हृतिकच्या अभिनयानं "काबील'
हृतिकच्या अभिनयानं "काबील'

हृतिकच्या अभिनयानं 'काबील' (नवा चित्रपट : काबील)

'काबील' हा संजय गुप्ता दिग्दर्शित चित्रपट टिपिकल सूडकथा आहे. सूड घेणारी व्यक्ती दृष्टिहीन आहे, हा एक तेवढा फरक. अन्यथा, "अंधा कानून'पासून "गजनी'पर्यंतच्या अनेक चित्रपटांप्रमाणंच ही कथा पुढं सरकते. पहिल्या काही मिनिटांतच कथा कोणत्या मार्गानं जाणार आणि शेवट काय होणार, याचाही अंदाज येतो. हृतिक रोशननं दृष्टिहीन प्रेमवीर व डोकं चालवत थंडपणे बदला घेणारा नायक जबरदस्त रंगवला आहे. यामी गौतमनंही त्याला छान साथ दिली आहे. या दोघांच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट बांधून ठेवण्यात यशस्वी होत असला, तरी कायम स्मरणात राहणारा ठरत नाही.
"काबील'ची कथा आहे रोहित भटनागर (हृतिक रोशन) या दृष्टिहीन तरुणाची. तो व्यवसायानं व्हॉइसओव्हर आर्टिस्ट असून, तो विविध पात्रांना आवाज देण्याचं काम करतो. त्याची ओळख सुप्रिया (यामी गौतम) या दृष्टिहीन मुलीशी होते व रोहित "पहिल्या नजरेत' तिच्या प्रेमात पडतो. दोघं लग्न करण्याचा निर्णय घेतात, मात्र परिसरातील नगरसेवक माधवराव शेलारचा (रोनित रॉय) गुंड भाऊ अमित (रोहित रॉय) याची नजर सुप्रियावर पडते. यावरून रोहितचं त्याच्याबरोबर भांडणही होतं. अमित त्याच्या मित्रासह सुप्रियावर अत्याचार करतो. पोलिस अधिकारी हे प्रकरण राजकीय दबावामुळं दाबून टाकतात. सतत होणारा अन्याय असह्य झाल्यानं सुप्रिया टोकाचा निर्णय घेते आणि दृष्टिहीन असल्यानं असहाय बनलेला रोहित या सर्वांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतो. तसं आव्हानच तो पोलिसांना देतो आणि सुरू होतो एक थरारक प्रवास. रोहितची योजना काय असते व तो केवळ आवाज आणि वास यांचा उपयोग करीत सुप्रियावर अन्याय करणाऱ्यांना धडा कसा शिकवतो हे पाहणे रंजक आणि खिळवून ठेवणारं आहे.

चित्रपटाची संपूर्ण कथा पहिल्या काही प्रसंगातच लक्षात येते. अशा प्रकारची सूडकथा अनेक चित्रपटांत हाताळण्यात आल्यानं त्यात नावीन्य नाही. मात्र तिची मांडणी दिग्दर्शकानं पहिल्या भागात तरल प्रेमकथा व दुसऱ्या भागात थरारक सूडकथा अशी केल्यानं प्रेक्षक खिळून राहतो. अनेक प्रसंगांचा मारा व पात्रांची गर्दी टाळल्यानं कथा नेटकेपणानं पुढं सरकते. मात्र रोहित बदला कशा पद्धतीनं घेणार, हे पोलिसांनी (आणि प्रेक्षकांनाही!) आधीच सांगून टाकतो. सांगितलेला प्लॅन तो कसा राबवतो आणि अडचण आल्यावर त्यावर कशी मात करतो, हे पाहणं कधी कधी अपेक्षित तर कधी धक्का देणारंही ठरतं. हे करताना काही ठिकाणी केलेला फ्लॅशबॅकचा वापर आणि घुसडलेली गाणी निराशा करतात. अपेक्षित असला तरी शेवट थरारक आणि डॅशिंग करण्यात हृतिक आणि कंपनी यशस्वी ठरली आहे.

हृतिक रोशनचा अभिनय ही चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे. दृष्टिहीन व्यक्तीची देहबोली, नृत्यकौशल्य, बदला घेण्यासाठीची तयारी आणि हाणामारीच्या प्रसंगांतील धडाडी त्यानं छान साकारली आहे. "कमजोर मत समझना,' म्हणत त्यानं खलनायकाला दिलेलं आव्हान अंगावर काटा आणतं. यामी गौतमही दृष्टिहीन युवतीच्या भूमिकेत छाप पाडते. मात्र नायकाच्या पत्नीच्या भूमिकांत तिच्या अभिनयात तोच तोपणा येत चालला आहे. रोनित रॉय आणि रोहित रॉय हे दोघं खलनायकाच्या भूमिकेत फिट्ट बसले आहेत. भ्रष्ट पोलिसाच्या भूमिकेत गिरीश कुलकर्णी भाव खातो. सुदीप चटर्जी यांचा कॅमेरा आणि रसूल पुकुट्टी यांचं ध्वनी आरेखन जमेच्या बाजू.

एकंदरीतच, हृतिक रोशनच्या अष्टपैलू अभिनयानं "काबील' ठरलेली ही प्रेम आणि सुडाची कथा तुम्हाला नक्कीच खिळवून ठेवंल....

श्रेणी : 3.5
निर्मिती : राजेश रोशन
दिग्दर्शन : संजय गुप्ता
भूमिका : हृतिक रोशन, यामी गौतम, रोनित रॉय, रोहित रॉय, गिरीश कुलकर्णी आदी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com