मनमोकळी मिथिला 

चिन्मयी खरे  
सोमवार, 15 मे 2017

'कप सॉंग'नंतर आता "गर्ल इन द सिटी', "लिटील थिंग्स' अशा वेब सीरिजमधून सध्या यूट्युबर धुमाकूळ घालणारी, तिच्या हटके स्टाईलने सगळ्यांना आपली फॅन बनवणाऱ्या मिथिला पालकरशी मारलेल्या खास गप्पा.. 

'कप सॉंग'नंतर आता "गर्ल इन द सिटी', "लिटील थिंग्स' अशा वेब सीरिजमधून सध्या यूट्युबर धुमाकूळ घालणारी, तिच्या हटके स्टाईलने सगळ्यांना आपली फॅन बनवणाऱ्या मिथिला पालकरशी मारलेल्या खास गप्पा.. 

मीरा सेहगल आणि काव्या या तुझ्या दोन व्यक्तिरेखांमधील आवडती गोष्ट? 
- "गर्ल इन द सिटी'मधील मीरा ही खूप कॉन्फिडेंट आहे. तिला आयुष्यात काय हवेय ते माहीत आहे आणि "लिटील थिंग्स'मधील काव्या मनमोकळी आणि बिनधास्त आहे. तिला काय करायचेय ते माहीत नाही; पण तिला आनंदी कसे राहायचे हे माहीत आहे. या दोन्ही व्यक्तिरेखा एकमेकांपेक्षा खूपच वेगळ्या आहेत. 

हिंदी की मराठी, कुठली भाषा अधिक जवळची? 
- अर्थातच मराठी. कारण ती माझी मातृभाषा आहे. "कट्टी बट्टी' हा माझा पहिलाच हिंदी चित्रपट होता. तोही निखिल अडवानीबरोबर. त्यामुळे थोडे दडपण होते; पण "मुरांबा' करताना माझ्या भूमिकेत खूप काही करण्यासारखे होते. त्यामुळे मराठीत काम करायला जास्त मजा आली. 

तुझा आयडॉल कोण आहे? 
- प्रियांका चोप्रा. तिने प्रत्येक प्रकारची भूमिका केलीय. अभिनयात खूप काही कमावले आहे. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून नेहमीच मला तिचा आदर वाटेल. 

इंडस्ट्रीमधील बेस्ट फ्रेंड? 
- (मनमोकळे हसून) तसे खूप आहेत; पण निवडायचेच झाले तर मी अमेय वाघला निवडेन. त्याच्याबरोबर माझे ट्युनिंग खूप छान जमते. 

तुझ्या घनदाट कुरळ्या केसांचे रहस्य? 
- हा प्रश्‍न मला नेहमीच सगळे विचारतात; पण मी काहीही विशेष करत नाही. फक्त मी केस धुतल्यावर विंचरत नाही. (विंचरू शकतच नाही.) (हसून) 

यूट्युब नसते तर स्वतःला कसे लॉंच केले असतेस? 
- कप सॉंग हे एक निमित्त होते. माझे वेगवेगळे प्रयत्न सुरूच होते. माझा स्वतःला लॉंच वगैरे करण्याचा काहीच प्लॅन नव्हता; पण यूट्युब नसते तर कदाचित थिएटर केले असते किंवा कोणतीतरी वेगळी वाट शोधलीच असती मी. 

अभिनेत्री झाली नसतीस तर? 
- अभिनेत्री झाले नसते तर मी काहीच केले नसते, असे मला वाटते. कारण मी या क्षेत्रापासून पळण्याचा खूप प्रयत्न केला; पण मला दुसरी वाट नाही सापडली. मी पुन्हा फिरून तिथेच आले. अभिनय केला नसता तर कदचित कॅमेऱ्याच्या दुसऱ्या बाजूला वेगळे काहीतरी काम करत असते; पण याच क्षेत्रात काहीतरी केले असते. 

फॅन्सबरोबर आलेला हटके अनुभव? 
- अनेक अनुभव आले. त्यात एक अनुभव म्हणजे एका अनोळखी मुलाने मला सांगितले की, तू माझ्या आईला पसंत आहेस. माझ्या आईला माझ्यासाठी आवडलेली तू पहिली मुलगी आहेस. 

तू स्वयंपाक छान करतेस; पण तू बनवलेला तुला आवडलेला पदार्थ कोणता? 
- हो, मी स्वयंपाक करते, म्हणजे वेळ आली तरच करते. ती माझी आवड नाहीय; पण मी छान स्वयंपाक करते ही माझ्या आजीने दिलेली कौतुकाची थाप आहे. त्यामुळे मी आता हक्काने सांगते की मी स्वयंपाक करते. मी केलेला चिकन करी हा पदार्थ मला खूप आवडतो. 

शब्दांकन : चिन्मयी खरे  

Web Title: mithila palkar interview