"क्वीन मेकर' नाटकात कॉर्पोरेट जगतातील वास्तव 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई : जॉय कलामंचची आणखी एक नाट्यकलाकृती रंगमंचावर दाखल झाली आहे. एकाच वर्ष एवढ्या कमी कालावधीत जॉय कलामंचने निर्मिती केलेले हे तिसरे नाटक आहे. "कळत नकळत' आणि "पाऊले चालती पंढरीची वाट' या नाटकानंतर आता "क्वीन मेकर'च्या निमित्ताने कॉर्पोरेट जगतातील वेगळा विषय रंगमंचावर हाताळला आहे. या नाटकाचा शुभारंभ नुकताच पार पडला. 

प्रसिद्ध अभिनेते, निर्माता-दिग्दर्शक आणि प्रकाश संयोजक राजन ताम्हाणे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. हे नाटक युवा पिढीच्या मूळ प्रश्‍नाला हात घालणारे आहे. आजची पिढी लग्न करायला तयार झाली, तर त्यात बऱ्याच अटी असतात. त्यामधील काही अटी एकमेकांना पूर्णपणे पटत नसल्या, तरी त्या वेळेची गरज म्हणून ते हा पर्याय स्वीकारतात. काळानुसार ही अट बायकोला बदलावीशी वाटते आणि काडीमोड होतो. त्यानंतर तो दुसरे लग्न करतानाही आपली तीच अट कायम ठेवतो, अशी नाटकाची कथा आहे. आजच्या कॉर्पोरेट जगतातील पुरुषप्रधान वृत्तीवर बोट ठेवणारा एक आगळावेगळा प्रयोग त्यात मांडण्यात आला आहे.

अक्षर कोठारी, शीतल क्षीरसागर, अंकिता पनवेलकर, अमित गुहे आदी कलाकारांसोबत एका खास भूमिकेत बाल कलाकार इलिना शेंडे दिसणार आहे. "क्वीन मेकर'ची कथा लेखक रवी भगवते यांची असून प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य आहे. नाटकाचे संगीत परीक्षित भातखंडे यांचे आहे. प्रकाशयोजना राजन ताम्हाणे, वेशभूषा कुहू भोसले, रंगभूषा शरद सावंत, व्यवस्थापक ओमकार पनवेलकर आणि सूत्रधार गोट्या सावंत आहेत.