निरीक्षणातून अभिनय खुलला... 

संतोष भिंगार्डे 
बुधवार, 19 एप्रिल 2017

"रॉक ऑन'पासून खरी ओळख मिळालेला पूरब कोहली आता त्याची फोटोग्राफीची आवड जोपासत केलेल्या "नूर' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी मारलेल्या गप्पा... 

"रॉक ऑन'पासून खरी ओळख मिळालेला पूरब कोहली आता त्याची फोटोग्राफीची आवड जोपासत केलेल्या "नूर' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी मारलेल्या गप्पा... 

करिअरची सुरुवात 
मा झी आजी देव आनंद यांची बहीण; तर माझे वडील हर्ष कोहली हे निर्माते. त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर ते हॉटेल व्यवसायाकडे वळले. त्यामुळे आमच्या घरात तसं फिल्मी वातावरण होतं. परंतु मला काही अभिनयाची वगैरे आवड नव्हती. मुंबई तसंच पुण्यात माझं शिक्षण झालं. त्यानंतर मला पायलट व्हायचं होतं. त्यामुळे फ्लाईंग स्कूलमध्ये मी प्रवेश घेतला खरा; परंतु तो कोर्स मी पूर्ण करू शकलो नाही. कारण मला मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि मी मॉडेलिंग करू लागलो. ते करीत असतानाच झी टीव्हीच्या "हिप हिप हुर्रे' या मालिकेची ऑफर आली. एक आवड म्हणून सहजच मी ही ऑफर स्वीकारली. तेव्हापासून माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. तरीही मी अभिनयाकडे गंभीरपणे पाहत नव्हतो. दरम्यानच्या काळात चॅनेल "व्ही'साठी व्हिडीओ जॉकीचे काम केलं. एका ट्रॅव्हल शोचं निवेदन केलं. मॉडेलिंग ते टीव्ही असा प्रवास सुरू असतानाच मला चित्रपटांच्या ऑफर्स आल्या आणि सन 2003 मध्ये पहिला चित्रपट केला तो "बस यूही'. 

अभिनयाचे प्रशिक्षण आणि धडपड 
अभिनय किंवा नृत्याचे प्रशिक्षण वगैरे घेतले नाही. जे काही शिकलो ते निरीक्षणानेच शिकलो. विविध भाषेतील चित्रपट बघणं, टीव्ही शो बघणं... असं करीत करीत अभिनयातील बारकावे शिकलो. नृत्याच्या बाबतीतही असंच झालं. एकूणच या सगळ्या गोष्टी निरीक्षणानेच शिकलो. स्ट्रगलच्या बाबतीत म्हणाल तर स्ट्रगल कधी मला जाणवलाच नाही. तेव्हा स्ट्रगल नावाचा शब्दच माझ्या शब्दकोशात नव्हता. कारण कामं माझ्याकडे आपोआप येत होती. काही कामं ऑडिशन्स देऊन मिळत होती; तर काही कामं सहजच येत होती. हातात येत असलेली कामं मी करीत होतो. पहिली पाच ते सहा वर्षे मला स्ट्रगल जाणवला नाही. मात्र स्ट्रगल आता जाणवत आहे. 

स्मॉल बजेट आणि बिग बजेट चित्रपट 
चित्रपट स्वीकारताना तो चित्रपट स्मॉल बजेटचा आहे की बिग बजेटचा याचा विचार केला नाही. माझी भूमिका, चित्रपटाचे बॅनर्स आणि दिग्दर्शक या गोष्टी पाहिल्या आणि चित्रपट स्वीकारीत गेलो. त्या वेळी असं काही प्लॅन केलेलं नव्हतं. "आवारापन', "बस एक पल', "माय ब्रदर... निखिल' असे काही चित्रपट केले. त्यातील माझे काम लोकांना आवडले खरे. परंतु लक्षात राहील अशा काही भूमिका त्या नव्हत्या. एकापाठोपाठ एक स्मॉल बजेटचे चित्रपट करीत गेल्यामुळे काही जणांना असं वाटलं की आता मी चित्रपटात काम करीत नाहीय की काय... किंबहुना आता पूरब ही इंडस्ट्री सोडत आहे की काय... अशा ना ना प्रकारच्या शंका-कुशंकांचं पेव फुटलं आणि मला "रॉक ऑन' हा चित्रपट मिळाला. 

करिअरचा टर्निंग पॉईंट 
"रॉक ऑन', "जल' आणि "एअरलिफ्ट' हे तीन चित्रपट माझ्या करिअरमधील आतापर्यंतचे महत्त्वाचे चित्रपट आहेत. "रॉक ऑन' हा चित्रपट माझ्या करिअरमधील महत्त्वपूर्ण चित्रपट आहे, असे मी मानतो. तगडी स्टारकास्ट आणि बिग बजेट चित्रपट. या चित्रपटामुळे माझं नाव लक्षात राहिलं. कारण काय होतं की स्मॉल बजेटचे चित्रपट प्रदर्शित होतात. परंतु ते कितपत लोकांपर्यंत पोहोचतात हा प्रश्‍न आहे. मात्र बिग बजेटचे चित्रपट मोठ्या स्तरावर प्रदर्शित होतात. त्यांची प्रसिद्धी आणि मार्केटिंग मोठ्या प्रमाणावर असते. त्याचा फायदा आमच्यासारख्या कलाकारांना मिळतो. "रॉक ऑन'मुळे मला नक्कीच फायदा झाला. त्यानंतर "जल' या चित्रपटाचे नाव मी घेईन. हा चित्रपट म्हणावा तसा चालला नाही ही बाब जरी खरी असली, तरी व्यक्तिशः मला या चित्रपटाचा खूप फायदा झाला. त्यानंतर "एअरलिफ्ट' आणि "रॉक ऑन -2'. "रॉक ऑन'चा पहिला भाग यशस्वी झाल्यामुळे दुसऱ्या भागालाही तेवढीच पसंती मिळेल याची खात्री होती आणि तस्संच झालं. बिग बजेट चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे तुमचं काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतं, असं मला वाटतं. 

सध्याचे महिलाप्रधान चित्रपट 
एक काळ असा होता की, महिलाप्रधान चित्रपटांची संख्या कमी होती; किंबहुना हाताच्या बोटावर मोजता येतील असे काही महिलाप्रधान चित्रपट येत होते. कदाचित तेव्हा काही निर्माते धोका पत्करायला तयार नव्हते किंवा असे काही चित्रपट म्हणावा तसा व्यवसाय करत नव्हते. तेव्हा आर्थिक समस्या होती. त्यामुळे महिलाप्रधान चित्रपट फारसे बनत नव्हते. परंतु "कहानी', "नीरजा', "कहानी-2', "पिंक', "नाम शबाना' आणि आता आलेला "बेगम जान...' असे काही महिलाप्रधान चित्रपट आले आणि ते यशस्वी ठरले. त्यामुळे निर्माते मंडळींचा अशा विषयांवर विश्‍वास बसला. केवळ नायकच नाहीत; तर नायिकादेखील करोडो रुपयांची कमाई करून देऊ शकतात हे सिद्ध झाले. आता आमचा येणारा "नूर' हा एक महिलाप्रधान चित्रपट आहे. एका पत्रकाराच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा आहे आणि त्यामध्ये सोनाक्षी सिन्हाची प्रमुख भूमिका आहे. किंबहुना तीच या चित्रपटाची नायिका आहे. यामध्ये मी एका फोटो जर्नालिस्टची भूमिका साकारीत आहे. या भूमिकेकरिता मला पुन्हा कॅमेरा हातात घ्यावा लागला. कारण फोटोग्राफीची मला प्रचंड आवड आहे. 

माझी आवड-निवड 
फोटोग्राफीबरोबरच स्विमिंग, ट्रेकिंग, डान्स आणि संगीताची मला प्रचंड आवड आहे. ट्रॅव्हल शो करीत असताना मी कित्येक फोटो काढले आहेत. अगदी सुरुवातीला मी चित्रीकरणाला जायचो तेव्हा कॅमेरा माझ्याबरोबर असायचा. डिजिटल युग आलं आणि माझा कॅमेरा सुटला. आता "नूर'मधील भूमिकेसाठी पुन्हा कॅमेरा हातात घ्यावा लागला. सुरुवातीला काहीसं ते कठीण गेलं. परंतु कॅमेरा हाताळला असल्याने काही गोष्टी सोप्या झाल्या. आमच्या नूरचा चित्रपट दिग्दर्शक सुन्हिल सिप्पीला फोटोग्राफीची खूप माहिती आहे. तो देखील उत्तम फोटो काढतो. 

बायोपिकबद्दल.. 
बायोपिकचं भविष्य उज्ज्वल आहे असं मला वाटतं. "मेरी कोम', "दंगल' हे चित्रपट यशस्वी झाले आहेत आणि आता आणखीन बायोपिक येत आहेत. कुणावरही बायोपिक चित्रपट बनवीत असताना त्यातील सत्य उत्तमरीत्या मांडलं तर ते चित्रपट नक्की यशस्वी ठरतात. सध्याचा काळ बदललेला आहे आणि बदलत्या काळानुसार चित्रपट बनत आहेत. सत्य घटनांवर आधारित चित्रपटांना प्रेक्षक सध्या अधिक पसंती देत आहेत. 

नवीन प्रोजेक्‍ट 
"सेन्स 8' या एका अमेरिकन सीरिजमध्ये काम केलं होतं. आता त्या सीरिजचा दुसरा भाग येत आहे. त्यामध्ये मी काम करत आहे.