात. (प्रत्येक देशात गेल्यावर पहिली एन्ट्री तिथल्या पबमध्येच होते आणि एक गाणं झाल्याशिवाय दोघं बाहेरच पडत नाहीत!) फिरताना दोघं एकमेकांत गुंतू लागतात. (सेजल एक पाऊल पुढं आल्यावर हॅरी दोन पावलं मागं जातो आणि हॅरी दोन पावलं पुढं आल्यावर सेजल चार पावलं मागं जाते.) दोघांच्या गुंतण्याचा हा गुंता शेवटापर्यंत सुरू राहतो आणि काही लुटुपुटुच्या प्रसंगांनंतर अपेक्षित शेवटाकडं येतो...

इम्तियाज अलीचे "जब वुई मेट', "रॉकस्टार', "हायवे' किंवा "तमाशा'सारखे चित्रपट पाहिलेल्यांनाही कथा कोणत्या दिशेला जाणार याचा अंदाज पहिल्या काही मिनिटांत येतो. इम्तियाजची पात्रं कायमच (हातचं सोडून) नव्यानं स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात आणि हा प्रवास खूप लांबचा आणि संथही असतो. इथंही तसंच होतं. कथेमध्ये हॅरी आणि सेजल ही दोनच पात्रं लिहिली गेली आहेत, इतर पात्रं केवळ कथा किंचित पुढं सरकण्याची गरज म्हणून येतात. इम्तियाजनं ही दोन्ही पात्रं खूप ताकदीनं लिहिली आहेत आणि सादरही केली आहेत. मात्र कथा फसते या दोघांची एकत्र येण्याची प्रक्रिया दाखवताना आणि ती प्रेक्षकांना पटवून देताना. या दोघांचं एकत्र येणं दाखविताना काही किमान प्रश्‍नांची उत्तरं देणंही दिग्दर्शक टाळतो आणि त्यामुळं कथा वरवरची, खोटी वाटायला सुरवात होते. मध्यंतरानंतर हा पट आणखीच निसटतो आणि प्रेक्षक कथेपासून तुटतो. कथेतील घोळ सुरू असताना येणारी "मैं तेरी राधा'सारखी गाणी आणि युरोपचं (फुकटातलं) दर्शन त्यातल्या त्यात मनोरंजन करतं.

शाहरुख खान आता अभिनयामध्ये वेगवेगळे प्रयोग करीत सुटला असून, हाही त्यानं केलेला प्रयोगच म्हणायला हवा. त्याची ट्रेडमार्क लव्हरबॉय भूमिका असूनही, तिला दिलेला बोजडपणाचा टच त्याला झेपलेला नाही. हात पसरून साद घालत, नेहमीप्रमाणं भावुक होऊन संवाद म्हणत तो चाहत्यांना खूष करण्याचा व आपण अद्याप सुपरस्टार असल्याचं भासविण्याचा प्रयत्न करीत राहतो. अनुष्कानं गुजराती बोलणारी, चुलबुली, स्वतःला शोधणारी सेजल उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र एका टप्प्यानंतर तिचाही गोंधळ उडालेला दिसतो. इतर कलाकारांनी अजिबातच संधी नाही.

एकंदरीतच, तुम्ही इम्तियाजच्या कथा सांगण्याच्या पद्धतीचे चाहते असल्यासच चित्रपटाला जा. दुसरा पर्याय अर्थातच शाहरुखनं काहीही केलं तरी आवडतं, हे मानणाऱ्यातील असल्यास जायला हरकत नाही. इतरांनी विचार करूनच निर्णय घ्या...

निर्मिती : गौरी खान
दिग्दर्शक : इम्तियाज अली
भूमिका : अनुष्का शर्मा, शाहरुख खान
श्रेणी : 2.5