आता नाट्यगृहात होणार खळ्ळ खट्याक!

टीम ई सकाळ
गुरुवार, 1 जून 2017

राज्यभरातील नाट्यगृहांची अवस्था वाईट असल्यामुळे तिथे नाटक होत नाहीेत. नाट्यगृहांच्या दुरवस्थेबाबत कलाकारांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. असे असूनही स्थिती बदलत नसल्याने आता मनसेने याकडे विशेष लक्ष द्यायचे ठरवले आहे.

पुणे : काही वर्षापूर्वी मुंबईत मराठी सिनेमांना सिनेमागृह मिळत नसल्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हाती दगड घेतला होता. त्यावेळी या आंदोलनाला खळ्ळ खट्याक आंदोलन असे नाव देण्यात आले होते. त्याचा मोठा गाजावाजा झाला होता. आता सिनेमाघरांसारखीच अवस्था नाट्यगृहांची झाली आहे. फरक इतकाच आहे, की सिनेथिएटरमध्ये हिंदी सिनेमे लागल्यामुळे मराठीला स्थान मिळत नसे. आता राज्यभरातील नाट्यगृहांची अवस्था वाईट असल्यामुळे तिथे नाटक होत नाहीेत. नाट्यगृहांच्या दुरवस्थेबाबत कलाकारांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. असे असूनही स्थिती बदलत नसल्याने आता मनसेने याकडे विशेष लक्ष द्यायचे ठरवले आहे.

सुरूवातीला मुंबई आणि परिसरातील नाट्यगृहात याबद्दल जागरुकता केली जाणार असून तरीही फरक पडला नाही तर 'मनसे' स्टाईल आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना मनसेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले, 'आपल्याकडे नाटक बघणारा खूप मोठा वर्ग आहे. आपल्या नाटकांचे दौरे लागतात. त्यावेळी कलाकार त्यानिमित्ताने नाट्यगृहात जातो. पण तिथे सुविधांचा अभाव असतो. येणाऱ्या प्रेक्षकालाही त्याचा त्रास होतो. हे कुठेतरी थांबायला हवे. यासाठी मनसे पुढाकार घेणार आहे. अलिकडेच आम्ही वाशीच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात आम्ही जाऊन आलो. त्यावेळी नाट्यगृहाच्या सर्व बाबींवर चर्चा झाली. तिथे शासकीय पदाधिकारीही आले होते. आता कल्याण, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर अशा सर्व नाट्यगृहावर आम्ही जाणार आहोत. तरीही यात सुधारणा झाली नाही तर मात्र आम्हाला खळ्ळ खट्याक आंदोलन करावे लागेल.'

आपआपल्या भागातील नाट्यगृहांच्या असुविधांची माहीती जशी मिळेल तसे आम्ही नाट्यगृहावर जाणार, अशी माहीतीही त्यांनी दिली.