नवा चित्रपट : अय्यारी 

aiyaary review
aiyaary review

नीरज पांडे दिग्दर्शित "अय्यारी' हा चित्रपट सर्वच आघाड्यांवर निराशा करतो. दिग्दर्शकानं "अ वेन्सडे' व "बेबी'सारख्या चित्रपटांमध्ये दाखवलेली कमाल त्याला इथं थोडीही दाखवता आलेली नाही. चित्रपटाची कथा पुन्हा एकदा सैन्याच्या एका मिशनबद्दलच असली, तरी नक्की काय सांगायचं आहे याबद्दल मोठा गोंधळ उडाल्यानं चित्रपट पूर्ण फसला आहे. दिग्दर्शन, संकलन, संगीत व अभिनय या सर्वच आघाड्यांवर चित्रपट सपशेल फसला आहे. 

"अय्यारी'ची कथा सुरू होते राजधानी दिल्लीमध्ये. कर्नल अभयसिंग (मनोज वाजपेयी) व त्याच्या सहकाऱ्यांना देशाच्या दुश्‍मनांचा कोणत्याही मार्गानं खातमा करण्याची परवानगी मिळालेली असते. अभयसिंग हे काम इमाने-इतबारे करीत असतो. (मोठ्या मिशनवर जाताना बंदुकीतल्या गोळ्या न्यायला विसरूनही तो मिशन पूर्ण करीत असतो!) त्याचा एक सहकारी मेजर जय बक्षी (सिद्धार्थ मल्होत्रा) अभयसिंगकडूनच सर्व गोष्टी शिकलेला असतो, त्याचेच फंडे वापरून शत्रूला नेस्तनाबूत करीत असतो. मात्र, हेच काम करीत असताना लष्कराच्या शस्त्रखरेदीतील गैरव्यवहार जयच्या लक्षात येते आणि तो टीममधून वेगळा होऊन भ्रष्ट मार्गाला लागतो. अभयवर आता आपल्या सर्व मिशन सोडून जयशी सामना करण्याची वेळ येते. शस्त्रास्त्र दलालांचे सैन्यातील बड्या अधिकाऱ्यांशी असलेले साटेलोटे, त्यातून होणारा गैरव्यवहार, त्यात हात धुवून घेणारे राजकारणी, काश्‍मीरसारख्या समस्या जिवंत ठेवण्यात या सर्वच व्यवस्थेला असलेला रस असे अनेक विषय कथा मधल्या काळात हाताळत राहते, एका विषयावरून दुसऱ्यावर उड्या मारत राहते. शेवटी नसिरुद्दीन शहाचे पात्र (व मुंबईतील आदर्श इमारत गैरव्यवहाराचा संदर्भ) आणून दिग्दर्शकानं कथेला अक्षरशः कोठल्या कोठे फेकून दिलं आहे. कथा नक्की कुठं सुरू झाली होती आणि कुठं संपली याचा विचार करण्याच्या नादात प्रेक्षक हरवून जातो... 

पहिल्या काही प्रसंगांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण करणारी ही कथा अतिशय लांबली असून (160 मिनिटं) अनावश्‍यक प्रसंगाच्या मोठ्या मालिकेमुळं सगळा विचका होतो. अभयसिंग आणि जयमधील फोन टॅपिंगचे युद्ध एवढाच खेळ मध्यंतरानंतर पाहायला मिळतो. अभयसिंग लष्कर, सरकारी कार्यालये, परदेशातील गुप्तहेर यंत्रणा, माध्यमे इतक्‍या सहज हाताळता दाखवला आहे, की नंतर या अतर्क्‍य गोष्टी हास्यास्पद वाटायला लागतात. जयला नक्की काय म्हणायचंय आणि त्याचा उद्देश काय याचा उलगडा शेवटपर्यंत होत नाही. तीच स्थिती जयची मैत्रीण सोनिया या पात्राबद्दलही आहे. चित्रपटाचं संकलन भयंकर असून, त्याचाच चित्रपटाला सर्वाधिक फटका बसला आहे. चित्रपट अगदी शेवटच्या टप्प्यावर आल्यावर अभय आणि जयला त्यांच्या सुरवातीच्या काळातील प्रसंग आठवू लागतात आणि प्रेक्षकाला समोर काय चाललंय याचा काही केल्या उलगडा होत नाही. 

कथेमध्ये दम नसल्यानं कलाकारांचाही गोंधळ उडालेला दिसतो. मनोज वाजपेयीनं काम छान केलं असलं, तरी एवढी मोठी भूमिका साकारताना त्याची दमछाक झाली आहे. त्यानं केलेली वेषांतरही लुटुपुटूचीच. चेहऱ्यावरचे तेच ते भाव दाखवत शेवटी तो कंटाळा आणतो. सिद्धार्थ मल्होत्राही छाप पाडण्यात अयशस्वी ठरला आहे. त्यानं केलेली वेषांतरं नक्की कशासाठी, याचाही उलगडा होत नाही. (कदाचित "अय्यारी' म्हणजे वेष बदलून, बहुरूपी बनून शत्रूला नामोहरम करणारे या सिनेमाच्या शीर्षकाला न्याय देण्यासाठी हा खटाटोप असावा.) सोनालीची भूमिका साकारणारी तमीळ अभिनेत्री राकुल प्रीत सिंगही केवळ पाट्या टाकत राहते. नसिरुद्दीन शाह व अनुपम खेर यांनी या चित्रपटात भूमिका का स्वीकारली, हाच मोठा प्रश्‍न आहे. इतर कलाकारांनाही फारशी संधी नाही. 

एकंदरीतच, नीरज पांडे यांचंच दिग्दर्शन असल्याबद्दल शंका निर्माण करणारा हा चित्रपट केवळ प्रेक्षकांचा अंत पाहण्यातच यशस्वी ठरला आहे. 

श्रेणी : 2 

  • निर्मिती : शीतल भाटिया, धवल गाडा 
  • दिग्दर्शन : नीरज पांडे 
  • भूमिका : मनोज वाजपेयी, सिद्धार्थ मल्होत्रा, राकुल प्रीत सिंग, नसिरुद्दीन शाह, अनुपम खेर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com