आता रोमान्स नाही, ब्रोमान्स! 

चिन्मयी खरे 
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

स्वप्नील जोशीचा नवा चित्रपट येतोय. स्वप्नीलची इमेज आहे ती लव्हर बॉयची. त्यामुळे त्याचा हा नवा सिनेमाही रोमॅंटिक असेल, असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात तो "ब्रोमॅंटिक' आहे. त्याचा आणखी एक वेगळेपणा म्हणजे त्याची कथा खुद्द स्वप्नील आणि सुबोधने (भावे) मिळून लिहिलीय... 

स्वप्नील जोशीचा नवा चित्रपट येतोय. स्वप्नीलची इमेज आहे ती लव्हर बॉयची. त्यामुळे त्याचा हा नवा सिनेमाही रोमॅंटिक असेल, असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात तो "ब्रोमॅंटिक' आहे. त्याचा आणखी एक वेगळेपणा म्हणजे त्याची कथा खुद्द स्वप्नील आणि सुबोधने (भावे) मिळून लिहिलीय... 

या आधी मी रोमॅंटिक हिरो होतो अनेक चित्रपटात. पण "फुगे' हा रोमॅंटिक चित्रपट नसून "ब्रोमॅंटिक' चित्रपट आहे. दोन मित्रांची ही गोष्ट आहे. ज्यांचं नातं सख्ख्या भावांइतकं मजबूत आहे... म्हणून ब्रोमॅंटिक! 
त्या दोघांमधल्या एकाचं लग्न ठरतं आणि त्यांच्या प्रेमाच्या मध्ये एक मुलगी येते. प्रेमात वाटेकरी येतो. ती त्यातल्या एकाला म्हणते, माझ्याबरोबर फिल्म बघायला चल. पण त्याला त्याच्या मित्राबरोबरच तो पाहायचा असतो. त्यामुळे त्याला खोटं बोलायला लागतं. त्या दोन मित्रांच्या आयुष्यातली धमाल सांगणारा हा ब्रोमॅंटिक चित्रपट आहे. 

बावळट आदित्य.. 
या चित्रपटात एका मी बावळट मुलाची भूमिका करतोय. आदित्य त्याचं नाव. तो खूप भोळा, पापभिरू, आपल्या घरच्यांवर जीवापाड प्रेम करणारा आहे. त्याची त्याच्या मित्रावर खूप श्रद्धा आहे, हो श्रद्धाच... त्याचा मित्र ऋषिकेश (सुबोध भावे) याच्यावर त्याचा खूप खूप म्हणजे खूपच विश्‍वास आहे. म्हणजे तो म्हणेल ते बरोबर असणारच हे त्याला माहीतेय. आदित्यच्या जन्मापासून तो आणि ऋषिकेश हे दोघे मित्र आहेत. मी माझ्या इतर चित्रपटांमध्ये स्मार्ट, कॅसिनोव्हा असतो. यात प्रचंड बावळट आहे. "हाफव्हॉली'बॉल मिळाल्यावरही स्टंपवर पडून आऊट होतात ना बॅटस्‌मन तेवढा बावळट! 

फुग्यातच आहे सगळं... 
चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना कळेल की "फुगे' हे नाव का ठेवलं ते. "फुगे' हे नाव ठेवण्यामागे दोन कारणं आहेत. फुगे पाहिल्यावर सगळ्यात पहिलं म्हणजे चेहऱ्यावर आनंद येतो. या चित्रपटाचंही तसंच आहे. हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरही असाच आनंद आणि हसू पाहायला मिळेल. आणि दुसरं कारण म्हणजे आपण आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे फुगे उडवत असतो. आनंदाचे, कधी दुखाचे, गैरसमजाचे, प्रॉब्लेम्सचे. उगाचच नको त्या गोष्टींमध्ये आपण हवा भरत असतो आणि जेव्हा तो फुगा फुटतो तेव्हा त्रास होतो. तेव्हा असा संदेश देण्यात आलाय, की उगाच गैरसमजाचे फुगे फुगवू नका; तर आनंदाचे "फुगे' आकाशात सोडा. 

वाट बघण्यापेक्षा स्वतःच केले..
मी आणि सुबोधने मिळून या चित्रपटाची कथा लिहिली आहे. दोघांनीही पहिल्यांदाच हे काम केलंय. खरं तर माझा आणि सुबोधचा कथा लिहिणं हा उद्देश नव्हता. आम्हाला दोघांना मिळून एकमेकांबरोबर काम करण्याची खूप पूर्वीपासून इच्छा होती. पण तशी स्क्रिप्ट आणि संधी आमच्याकडे आलीच नाही. त्यानंतर सुबोधचे "लोकमान्य', "कट्यार...'सारखे चित्रपट आले. माझेही एक-दोन चित्रपट आले. पण एवढा काळ गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं, एखाद्या चांगल्या स्क्रिप्टची वाट कशाला बघा! आपणंच काहीतरी चांगलं लिहू, ज्यामध्ये आपल्याला दोघांना एकत्र चांगलं काम करता येईल. त्यामुळे "फुगे'ची मूळ संकल्पना एकमेकाबरोबर काम करण्याच्या इच्छेतून आली आहे, असं मला वाटतं. 

स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी? 
हो बरोबर आहे, ही कोणतीही चूक नाहीये. आमच्या पोस्टरमध्ये तुम्हाला हे दोन उलटे टॅटू पाहायला मिळतील. पण ही चूक किंवा एखादा पब्लिसिटी स्टंट नाहीये; तर हा चित्रपटाच्या कथेचा भाग आहे. त्यामुळे चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना त्यामागचं रहस्य कळेलच. 

स्वप्नाने हे केलं नसतं तर? 
स्वप्ना जोशीबरोबरचा हा माझा तिसरा चित्रपट आहे. ती माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहे आणि ती माझ्या बहिणीसारखी आहे म्हणून नाही; पण ती खरोखरंच कमालीची उत्तम दिग्दर्शक आहे. "फुगे'ची दोन मुलांची कथा आहे. ती मांडणं सोपं नव्हतं. ती स्वप्नाने जर दिग्दर्शित न करता कोणत्या पुरुष दिग्दर्शकाने केली असती तर ती कथा अश्‍लील वाटू शकली असती किंवा झाली असती. या चित्रपटाला एका स्त्रीचा पॉईंट ऑफ व्ह्यू मिळणं गरजेचं होतं. तो मिळालाय. त्यामुळे हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने बघण्यासारखा झालाय. 

स्त्री-अवताराची गंमत... 
या चित्रपटात मी स्त्री-अवतारात दिसणार आहे. यामध्ये मी अगदी मुलीचे कपडे, दागिने वगैरे घातले आहेत. हाही एक कथेचाच भाग आहे. या चित्रपटात काहीतरी घडतं, कधी कधी आपल्या दिसतं ते संपूर्ण सत्य नसतं. तिसऱ्या माणसाला जे दिसतं ते वेगळंही असू शकतं. चित्रपटातही अशाच प्रकारची एक गंमत घडली आहे आणि स्त्री-वेष धारण करणं हा त्या गमतीचाच एक भाग आहे. 

गोव्यात शूटिंग, म्हणजे धम्मालच... 
सुबोध (भावे) गमतीने म्हणतो की, खरं तर आम्ही गोव्यात धमाल आणि मौज मस्ती करायला गेलो होतो. स्वप्नाने ते सगळं चोरून शूट केलंय आणि ते चित्रपटात दाखवलंय. आम्ही तिथे एवढी धमाल केली आहे आणि प्रसाद भेंडे याच्या कॅमेऱ्याने ती मजा अचूकपणे टिपली आहे. जेव्हा कॅंडिड शूट करता तेव्हा त्यात रिटेक्‍स नसतात. पुढे तुम्ही काय करता हे तुम्हाला माहीत नसतं. त्यामुळे योग्य भाव टिपत राहणं हे त्या कॅमेरामन आणि दिग्दर्शकाचं कौशल्य असतं. मला असं वाटतं की, प्रसादने ती उत्तम प्रकारे टिपली आहे. आम्ही गोव्यात खूप धमाल केली आहे आणि ती चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांना ती आवडेल. मुख्य म्हणजे गोव्यात जे घडतं हा चित्रपटाचा गाभा आहे. त्यावरच या चित्रपटात काय घडतं हे कळेल; त्यामुळे ते शूटिंग फक्त गमतीचं आणि मजेचं नाही तर चित्रपटाच्या कथेच्या हिशेबानेही फार महत्त्वाचं आहे. 

चित्रपटाची हिरोईन कोण... 
या चित्रपटात प्रार्थना माझ्या गर्लफ्रेंडचं काम करत्येय खरी; पण या चित्रपटाची खरी हिरोईन सुबोधच आहे. कारण हा ब्रोमॅंटिक चित्रपट आहे. जर सुबोधला विचारलं तर तो म्हणेल, स्वप्नील हिरोईन आणि मी हिरो आहे म्हणून. त्यामुळे या चित्रपटात हिरोईन सारख्याच बदलत राहतात. पण प्रार्थना आणि मिथा शेट्टी यांनी अतिशय उत्तम कामं केली आहेत. पण तरीही सांगून ठेवतोय, लव्हस्टोरी नसली तरी दोस्तानाही नक्कीच नाही...