ख्रिस्तोफर नोलनचा डंकर्क येतोय...

ख्रिस्तोफर नोलनचा डंकर्क येतोय...

‘द प्रेस्टिज’मधलं दोन प्रसिद्ध जादूगारांचं जग, त्यांची आपापसांतली स्पर्धा, श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या वेडातून सुरू झालेला जीवघेणा खेळ... ‘मेमेंटो’मध्ये स्मृतिभ्रंशाच्या आजारावर मात करत प्रेयसीच्या खुन्याला शोधून, त्याचा बदला घेणारा नायक, बॅटमन व जोकरची अफलातून जुगलबंदी, जोकरच्या पात्राला असलेली खोली, त्याची विकृती... ‘इन्सेप्शन’मधलं डोकं चक्रावून टाकणारं कोडं, स्वप्नांच्या पातळ्या, भौतिकशास्त्र आणि अवकाशाचे शास्त्रशुद्ध नियम सांभाळत केलेला, एखाद्या खऱ्याखुऱ्या स्पेस-मिशनइतके बारकावे असणारा ‘इंटरस्टेलर’ असे विविध विषय नोलननं समर्थपणे हाताळले. त्याच्या सिनेमातल्या पात्रांचा मनोव्यापार, त्यांचं अस्तित्व, त्यांचे स्वभाव हे सगळं एकदम खऱ्या जगातल्यासारखं भासतं. नोलनला मास्टर स्टोरीटेलर म्हटलं जातं. त्याच्या सिनेमातली गोष्ट खरी भासते. कारण- ती बारकाव्यांसह सादर केली जाते. आणि आता त्याचा डंकर्क येतोय... 


हॉलीवूडच्या प्रसिद्ध व प्रतिभावान दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ख्रिस्तोफर नोलनचं नाव सुपरिचित आहे. द प्रेस्टिज, मेमेंटो, बॅटमन बिगिन्स, डार्क नाईट, डार्क नाईट रायझेस, इन्सेप्शन, इंटरस्टेलर अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणारे, मोजकेच; पण प्रभावी सिनेमे दिग्दर्शित करणारा दिग्दर्शक म्हणून नोलनची खास ओळख आहे. कुठलाही विषय हाताळताना सखोल विचार व संशोधन करून, त्या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करणं आणि तितक्‍याच गंभीरपणे लोकांसमोर सादर करणं, यात नोलनची हातोटी आहे. ‘द प्रेस्टिज’मधलं दोन प्रसिद्ध जादूगारांचं जग, त्यांची आपापसांतली स्पर्धा, श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या वेडातून सुरू झालेला जीवघेणा खेळ... ‘मेमेंटो’मध्ये स्मृतिभ्रंशाच्या आजारावर मात करत प्रेयसीच्या खुन्याला शोधून, त्याचा बदला घेणारा नायक, बॅटमन आणि जोकरची अफलातून जुगलबंदी, जोकरच्या पात्राला असलेली खोली, त्याची विकृती... ‘इन्सेप्शन’मधलं डोकं चक्रावून टाकणारं कोडं, स्वप्नांच्या पातळ्या, भौतिकशास्त्र आणि अवकाशाचे शास्त्रशुद्ध नियम सांभाळत केलेला, एखाद्या खऱ्याखुऱ्या स्पेस-मिशन इतके बारकावे असणारा इंटरस्टेलर असे विविध विषय नोलनने समर्थपणे हाताळले. त्याच्या सिनेमांतल्या पात्रांचा मनोव्यापार, त्यांचं अस्तित्व, त्यांचे स्वभाव हे सगळं एकदम खऱ्या जगातल्यासारखं भासतं. नोलनला मास्टर स्टोरीटेलर म्हटलं जातं. त्याच्या सिनेमातली गोष्ट खरी भासते. कारण ती बारकाव्यांसह सादर केली जाते. 

‘इंटरस्टेलर’सारखा सुरेख विज्ञानपट दिल्यानंतर नोलन आता काय नवीन करतो आहे, याकडे सगळ्या चाहत्यांचं लक्ष लागलेलं होतं. या वेळी नोलन त्याच्या चाहत्यांच्या भेटीला एक पीरियड सिनेमा आणतोय. पीरियड सिनेमा म्हणजे एका ठरावीक काळात (शक्‍यतो जुन्या काळात) घडणारा सिनेमा. या सिनेमाचं नाव आहे डंकर्क. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात आताच्या उत्तर फ्रान्समध्ये असणाऱ्या डंकर्क या जागी एक मोठी घटना घडली होती. या घटनेला ऑपरेशन डायनॅमो म्हणूनही ओळखलं जातं.

डंकर्कच्या समुद्रकिनाऱ्यावर ब्रिटन, बेल्जियम, कॅनडा व फ्रान्स या मित्रराष्ट्रांच्या सैनिकी टोळ्यांना जर्मन सैन्याने अडकवून ठेवलं होतं. या सैन्यावर जर्मनीकडून हल्ले करण्यात येत होते.  २६ मे ते ४ जून या काळात या सर्व सैनिकांची ऑपरेशन डायनॅमो या मिशनअंतर्गत सुटका करण्यात आली. ज्या ठिकाणी ही अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक घटना घडली, बरोबर त्याच ठिकाणी या सिनेमाचं शूटिंग करण्यात आलंय.

नाझी सैन्यानं सप्टेंबर १९३९ मध्ये पोलंड ताब्यात घेतल्यावर फ्रान्स आणि ब्रिटिश साम्राज्यानं जर्मनीविरोधात युद्धाची घोषणा केली. फ्रान्सच्या मदतीकरता ब्रिटिश सैन्याची एक विशेष तुकडी पाठवली गेली. मे १९४० मध्ये जर्मनीने बेल्जियम व नेदरलॅंडस्‌ ताब्यात घेतलं. काही तुकड्यांनी इंग्लिश खाडीमधून जात फ्रान्सवर हल्ला चढवला. उत्तर फ्रान्सच्या किनाऱ्याजवळ ब्रिटिश सैन्याची विशेष तुकडी (म्हणजे BEF ब्रिटिश एक्‍स्पिडिशनरी फोर्स), बेल्जियमचं थोडं सैन्य व फ्रेंच सैन्य यांना जर्मन सैन्यानं कचाट्यात पकडलं. ब्रिटिश तुकडीच्या कमांडरला इंग्लिश खाडी पार करून गेलं, तर डंकर्क या बंदराजवळ सैन्याचा मुक्काम हलवणं जास्त योग्य ठरेल, असं लक्षात आलं. बंदर असल्यामुळे सैन्याची सुटका व रसद या दोन्ही दृष्टिकोनातून डंकर्क योग्य जागा होती. ३१ मे १९४१ रोजी फ्रेंच सैन्याच्या तुकडीत असलेल्या माणसांनी सात वेगवेगळ्या जर्मन सैन्य-तुकड्यांशी बराच काळ चालणारी लढाई केली.

पहिल्या दिवशी सुमारे साडेसात हजार सैनिकांची सुटका करण्यात आली. आठव्या दिवसाच्या अखेरीस सुमारे सव्वातीन लाख सैनिकांची ८०० बोटींच्या साह्याने यशस्वीरीत्या सुटका करण्यात आली. ब्रिटिश सैन्यानं या युद्धात सुमारे ६८ हजार सैनिक गमावले; शिवाय अनेक रणगाडे, वाहने व इतर युद्धसामग्रीही गमावली. मच्छीमारीच्या छोट्या बोटींपासून ते मोठमोठ्या लष्करी जहाजांपर्यंत अनेक साधनांचा सैनिकांच्या सुटकेकरता वापर करण्यात आला. या ऑपरेशनदरम्यान सुमारे ७०० बोटींचा वापर करण्यात आला; ज्यातल्या सव्वादोनशे बोटी बुडाल्या. सुटकेदरम्यान जर्मन सैन्यानं डंकर्क येथे मोठ्या प्रमाणात बॉम्बगोळे फेकले. शहर आणि बंदराचा भाग बेचिराख केला. पाणीसाठे उद्‌ध्वस्त केले. सुमारे एक हजार सामान्य नागरिक मारले गेले. आगी लावण्यात आल्या. २८ मे रोजी बेल्जियन सैन्यानं शरणागती पत्करली. त्यामुळे डंकर्कच्या पूर्वेकडची बाजू उघडी पडली. ब्रिटिश एक्‍स्पिडिशन फोर्स वि रॉयल एयर फोर्स या दोहोंच्या अथक अशा एकत्रित प्रयत्नामुळे २८ मे ते ४ जूनदरम्यान लाखो सैनिकांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले. डंकर्कच्या किनाऱ्यावरून सुमारे एक लाख आणि बंदरातून सुमारे सव्वादोन लाख सैनिकांची यशस्वीरीत्या सुटका करण्यात आली. चर्चिल यांनी सुटकेच्या या घटनेला एक मोठा चमत्कार म्हणून संबोधलं होतं. जर्मन सैन्यानं डंकर्क येथील लढाईला आतापर्यंतचं सर्वांत मोठं संहारक युद्ध म्हणून संबोधलं.

मास्टर स्टोरीटेलर ख्रिस नोलन प्रथमच असा ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमाच्या ट्रेलरवरूनच त्याच्या भव्यतेची कल्पना येतेय. दुसऱ्या महायुद्धातील महत्त्वाची घटना आता नोलनच्या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. नोलननं वेगवेगळ्या ११ चित्रपटांपासून ‘डंकर्क’ बनवण्याकरिता प्रेरणा घेतली. हा चित्रपट घटनाप्रधान असेल. यात संवाद कमी प्रमाणात असतील. आयमॅक्‍स ६५ फिल्म आणि  ६५ मिमी फिल्म अशा दोन्ही प्रकारच्या चित्रफितींचा वापर हा सिनेमा चित्रित करण्याकरता करण्यात आलाय. या सिनेमाचा पट खूप मोठा असेल. सिनेमा बनवताना प्रचंड मेहनत घेतली गेलीय. काही दृश्‍यं जास्त जिवंत व परिणामकारक होण्याकरता, प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी वापरली गेलेली लष्करी वाहनं वापरण्यात आली आहेत. विशेष परिणाम साधण्याकरता विमान कोसळतानाचं एक दृश्‍य चित्रित करताना, फायटर विमानाच्या पंख्याला आयमॅक्‍स कॅमेरा बांधून तो चक्क पाण्यात बुडवण्यात आला. अद्ययावत तंत्रज्ञान वापरून केलेला इतिहास पुनरुज्जीवित करण्याचा नोलनचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. तेव्हा दुसऱ्या महायुद्धात घडलेल्या या घटनेचे साक्षीदार होण्याकरता ‘डंकर्क’ पाहायलाच हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com