डॉ. अमोल कोल्हे साकारणार संभाजीराजांची भूमिका

sambhaji new serial on zee marathi esakal news
sambhaji new serial on zee marathi esakal news

मुंबई ; छत्रपती संभाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचे पहिले अभिषिक्त युवराज आणि दुसरे अभिषिक्त छत्रपती. परंतु जणू वाद आणि गैरसमज त्यांच्या पाचवीलाच पुजलेले होते. कारण नियती प्रत्येक पावलावर त्यांची परीक्षा घेत होती. एकीकडे कर्तृत्व आणि शौर्य गाजवत असताना दुसरीकडे स्वकीयांकडूनच होणारे वारही झेलत होते. यवनांचं आक्रमण आणि स्वकियांची बंडाळी या सर्वांना हा राजा पुरुन उरला खरा पण त्याची दखल इतिहासाने हवी तशी घेतली नाही याची रुखरुख आजही अनेकजण बोलून दाखवतात. काय होता हा या राजाचा इतिहास ? इतिहासाच्या पानात काय दडलंय ? याच प्रश्नाचा धांडोळा घेतला जाणार आहे झी मराठीवर नव्याने दाखल होणा-या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेद्वारे. येत्या २४ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता दोन तासांच्या विशेष भागाने या मालिकेचा भव्य शुभारंभ होणार आहे. तर २५ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वा. ही मालिका झी मराठीसह झी मराठी एचडी वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका कोण करणार याबद्दल कमालीची उत्सुकता होती. राजांचं हे रुप कसं असेल कोणता कलाकार ही भूमिका साकारेल हे सांगण्यासाठी एका शानदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अतिशय दिमाखदार पद्धतीने वाजत गाजत या रुपाचं प्रथम दर्शन दाखवण्यात आलं ज्यात डॉ. अमोल कोल्हे हे संभाजीराजांचं रुप घेऊन उपस्थितांसमोर अवतरले. या भूमिकेबद्दल बोलतांना डॉ. कोल्हे म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांपासून उराशी बाळगलेलं स्वप्न आज पूर्ण होत आहे याचा विशेष आनंद आहे. ज्या राजाने आपल्या कर्तृत्वाने औरंगजेबासारख्या शहेनशहाला मात दिली, ९ वर्षांच्या कारकिर्दीत लढलेल्या सर्व लढाया ज्याने जिंकल्या अशा अजेय राजाची महती अजूनही आपल्यापर्यंत हवी तशी पोचली नाहीये. ही मालिका म्हणजे त्याच राजाचा देदीप्यमान इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल.”

यावेळी झी मराठीचे बिझनेस हेड निलेश मयेकर आपल्या मनोगतात म्हणाले की, “आजवर झी मराठीने आपल्या प्रेक्षकांना कायम मनोरंजनापलिकडे काही तरी वेगळं दिलंय. कारण मनोरंजन हा जरी उद्देश असला तरी त्यासोबत सामाजिक जबाबदारीचंही भान आम्ही कायम बाळगतो. यापूर्वी जय मल्हार पौराणिक मालिकेतून खंडेरायांची गाथा अवघ्या महाराष्ट्राला आम्ही सांगितली. आता स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वीरपुत्राची गाथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आणि ती सर्वांना भारावून टाकणारी असेल असा विश्वास मला आहे.”

याप्रसंगी मालिकेचे निर्माते पिंकू बिस्वास , दिग्दर्शक कार्तिक केंढे, राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणा-या प्रतीक्षा लोणकर, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे शंतनू मोघे , औरंगजेबाची भूमिका साकारणारे अमित बहल, मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे, छायालेखक निर्मल जानी, साहस दृश्यकार रवि दिवाण आणि इतर कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते.

कथासूत्र
छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यावर दृष्टीक्षेप टाकला तर एक बाब प्रामुख्याने लक्षात येते ती म्हणजे लहानपणापासूनच अनेक चढ-उतार त्यांच्या आयुष्यात आले. वयाच्या दुस-या वर्षी आईचं छत्र हरवलं मात्र आजी जिजाऊसाहेबांच्या सावलीत स्वराज्याचं बाळकडू त्यांना मिळालं. अवघ्या नवव्या वर्षी मिर्झाराजांच्या गोटात जाऊन स्वराज्यासाठी मोगल मनसबदार झाले. दहाव्या वर्षी आग्र्याला शहेनशहा औरंगजेबाच्या दरबारात आपल्या बाणेदारपणानं भल्याभल्यांना चकित केलं. आग्र्याहून सुटकेनंतर मथुरा ते राजगड प्रवास एकट्यानं केला. पण युवराजपदी शंभूराजे विराजमान झाले आणि राजारामांच्या जन्मानंतर सुरु झालेल्या कुटुंबकलहानं डोकं वर काढलं. कारस्थानी कारभा-यांनी स्वार्थासाठी महाराणी सोयराबाईंच्या मातृसुलभ भावनेला फुंकर घातली. आरोप आणि बदनामीची धुळवड शंभूराजांच्या आयुष्यात सुरु झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य आणि शंभूराजे दोन्ही पोरके झाले. घरातील वादळ सुरु असतानाच स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी, आदिलशहा हे सारे शत्रू एकाचवेळी सज्ज झाले. त्यात भर म्हणून खुद्द शहेनशहा औरंगजेब अफाट सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. स्वराज्य धास्तावलं, स्वराज्याला प्रश्न पडला आता काय करेल शिव सिंहाचा छावा ? कसा समोर जाईल या सुलतानी आक्रमणाला ? छातीवर संकट झेलताना घरभेद्यांकडून तर वार होणार नाही ना? काय ठरवेल इतिहास शंभूराजांना स्वराज्यविध्वंसक की स्वराज्यरक्षक ? याच आणि अशाच अनेक प्रश्नांवर आणि त्यांच्या उत्तरांवर या मालिकेचं कथासूत्र आधारलेलं आहे.
स्वराज्याबद्दलचं जाज्वल्य प्रेम आणि अभिमानाने भारलेला हा शंभुराजांचा इतिहास प्रेक्षकांना भव्य दिव्य स्वरुपात या मालिकेतून बघता येणार आहे. मालिकेची निर्मिती डॉ. अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली राव आणि पिंकू बिस्वास यांनी केली आहे. येत्या २४ सप्टेंबरला दोन तासांच्या विशेष भागाने मालिकेचा भव्य शुभारंभ होणार असून २५ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वा. ही मालिका प्रेक्षकांना बघता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com