गाण्यांची मैफल अन 'प्राॅब्लेम'चा म्युझिक लाॅंच

टीम इ सकाळ
बुधवार, 28 जून 2017

फ्रेश लूक, दमदार स्टारकास्ट आणि वेगळ्या धाटणीचं कथासूत्र यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ सिनेमाचं म्युझिक मुंबईत नुकत्याच झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात लाँच झाले.

मुंबई : फ्रेश लूक, दमदार स्टारकास्ट आणि वेगळ्या धाटणीचं कथासूत्र यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ सिनेमाचं म्युझिक मुंबईत नुकत्याच झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात लाँच झाले.

सिनेमाचे निर्मात्या रिचा सिन्हा, रवी सिंघ त्याचबरोबर स्पृहा जोशी, गश्मीर महाजनी, विजय निकम, कमलेश सावंत, मंगल केंकरे, सतीश आळेकर, सीमा देशमुख आणि इतर कलाकार यांच्याबरोबर लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. इंडस्ट्रीतले इतर अनेक नामवंत कलाकार आवर्जून ह्या सोहळ्यास उपस्थित होते.

या सोहळ्याच्या सुरुवातीलाच 'तुझ्यासाठी आता असणेही, नसणेही तुझ्यासाठी' या रोमँटिक गाण्यावरील गश्मीर- स्पृहाच्या सादरीकरणाने वातावरण गुलाबी केले ज्याला आपला मधुर आवाज दिला होता जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी. अभय जोधपूरकर आणि प्रियांका बर्वे यांचे विरल्या केव्हा हळुवार ह्या भावना या चित्रपटातील गाणे प्रियांका बर्वेने सादर केलेल्या या मंत्रमुग्ध करणाऱ्या हृदयस्पर्शी गाण्याने मैफिलीला चार चांद लावले. त्यानंतर बेला शेंडे हिच्या आवाजातील 'तुका साद तुझ्या माहेरची वाट देता गो' या कोकणी गाण्याच्या सादरीकरणाबरोबरच विडिओ ही लाँच करण्यात आला. या सोहळ्याचा शेवट जसराज जोशी आणि श्रुती आठवले यांच्या मधुर आवाजातील 'मौनातूनी ही वाट चालली पुढे' या गाण्याने झाला आणि हा म्युझिक लाँच सोहळा पार पडला.

मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत संगीत दिग्दर्शक हृषीकेश-सौरभ आणि जसराजनी, गीतकार गुरु ठाकूर लिखित 'तुका साद तुझ्या माहेरची वाट देता गो' आणि 'विरल्या केव्हा हळुवार ह्या भावना' तर वैभव जोशी लिखित 'मौनातूनी ही वाट चालली पुढे' आणि 'तुझ्यासाठी आता असणेही, नसणेही तुझ्यासाठी' अशी एकूण ४ गाणी संगीतबद्ध केलेली आहेत.

28 जुलै ला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.