नाशिकच्या चेहऱ्यांवर मायानगरीची मोहोर... 

nashik actress and actor in marathi industry
nashik actress and actor in marathi industry

नाशिक... प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, गोदावरीसारख्या दक्षिण गंगेचा सहवास लाभलेली, द्राक्ष वाईन पंढरी अशी कितीतरी बिरुदावली मिरवणारी नगरी म्हणून सर्वत्र परिचित आहे. पण आता ती कलावंतांची नगरी होऊ पाहतेय. इथले अनेक युवा कलाकार छोट्या पडद्यावर, मोठ्या पडद्यावर झळकू लागलेत. मालिका, चित्रपटातून मायानगरी मुंबईत आपला जम बसवू लागलेत... 

चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून नाशिककडे पाहिले जाते. फाळके यांच्यासोबतच कविवर्य कुसुमाग्रज आणि वसंत कानेटकर यांच्यासारख्या दिग्गजांचा वारसाही नाशिकला लाभला. पूर्वीपासून लेखक, उद्योजकांच्या जोडीला कलावंताचं शहर म्हणूनही नाशिकची ओळख आहे आणि आजचे अनेक कलाकार ती ओळख ठळक करताहेत. 

"काहे दिया परदेस', "अस्सं सासर सुरेख बाई', "माझ्या नवऱ्याची बायको', "गणपती बाप्पा मोरया' यांसारख्या छोट्या पडद्यावर सध्या सुरू असलेल्या अनेक मालिकांमध्ये नाशिकचे कलाकार आघाडीवर आहेत, म्हणजे आघाडीच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपटातही नाशिकच्या कलाकारांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. 

मराठी चित्रपटसृष्टी किंवा छोट्या पडद्यावरची जागा आधी बऱ्याच अंशी मुंबई आणि पुण्याच्या कलाकारांसाठीच असे. आता त्यात नाशिकनेही शिरकाव केला आहे. त्यात मोठा वाटा मुंबई-नाशिक प्रवासाची वेळ घटल्याचाही आहे. 
कारण हे अंतर अवघ्या अडीच ते तीन तासांवर आलंय. दिवसभर मुंबईत काम करून रात्री शहरात परत येणं फार अवघड राहिलेलं नाही. 

नाशिकमध्ये 25 पेक्षा जास्त नाट्यसंस्था कार्यरत आहेत. नाट्य-लेखक दत्ता पाटील, दिग्दर्शक सचिन शिंदे, महेश डोकफोडे, प्राजक्त देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे नाशिकमध्ये नाट्य-चळवळीने धरलेला जोर कायम आहे. "हंडाभर चांदण्या', "देवबाभळी', "गांधीहत्या आणि मी', "हे राम' यांसारख्या नाटकांनी "झी गौरव'सह महाराष्ट्रातील अनेक नामवंत संस्थांचे पुरस्कार पटकावले आहेत. नाट्य-चळवळीमुळे कलावंतांना एक व्यासपीठ मिळते. अभिनयाची बाराखडी नाट्य-संस्थांमध्ये गिरवल्यानंतर त्यातील कलाकारांना पुढे अनेक संधी मिळत गेल्या. त्याच मिळालेल्या संधीचे सोने करत आज छोट्या पडद्यावर अभिजित खांडकेकर, चिन्मय उदगीरकर, अनिता दाते, मृणाल दुसानीस, चित्रा कुलकर्णी, नेहा जोशी, रूपाली देशमुख, कांचन पगारे, किरण भालेराव, सायली संजीव, योगेश थोरात, गणेश सरकटे, सुयोग गोरे, पूजा गोरे, अर्चना निपाणकर, शर्मिष्ठा राऊत, धनश्री क्षीरसागर, राजेश शर्मा, भगवान पाचोरे, श्रीपाद देशपांडे, रवी साळवे यांच्यासारख्या कितीतरी कलाकारांनी आपल्या अभिनयाचा ठसा मुंबईत उमटवलाय. नाशिकच्याच संस्कृती खेर हिने "मिर्झिया'मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, हीसुद्धा नाशिकसाठी अभिमानाची गोष्ट! 

कलाकारांसोबत दिग्दर्शन, संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा यांसारख्या बाजू सांभाळणाऱ्यांनी देखील मुंबईत आपले बस्तान बसवले आहे. ईश्‍वर जगताप, रवी जन्नावार, प्रवीण ठाकरे,माणिक कानडे यांच्यासारखी कितीतरी नावे सांगता येतील. संगीतकार धनंजय धुमाळ आणि संजय गीते यांनी संगीत क्षेत्रात नाशिकला वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. प्रकाशयोजनेमध्ये विनोद राठोड यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना नुकताच "झी गौरव' पुरस्कार मिळाला. नाशिकच्या राम दौंड लिखित आणि दिग्दर्शित "हे राम' नाटकाला नऊ पारितोषिके मिळाली आहेत. 

नाशिककरांचे योगदान 
मराठी चित्रपटसृष्टीत अल्पावधीत आपली ओळख निर्माण केलेले (कै.) राजीव पाटील हेही नाशिकचेच. "जोगवा', "सावरखेड एक गाव' यासारखे अनेक गाजलेले चित्रपट त्यांनी दिले. त्यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये नाशिकच्या कलाकारांना संधी दिली. त्यातूनच इथल्या कलाकारांना बळ मिळत गेले. माजी मंत्री बबनराव घोलप, राजू फिरके, देवेन कापडणीस, संतोष प्रभुणे, हर्षल उशीर, प्रमोद गोरे, संजय भुतडा, नितीन पाटील यांचेही योगदान महत्त्वाचे आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विभागीय कार्यालयही नाशिकला सुरू झाले. त्यांच्यामार्फत अनेक उपक्रम राबवले जात असतात. 


चित्रनगरीच्या मुहूर्ताची प्रतीक्षा 
इगतपुरी तालुक्‍यातील मुंढेगाव येथे चित्रनगरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी शासनाने जागाही उपलब्ध करून दिली आहे. काही तात्रिंक बाबींमुळे अजून प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. चित्रनगरीचे काम सुरू झाल्यास नाशिकचे नाव चित्रपटसृष्टीत ठळकपणे अधोरेखित होईल, हे निश्‍चित. नाशिक आणि परिसरात निसर्गसौंदर्याची उधळण आहे. येथील वातावरणही आल्हाददायक आहे. या परिसरात अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. "बुलेट राजा', "पीके', "शमिताभ' यासारख्या हिंदी; तर "गुंठामंत्री', "यंग्राट', "जुगाड', "रेती', "गोप्या' यासारख्या अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण शहराच्या परिसरात झाल्याने निर्मात्यांचा ओढा नाशिककडे वाढला आहे. त्यामुळेही स्थानिकांना वाव मिळतो आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com