'त्या' फोटोवर आलिया फक्त लाजली...

अरुण मलाणी
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

  • 'त्या' व्हायरल छायाचित्राबद्दल अभिनेत्री आलियाची चुप्पी 
  • लाजत वाढविले गूढ, दिव्यांगाची भूमिका साकारण्याची इच्छा 

नाशिक : अभिनेता शाहरूख खानच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बर्थडे पार्टीतून परतताना अभिनेत्री आलिया भटने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा टी-शर्ट घातल्याचे छायाचित्र नुकतेच व्हायरल झाले. आलियाला याबद्दल पत्रकारांनी छेडले असता, तिने चुप्पी धरली. एवढेच नव्हे, तर स्मितहास्य करत ती लाजल्याने त्यातील गूढ वाढले. पण म्हणतात ना, 'समझनेवाले को इशारा काफी है...' हेच तिच्या देहबोलीतून जाणवले. 

कर्णबधिर मुलांना मोफत श्रवणयंत्र वाटप उपक्रमाचे कौतुक करताना तिने राणी मुखर्जी, रणवीर कपूर याप्रमाणे दिव्यांगाची आव्हानात्मक भूमिका साकारण्याची माझीही तयारी असल्याचे नमूद केले. आज प्रदर्शित झालेला सिद्धार्थचा 'इत्तेफाक' चित्रपट आवर्जून बघणार असल्याचे ती म्हणाली. 
हॉटेल एक्‍स्प्रेस इन येथे सेवा ऑटोमोटिव्हतर्फे कर्णबधिर मुलांना मोफत श्रवणयंत्र वाटप उपक्रमात आलियाने जीवनात प्रथमच आवाज ऐकणाऱ्या त्या मुलांच्या आनंदात सहभाग नोंदवला. ती म्हणाली, की संजय लीला भन्साळी, अनुराग ठाकूर किंवा शशांक मेहता अशा दिग्दर्शकांकडून स्क्रिप्ट मिळाल्यास दिव्यांगाची भूमिका साकारण्याची इच्छा आहे. यापूर्वी 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'मध्ये गायनाचाही अनुभव सुखद राहिला. 

या उपक्रमाविषयी आलिया म्हणाली, की आजही अनेक लहान मुले ऐकू येत नसल्याच्या समस्येने पीडित आहेत. अशा उपक्रमातून त्यांच्या जीवनाला नवी दिशा देण्यास मदत होते. कर्णबधिर मुलांसाठी शाळा आहेत. अन्य सामाजिक संस्था कामही करतात. पण त्यांच्या समस्येवर तोडगा काढत त्यांना ऐकू येणे यापेक्षा मोठा आनंद दुसरा कुठलाही नाही. सोशल मीडियाद्वारे अशा चांगल्या कामांचा प्रसार करत असल्याने फॉलोअर्सची संख्याही वाढत असल्याचे सांगताना, शक्‍य त्या माध्यमातून या उपक्रमाशी कायम जोडले जावे, असे मला वाटते. 

शशांक मेहताचे कौतुक 
आलियासोबत कार्यक्रमासाठी आलेला दिग्दर्शक शशांक मेहता याचे तिने कौतुक केले. 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' चित्रपटात शशांकमुळेच गाण्याची प्रेरणा मिळाल्याचे आलियाने सांगितले. शशांक नाशिकचा असल्याने आपल्याला विशेष आनंद होत असल्याचेही ती म्हणाली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

टॅग्स