विनोद तावडेंना बोलायला वेळ कुठाय? सांस्कृतिक क्षेत्र खवळले!

मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पुणे : सांस्कृति मंत्री विनोद तावडे यांना कोणत्याही कार्यक्रमात बोलावलं तरी ते येत नाहीत. त्यांना आमच्याशी बोलायला सवड नाही. वारंवार एका भेटीची मागणी केली तरी त्यांना वेळ नसतो. इकडे नाटक असो वा साहित्य परिषद असो किंवा चित्रपट.. अनुदानात वाढ झालेली नाही. आमच्या समस्या आहेत, त्या मांडायला कोणी तयार नाही अशा अवस्थेत काम करणे आता कठीण झाल्याचे सांगत मराठी साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालय या खात्याला वाली नेमण्याची मागणी केली.

पुणे : सांस्कृति मंत्री विनोद तावडे यांना कोणत्याही कार्यक्रमात बोलावलं तरी ते येत नाहीत. त्यांना आमच्याशी बोलायला सवड नाही. वारंवार एका भेटीची मागणी केली तरी त्यांना वेळ नसतो. इकडे नाटक असो वा साहित्य परिषद असो किंवा चित्रपट.. अनुदानात वाढ झालेली नाही. आमच्या समस्या आहेत, त्या मांडायला कोणी तयार नाही अशा अवस्थेत काम करणे आता कठीण झाल्याचे सांगत मराठी साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालय या खात्याला वाली नेमण्याची मागणी केली. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर पत्र लिहिण्यात आले असून, 10 नोव्हेंबरपूर्वी त्यांच्या भेटीची मागणी करण्यात आली आहे. 

पुण्यात साहित्य परिषदेच्या कार्यालयात आज या तीनही अध्य़क्षांनी पत्रकार परिषद घेतली. यांच्यासोबत व्यावसायिक नाट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळीही उपस्थित होते. याबाबत बोलताना, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले, वारंवार भेट मागूनही सांस्कृतिक कार्य मंत्री वेळ देत नाहीत. पुरस्कार सोहळे असोत, प्रकाशने असोत वा आणखी काही तावडे हजर नसतात. मोहन जोशी यांनीही या बाबीला दुजोरा दिला. नाट्यसंमेलनालाही तावडे अनुपस्थित असल्याची टीका त्यांनी केली. तावडे यांना सांस्कृतिक कार्य विभागाचे काम जमत नसेल तर त्यांनी पद सोडावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

महामंडळाला चित्रपटासाठी 5 कोटी रूपयांचे अनुदान दिले जाते. ते वाढवून 25 कोटी करायला हवं. साहित्य परिषदेला 5 लाखांचे अनुदान आहे ते 10 लाख करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. 10 लाखांच्या अनुदानाची तरतूद करण्याचे प्रयत्न चालू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले, त्याचवेळी कोणत्याही अटी शर्तीं ठेवू नयेत असेही सांगण्यात आले. 

गेल्या काही महिन्यांपासून सांस्कृतिक कार्य या मुख्य घटक संस्थांकडे लक्षच देत नसल्याने हे पाऊल उचलावे लागले असेही यावेळी सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांकडे आपण भेटीची वेळ मागितली आहे. 10 नोव्हेंबरपर्यंत जर ही भेट मिळाली नाही, तर मात्र ना ईलाजाने आम्ही पुढील पावले उचलू असे यावेळी ती तिन्ही अध्यक्षांनी सांगितले.