जिंदगी नॉट आउट.. झी युवावर नवीन मालिका

yuva.
yuva.

मुंबई : मायेची ऊब देणारी आई...आधाराचा हात पाठीवर ठेवणारे वडील.... लुटूपुटूच्या भांडणातही आनंद शोधणाऱ्या बहिणी ... कुटुंबात जेव्हा अशा नात्याचे बंध एकमेकांसोबत दृढपणे बांधलेले असतात तेव्हा डोळ्यात सामावलेली आकाशाएवढी स्वप्न पूर्ण करण्याची हिम्मत मिळत असते . आयुष्यातील प्रत्येक संकट परतवून लावण्याची धमक येते. कुटुंबातील एका व्यक्तीच्या डोळ्यातील स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जेव्हा सगळ्यांची साथ मिळते तेव्हा त्या स्वप्नपूर्तीलाही वेगळेच तेज येते. याच भावविश्वावर आधारित ‘जिंदगी नॉट आउट ' ही मालिका झी युवा या वाहिनीवर ७ ऑगस्ट पासून रात्री ९ पहायला मिळणार आहे.
 
असं म्हणतात,  की , बाबांची चप्पल मुलाच्या पायात चपखल बसायला लागली की, दोघांनी मैत्रीची गाठ बांधावी. मुलगी अवखळ वयाच्या उंबरठ्यावर आली की मायलेकींपेक्षा मैत्रीणीच नातं तयार व्हावं .  पाठच्या भावंडांमध्येही अशीच मनाचे कप्पे मोकळे करणारी मैत्री फुलावी. . कौटुंबिक नात्यातील ही प्रत्येक छटा या नव्या मालिकेत अनुभवता येणार आहे. कुटुंबाची सर्वात मोठी ताकद असते ते एकमेकांमधील भावनिक बंध. यशाचे शिखर  असो किवा अपयशाची ठेच... संघर्षाचे चटके असोत किंवा स्वप्नपूर्तीचा प्रवास...यामध्ये कुटुंबाची साथ असेल तर कोणतीही खडतर गोष्ट सोपी होते हे दाखवणारी मालिका म्हणजे 'जिंदगी नॉट आउट'.  

२१ वर्षाच्या सचिन देसाई या मुलाचं क्रिकेट या खेळावरील प्रेम आणि ते पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेलं त्याचं कुटुंब आपल्याला पाहायला मिळेल . सचिनच्या या स्वप्नात येणाऱ्या अडचणी आणि त्याला संपूर्ण कुटुंब कसे तोंड देते हे पाहताना नकळतपणे आपल्याला आपल्या कुटुंबाची नव्याने ओळख होईल . या मालिकेमध्ये  शैलेश दातार , वंदना वाकनीस , तेजस बर्वे , ज्ञानदा रामतीर्थकर , नेहा अष्टपुत्रे  , सायली झुरळे , तेजश्री वालावलकर , स्वप्नील फडके , उज्वला जोग , प्रसन्ना केतकर , सिद्धीरूपा करमरकर , अथर्व नकती , राहुल मेहेंदळे , आदिश वैद्य असे अनेक कलाकार आहेत.
  
झी युवा आणि झी टॉकीज चे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले की, “ही मालिका त्या प्रत्येकासाठी आहे, जे स्वतःवर विश्वास ठेऊन आयुष्यात स्वप्न पाहण्याचं धाडस करतात आणि त्याचबरोबर त्या सर्वांसाठी, जे अशी स्वप्ने सत्त्यात उतरवण्यासाठी त्यांना हातभार लावतात.  कुटुंबात जेव्हा एक व्यक्ती स्वप्न बघते तेव्हा घरातील प्रत्येकाने ते उचलून धरायचं असतं, त्याला आधार द्यायचा असतो. जेव्हा कुटुंबातील प्रत्येकजण त्या स्वप्नाला आपलं स्वप्न बनवतात; तेव्हा ते स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागत नाही आणि हीच भावना "जिंदगी नॉट आऊट" ही मालिका पाहताना टीव्ही समोरील प्रत्येक कुटुंबाला जाणवेल याची आम्हाला खात्री आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com